- डॉ. समीरा गुजर-जोशी
गणपतीच्या दिवसात गणपती दर्शनाच्या निमित्तानं अनेक घरी जाणं होतं. प्रत्येक घराची स्वागताची, आतिथ्याची खास पद्धत असते. आता लवकरच नवरात्री आणि मग दिवाळी याही निमित्तानं आपलं एकमेकांच्या घरी जाणं - येणं आवर्जून होतं. एखाद्याच्या घरी जाणं ही खूप खास गोष्ट असते. आपण व्यक्तीला ‘बाहेर’ भेटणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्या ‘घरी भेटणं’ ही अजून वेगळी.
घरी भेटण्यातून त्या व्यक्तीची एक वेगळी ओळख आपल्याला होत असते.... जी अधिक खरी, मनाला अधिक स्पर्शणारी आणि सखोल असते. कारण त्या व्यक्तीबरोबर तिचं घर, घरातील माणसं, त्या घरातलं वातावरण या सगळ्यांशी आपला परिचय होतो. अशा कित्येक घरांच्या आठवणी माझ्या मनात दाटून येतात. एक छोटासा प्रसंग सांगते.
माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गणपतीला गेले होते. माझी मुलगी तेव्हा लहान होती. माझ्या मैत्रिणीनं कुठल्याशा एक्झिबिशनमधून लहान मुलांसाठी पाणी घालून वाजवण्याच्या शिट्ट्या आणल्या होत्या. ती शिट्टी वाजवली, की पक्षी किलबिलतात तसा मंजुळ आवाज यायचा.
आपल्याकडेही अनेकदा पाहुण्यांबरोबर लहान मुली येणार असतात. त्यांच्यासाठी अशी काहीतरी वेगळी कल्पक भेट आणण्याची तिची युक्ती माझ्या लक्षात राहिली. अनेकदा नवीन जागी मुलं बावरतात; पण असं काही वेगळं खेळणं मिळालं की त्यांची आपल्याशी गट्टी व्हायला वेळ लागत नाही.
तुला ही आठवत असेल ना, मैत्रिणी, लहानपणी ज्या घरी छान खाऊ मिळायचा, तिकडे जायची एक वेगळीच उत्सुकता असायची. असं मुलांशी आपुलकीचं नातं जोडणारं घर नक्कीच खास वाटतं. इतकंच कशाला? एक चांगला होस्ट होण्यासाठी मला वाटतं आपुलकी हा सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे. छोटीशी गोष्ट; पण चहा पिणारं घर जेव्हा आवर्जून घरात कॉफी ठेवतं तेव्हा मला वाटतं ते येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत करायला ‘स्वागतोसुक’ असं घर आहे.
किती छान शब्द आहे ना! स्वागतोत्सुक..... याच्या उलटा अनुभव काही अगदीच दुर्लभ नाही. खूप ठिकाणी पाहुणे आल्यानंतर कपाळावर आलेल्या आठ्या पाहुण्यांनाही दिसतात. म्हणूनच ज्या घरात पाहुण्यांशी घरातले सर्व सदस्य बोलतात ते घर मला फार मोलाचं वाटतं.
अलीकडे पर्सनल स्पेसचा मुद्दा पुढे करून घरातल्या घरातच ‘तुझ्याकडे आलेली मंडळी’, ‘माझ्याकडे आलेली मंडळी’ असा भेदभाव केला जातो. मोठ्यांकडे आलेल्या लोकांशी घरातले छोटे बोलत नाहीत आणि छोट्यांकडे आलेल्या त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी मोठ्यांचं अगदी जुजबी बोलणं होतं.
त्यापेक्षा जास्त बोललं, तर छोटेच मोठ्यांना ‘जा’ म्हणण्याची भीती असते; पण या सगळ्यात दोन पिढ्यांचा एकमेकांशी संवाद होण्याची खूप छान संधी आपण गमावतो आहोत असं वाटतं.. आजकाल घराला अंगण नसतं; पण आपल्या दिवाणखान्यातच गप्पांचं ‘आनंदांगण’ असावं. एका स्वागतोत्सुक घरामध्ये काय काय असावं? हा विचार करायचा ठरवला, तर अनेक मुद्दे सांगता येतील.
घर टापटीप असावं हा मुद्दा तरी अपरिहार्य आहे. त्याच जोडीनं बेसिनजवळ टॉवेल आहे की नाही, पाहुणे राहणार असतील तर त्यांच्या खोलीत एक्स्ट्रा कंगवा, साबण, टूथ ब्रश यांसारख्या सोयी आहेत की नाही, (कारण हमखास या गोष्टी आणायच्या पाहुण्यांकडून राहून जातं.), केक कापला जाणार असेल तर हात पुसण्यासाठी जवळ बेसिन तरी हवं किंवा सोय म्हणून टिशू पेपर हवेत.
कुणाला तरी खाऊ डब्यात भरून द्यायचा असेल तर दिला आणि परत आला नाही तर चालेल असा डबा म्हणजे पेपर कंटेनर वगैरे हाताशी असतील तर उत्तमच... येणाऱ्या पाहुण्यांच्या गरजांचा विचार घरानं आधी करावा. (अगदी जेवणाचा मेनू ठरवताना पाहुण्यांना काही पथ्य आहे का इथपासून हा विचार करता येईल.) उत्तम होस्ट होण्याचंही एक शास्त्रच आहे म्हणा ना! पण त्याही पेक्षा ती कला आहे. किंवा कला आणि शास्त्र दोन्ही आहे.
अर्थात हा आजकालचा विचार झाला. मला उत्तम होस्ट म्हटल्यावर आजीचा सुरकुतलेला हात आठवतो. मी घरात पाऊल ठेवल्यानंतर जो माझ्या चेहऱ्यावरून अतिशय मायेनं फिरतो. आग्रहाचे दोन घास जास्त भरवताना तिच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव किती देखणे असतात. तिच्या साध्या जेवणात अमृतमय प्रेम कालवलेलं असतं. आजच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या युगात आपल्या घरी ही आजीची माया ‘कणभर’ जरी जाणवली, तर आपण उत्तम होस्ट आहोत असं समजायला हरकत नाही. हो ना!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.