आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर-
आजकाल बऱ्याच सायन्स फिक्शन मुव्हीमधून उडणाऱ्या गाड्या, हवेतून जाणारे मोठ-मोठे मार्ग, हॉलोग्राम स्क्रीन असं काहीतरी भविष्याचं चित्र दाखवलं जातं. पण याच्या बरोबर उलट चित्र भविष्यात आपल्याला दिसणार आहे.
हो!! म्हणजे धुरामध्ये बुडालेली शहरं, धूर आणि धुक्यातून डोकावणारा सूर्य, संपूर्ण चेहरा झाकेल असे मोठ मोठे मास्क लावलेली लोकं आणि बरंच काही. सध्या आपल्याकडे अशी परिस्थिती आलेली नसली तरीही, डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार जगातील 80 टक्के देशांमधील हवेची पातळी सर्वसामान्य स्तरापेक्षा खूप खालावलेली आहे. ज्यामुळे शहरी भागामध्ये श्वसनाचे आणि हृदयविकाराचे आजार वाढत चाललेले आहेत.
सध्या भारतात दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची पातळी धोकादायक टप्प्यापर्यंत वाढलेली आहे. ज्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. मुंबईत देखील हळूहळू प्रदूषणाची तीव्रता वाढत चाललेली असताना, २०२३ च्या दिवाळीनंतर ही तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपण जाणून घेऊया, आहारातील काही घटक, जे वातावरणातील या प्रदूषणाशी फाईट करतील!!
प्रदूषक: पार्टीक्युलेट मॅटर. हवेमध्ये असणारे २.५ -n१० मायक्रोमीटर इतक्या आकाराचे प्रदूषण करणारे घटक.
त्यामुळे होणारे आजार/ लक्षणे : अस्थमा आणि COPD ( क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसऑर्डर, श्वास घेण्यात अडथळा आणि खोकला ) असलेल्या लोकांना पार्टीक्युलेट मॅटरचा अधिक प्रमाणात त्रास होऊ शकतो.ज्यामध्ये श्वसन मार्गाला सूज येणे, घसा खवखवणे, श्वसनसंस्थेचे आकुंचन यासारखी लक्षणे दिसून येतात.
आहार :
ओमेगा थ्री फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ - मासे ( मुख्यत्वे बांगडा, सुरमई ), अळशीच्या बिया, सूर्याफुलाच्या बिया, अक्रोड, सोयाबीनऑइल, शिंपले.
ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे एक प्रकारचे फॅट असून ते माशांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. एनसीबीआय या जागतिक दर्जाच्या रिसर्च पेपरमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार आहारामध्ये ओमेगा थ्री पार्टी ऍसिडयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने, फुफुसांच्या ऍलर्जीमुळे जमा होणारा घशातील कफ (श्लेष्मा) कमी होऊ शकतो. (३) याशिवाय रक्तामधील ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यास फुफुसांचे आरोग्य सुधारू शकते.
प्रदूषक : नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड. नायट्रोजन डायॉक्साईड आणि सल्फर डाय-ऑक्साइड हे प्रामुख्याने वाहनांमधून आणि मोठ्या कारखान्यांमधून बाहेर सोडले जातात.
त्यामुळे होणारे आजार/ लक्षणे : श्वसन मार्गाला सूज येणे/ जळजळ, अस्थमा, श्वास घेण्यास त्रास,ब्रोन्कायटिस, गंधाची जाणीव न होणे, लहान मुलांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी होणे, शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होणे, डोकेदुखी, धाप लागणे, ताप सर्दी, छातीत पिवळा श्लेष्मा जमा होणे, कॅन्सर...
आहार :
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ - लिंबू, संत्री, मोसंबी, चेरी, स्ट्रॉबेरी, किवी, पेरू, आवळा, पपई, ब्रोकॉली, सिमला मिरची.
विटामिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने फुप्फुसाचा कॅन्सर, लंग फायब्रोसिस ( फुफुसातील ॲलवीओलाय पेशींना इजा होऊन ऑक्सिजन सामावून घेण्याची क्षमता कमी होणे) यासारख्या दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण मिळते. एनसीबीआय मध्ये प्रकाशित झालेल्या, ११ लोकांवर केल्या गेलेल्या एका डबल ब्लाइंड, प्लासिबू कंट्रोल रिसर्चनुसार, ५०० मिलीग्राम विटामिन सी चा डोस( ४ वेळाx३ दिवस) नायट्रोजन ऑक्साईडमुळे होणारे फुफ्फुसाचे नुकसान कमी करू शकतो.
पोटॅशियमयुक्त पदार्थ : टोमॅटो, बीट, केळी, बटाटा, संत्री, रताळे, नारळपाणी, हिरव्या पालेभाज्या.
पोटॅशियमच्या कमतरतेमुळे श्वसनाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अस्थमा आणि सीओपीडी असणाऱ्या लोकांनी प्रदूषणापासून वाचण्यासाठी, योग्य प्रमाणात आहारात पोटॅशियमयुक्त घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.
प्रदूषक : वोलाटाईल कंपाऊंडस् ( बाष्पशील अस्थिर संयुगे) अशा प्रकारचे विषारी केमिकल्स साधारणतः औद्योगिक घटक, तसेच रंग आणि क्लीनरच्या सॉलवंट्समध्ये आढळतात.
त्यामुळे होणारे आजार/लक्षणे : डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, मळमळ, श्वसनाला त्रास, मेंदूचे आजार, किडनीच्या समस्या, लिव्हरचे आजार, कॅन्सर
आहार :
कर्रक्यूमिनयुक्त पदार्थ : हळद, आंबेहळद, कढीपत्त्याची पाने अँटिऑक्सिडेंट आणि कर्रक्यूमिनयुक्त पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश केल्याने, आपण मेंदूचे आरोग्य चांगले राखू शकतो. यात प्रदूषकांमुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या धोकादायक आजारांना दूर ठेवू शकतो.
प्रदूषक : डिझेल एक्झॉस्ट पार्टिकलस् , हे प्रदूषक कार्बन, विषारी केमिकल्स, जड संयुगे ( शिसे, मर्क्युरी, क्रोमियम, कॅडमियम, आर्सेनिक) यांच्या मिश्रणातून बनतात.
त्यामुळे होणारे आजार/लक्षणे : श्वसनाचे आजार, डीएनए वर विपरीत परिणाम, कॅन्सर, शरीरातील पेशींवर विषारी परिणाम, लिव्हर, किडनी आणि ब्रेन इंजुरी.
आहार :
सल्फोरॅफेनयुक्त पदार्थ: ब्रोकोली, फुलकोबी, कोबी, केल, ब्रूसेल, अलकोल(बॉक चॉय)
सल्फोरॅफेनयुक्त पदार्थ प्रदूषकांमुळे होणाऱ्या ब्रेन इंजुरीपासून रक्षण करतात. याच सोबत त्यामध्ये काही अँटीकॅन्सरयुक्त गुणधर्म देखील आढळून येतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये असणारे काही महत्त्वपूर्ण केमिकल वातावरणातील बेंझिन, आणि इतर हानिकारक प्रदूषकांना लघवीवाटे बाहेर काढायला मदत करतात. एनसीबीआय या जागतिक दर्जाच्या रिसर्च पेपर मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार ब्रोकोलीमधील काही महत्त्वपूर्ण रसायने प्रदूषकांचा अस्थमा आणि एलर्जीवर होणारा परिणाम कमी करतात.
वर उल्लेख केलेल्या गोष्टींशिवाय लसूण, आले, काळी मिरी, दालचिनी यासारखे मसाल्याचे पदार्थ देखील फुफ्फुस आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करू शकतात. याशिवाय श्वसनाशी निगडित आजारांसाठी आयुर्वेदात तुळस आणि प्राणायाम गुणकारी सांगितलेले आहे. परंतु आयुर्वेदिक उपचार करताना आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
एकंदरीत सांगायचं झालं तर प्रदूषणाशी लढताना, मास्क हे आपले महत्त्वाचे शस्त्र असले तरीही, आहाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, जर आपली फुफ्फुसे तंदुरुस्त आणि मजबूत असतील तरच आपण या प्रदूषणाचा सामना करू शकू!! आणि प्रदूषणाविरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू शकू.
आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर
( लेखक आहारतज्ञ आणि जैवतंत्रज्ञ असून मातापोषण आणि बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत. )
( वरील सर्व उपाययोजना या सर्वसमावेशक असून, ही कुठल्याही आजाराची/ लक्षणांची फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.