हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण लोकरीचे किंवा उबदार कपड्यांचा वापर करत असतो. उबदार कपडे घातले की थंड हवेचा आणि गारव्याचा त्रास होत नाही. त्यामुळे हिवाळा लागला की थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, लेदर जॅकेट, हुडी, शॉल, मफ्लर, स्टोल, थर्मल्स, श्रग, कानटोपी, हातमोजे, पायमोजे यांनी बाजारपेठ फुलून जाते. हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी हे उबदार कपडे मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल असतो. मात्र हे ठेवणीतले उबदार कपडे फक्त हिवाळ्याचे चार महिनेच कपाटाबाहेर असतात.
त्यानंतर पुन्हा वर्षभरासाठी ते कपाटात ठेवून दिले जातात. कधी कधी थंड हवेच्या ठिकाणी जाताना पुन्हा आपल्याला त्यांची आठवण येते. यातील बरेचसे लोकरीचे कपडे अतिशय नाजूक आणि हलके असतात. जर आपण हे कपडे चुकीच्या पद्धतीने धुतले आणि वाळवले तर ते खराब होण्याची अधिक शक्यता असते. लेदर जॅकेट्स आणि बुट्स तर फारच नाजुकपणे सांभाळावे लागतात. आजच्या लेखात हिवाळ्यात आपण आपल्या लोकरीच्या कपड्यांची कशी काळजी घ्यायची याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोतं.
1) उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळावे.
तुम्ही तुमचे उबदार कपडे कसे धुता हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण घाईघाईत सर्वच कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकतो. मात्र उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे खराब होतात. तुमच्या प्रत्येक कपड्यावर विकत घेताना एक लेबल लावलेलं असतं. त्यावर ते कसे धुवाव याच्या सूचना दिलेल्या असतात. त्या पाळल्यास तुमच्या कपड्यांचं नुकसान होत नाही. लोकरीचे अथवा उबदार कपडे वॉशिंग मशीनमध्ये न धुता हलक्या हाताने टबमध्ये धुवावेत.
2) उबदार कपडे धुण्यासाठी डिर्टंजटचा वापर करू नये. लोकरीचे कपडे धुण्यासाठी खास सौम्य फॅब्रिक वॉश बाजारात मिळतात. अशा फॅब्रिक वॉश अथवा एखाद्या सौम्य शॅंम्पूने हे कपडे धुतल्यास या कपड्यांचा मऊपणा तसाच राहतो.
3) लोकरीचे कपडे कधीच उन्हात सुकवू नये. हिवाळ्यात कपडे लवकर सुकण्यासाठी उन्हात कपडे वाळत घातले जातात. मात्र बऱ्याचदा लोकरीच्या कपड्यांना डाय करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर केलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे कपडे उन्हात वाळत घालता तेव्हा त्यांचा रंग फिकट होण्याची दाट शक्यता असते.
4) लोकरीचे कपडे घट्ट पिळून अथवा हॅंगरवर अडवून सुकवू नयेत कारण त्यामुळे त्यांचा आकार बदलण्याची दाट शक्यता असते. थंड हवेच्या ठिकाणी असे कपडे सुकवण्यासाठी खास ड्रायरचा वापर केला जातो. तुम्ही हलक्या हाताने त्यातील पाणी काढून ते कपडे सुकवण्याच्या स्टॅंड अथवा दोरीवर लटकवून सुकवू शकता.
5) इस्त्री करतांना विशेष काळजी घ्यावी.
प्रत्येक कापडाला इस्त्री करताना निरनिराळ्या तापमानाची गरज असते. लोकरीच्या कपड्यांना अगदी कमी तापमानावर इस्त्री करावी. शिवाय काही स्वेट टीशर्टंना आतील बाजूने हलक्या तापमानावर इस्त्री करावी लागते नाहीतर ते जळण्याची शक्यता जास्त असते.
6) लेदरचे कपडे अथवा लेदरचं जॅकेट अगदी काळजीपुर्वक हाताळावे.
लेदरचे कपडे अथवा लेदरचं जॅकेट तुम्ही ते कसं ठेवता हे खूप महत्त्वाचं आहे. लोदरचे कपडे तुम्ही धुवू शकत नाही. यासाठीच बाहेरून घरी आल्यावर ते थोड्यावेळ मोकळ्या हवेत ठेवून द्यावे. कारण आपल्या शरीराचा घाम त्यामध्ये मुरण्याची शक्यता असते. जरी तुम्ही ते धुवू शकला नाही तरी एखाद्या मऊ केस असलेल्या ब्रशने ते तुम्ही वरच्यावर स्वच्छ नक्कीच करू शकता असं केल्यामुळे त्यावरील धुळ निघून जाते.
7) तुमचे लोकरीपासून तयार केलेले अथवा इतर सॉफ्ट कपडे धुतल्यानंतर चांगले वाळवल्याशिवाय कपाटात ठेवू नका. लोकरीच्या कपड्यांची घडी घातल्यावर दोन कपड्यांच्या आतील भागात टिश्यू पेपर अथवा बटर पेपर ठेवा. ज्यामुळे इतर कपड्यांचे रंग त्यांना लागणार नाहीत. सुकलेला सोनचाफ्याची फुलं अथवा कडूलिंबाची सुकलेली पानं एखाद्या सुती कापडात गुंडाळून कपाटात ठेवा. ज्यामुळे तुमच्या कपड्यांना हवेतील आर्द्रतेमुळे येणारा घाणेरडा वास येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.