प्रेमिकांना भेटवस्तू म्हणून अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात चॉकलेट, केक, टेडी, ब्रेसलेट असे अनेक स्वस्त-महाग पर्याय समोर आले आहेत.
सांगली : ‘फूल है गुलाब का, काँटो से क्या डरना...?’ असं म्हणायचा काळ आता गेला. प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब, ही ‘मक्तेदारी’ आता धोक्यात आहे. ‘व्हॅलेंटाईन्स डे’सारख्या (Valentine's Day) प्रेमीजनांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या सोहळ्यात गुलाबपुष्पाची (Rose Flower) मागणी मर्यादित आहे. नव्या पिढीला महागड्या भेटवस्तू आवडतात. केक, चॉकलेटने गुलाबाला ‘रिप्लेस’ केल्याचं येथील फूल विक्रेते सांगतात.
देशातील फूल शेती संकटात आहे. त्याला कृत्रिम फुले हेच प्रमुख कारण आहे. अशावेळी प्रेमीजनांचा गुलाबाला मोठा ‘आधार’ होता. मात्र तोही हळूहळू कमी होतोय. प्रेमिकांना भेटवस्तू म्हणून अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात चॉकलेट, केक, टेडी, ब्रेसलेट असे अनेक स्वस्त-महाग पर्याय समोर आले आहेत. राम मंदिर चौकातील ‘जापनिज फ्लोरिस्ट’चे अविनाश सूर्यवंशी सांगतात, ‘‘खास इव्हेंट म्हणून गुलाब मार्केट वधारेल, अशी शक्यता नाही. मात्र गुलाबाच्या सजावटीला खूप मागणी आहे. कॅफे, हॉटेल, क्लबमध्ये हे काम जोरात आहे. पण, बाजारपेठेतून एक-दोन गुलाबांची खरेदी कमी झाली आहे.’’
येथीलच ‘स्वराज्य फ्लोरिस्ट’चे संचालक रवींद्र जाधव म्हणाले, ‘‘एरव्ही दहा ते पंधरा रुपयांना मिळणारा गुलाब आता तीस ते ३५ रुपयांना विकला जाईल. मागणी चांगली राहील, अशी अपेक्षा आहे. चॉकलेट बुके, बॉटल बुके ‘ट्रेंड’मध्ये आहेत. तीस रुपयांपासून तीन हजारांपर्यंत बुके आहेत.’’ ‘आरती क्रीएशन’च्या संचालिका रश्मी शहा म्हणाल्या, ‘‘ग्रीटिंगमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
तीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध ती आहेत. सध्या टेडीची ‘क्रेझ’ कायम आहे. शंभर रुपयांपासून साडेतीन हजारांपर्यंत त्याच्या किमती आहेत. ऑनलाईन मार्केटमुळे गिफ्ट शॉपीला थोडा फटका बसला आहे.’’ यंदा मेसेज बॉटल ट्रेंडची चलती आहे. एक संदेश लिहून तो बाटलीत ठेवायचा आणि प्रिय व्यक्तीला द्यायचा. त्यातही अनेक प्रकार आहेत. एलईडी बाटल्यांना मागणी अधिक आहे. तीस रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत.
ज्यांचे लग्न वीसेक वर्षांपूर्वी झाले, ते आजही गुलाबाच्या प्रेमात आहेत. पत्नीला ते आवर्जून गुलाब देतात. एखादी साडी भेट देतानाही सोबत गुलाब लागतोच. त्यांच्या भावना त्या प्रतीकासोबत जोडल्या गेल्या आहेत, ते त्या बोलून दाखवतात, असे फूल विक्रेत्यांनी सांगितले.
पती, प्रियकर किंवा नियोजित वर विदेशात आहे... दूरच्या शहरात आहे. त्याला सांगलीला येणे जमणार नाही. त्यांनी इथे फ्लोरिस्टकडे बुकेचे बुकिंग केले आहे. सांगली शहरात असे सुमारे २०० बुके घरपोच होणार आहेत. ‘मेरे पिया गये रंगून, वहाँ से किया है टेलिफोन’, अशी त्यांची अवस्था असेल. या खास सेवेसाठी किमान एक हजार रुपयांचा बुके खरेदी करावा, अशी अलिखित अट आहे आणि पोहोच करण्याचा शुल्क २०० रुपये मात्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.