आजकाल सर्वांचेच काम ऑफिसमध्ये एसीमध्ये बसून असते. आरामात काम करण्याचे फायदे आहेत तसे नुकसानही आहे. दिवसभर बसून राहिल्याने अन्नाचे पचन होत नाही. तसेच, वजन अन् विशेषत: पोटाची चरबी वाढते.
त्यामुळे शर्टची बटणं तुटायला लागतात. थोड काम केलं की थकायला होतं. तसेच, हालचाल बंद असल्याने कधीतरी चालावं लागलं तरी घाम फुटतो, अशा वेळी स्थितीत तुम्ही घरीच एक सोपे आसन करून पोटाच्या वाढलेल्या चरबीपासून मुक्ती मिळवू शकता.
'वीर' म्हणजे योद्धा. युद्ध करणारा. युद्ध करताना वीर ज्याप्रमाणे सर्व तयारीने शत्रूवर चाल करून जाण्यापूर्वी जी स्थिती घेतो तशी काहीशी शरीराची रचना दिसते. या आसनाच्या तिसऱ्या अवस्थेत हनुमान श्रीप्रभूरामचंद्रांना नमस्कार करताना जसे एक गुडघा वाकवून बसत असत, तशी काहीशी स्थिती होते म्हणून याला हनुमंतासन असेही म्हणतात.
डावा तळपाय समोर शरीरापासून शक्य तितका पुढे टाकून व जमिनीवर घट्ट रोवा. दोन तळहातांनी कंबर घट्ट धरा.
मागे उजवा तळपाय उजव्या दिशेने वळवा व जमिनीवरून हलू देऊ नका.
दोन तळहात जुळवून हाताचा नमस्कार डाव्या गुडघ्यावर ठेवा व डावा गुडघा वाकवून मांडी व पायात काटकोन करा.
श्वास घेत जुळवलेले तळहात कोपरात सरळ ठेवून वर घेऊन डोक्यावरून मागच्या दिशेला घ्या व दृष्टी मागे वळवून सावकाश मान पाठीवर टाकण्याचा प्रयत्न करा.
श्वास सुरू ठेवा. असेच उजवा तळपाय पुढे टाकून करावे.
मागचा पाय, पाठ, मान व वर उचललेले दोन हात यांची सुंदर अशी कमान तयार होते.
मान पाठीवर पडलेली असते. डोळे उघडे असतात व तोल सांभाळलेला असतो. श्वास संथ व सम अवस्थेत सुरू असतो.
श्वास घ्या व श्वास सोडत अतिशय सावकाशीने जुळवलेले तळहात खाली डाव्या गुडघ्यावर आणून ठेवून नजर समोर जमीनीला समांतर ठेवावी.
गुडघा सरळ करून दोन हात कंबरेवर घ्यावेत. फिरवलेला उजवा तळपाय समोरच्या दिशेला करावा. डावा तळपाय मागे आणत उजव्या तळपायाला जुळवून समस्थितीत यावे.
पोटाच्या स्नायूंना चांगला ताण येतो व पोट साफ होऊ लागते.
पोटावरची चरबी कमी होते.
कंबरेची ताकद वाढते.
पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.
छाती रुंदावते व श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढते.
सर्व्हयकल स्पाँडीलॉसीसच्या लोकांना फायदा होतो.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो.