...तेव्हा मिळते भाकर!

महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य बनवत असतात. मात्र, महिलांनी त्याचे मार्केटिंग करण्यासाठी संकोच बाळगू नये.
Amruta More
Amruta Moresakal
Updated on

- अमृता मोरे, ओम साई महिला गृह उद्योग धामणेर (ता. कोरेगाव, जि. सातारा)

महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य बनवत असतात. मात्र, महिलांनी त्याचे मार्केटिंग करण्यासाठी संकोच बाळगू नये. आपल्या पदार्थ्यांचे मार्केटिंग केल्यास निश्चितच फायदा होतो, हे मी माझ्या स्वानुभवातून सांगत आहे. माझे शिक्षण बीएस्सीपर्यंत झाले आहे. पती मयूर हे रंगकाम व्यावसायिक आहेत. मला शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची आवड होती. त्या दृष्टीने मी बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला.

इंटरनेट; तसेच पेपर वाचनातून मी विविध व्यवसायाची माहिती घेण्यात सुरुवात केली. या दरम्यान मला सोलापुरी भाकरी बनवण्याचा व्यवसाय समजला. सोलापूर येथील लक्ष्मी बिराजदार यांच्या पापड भाकरीनिर्मिती उद्योगाची मला माहिती मिळाली. मला या उद्योगाची संकल्पना आवडली. पती मयूर, सासू छायाबाई आणि सासरे अशोक मोरे यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी या उद्योगास सुरुवात करण्यासाठी पाठिंबा दिला. मी लक्ष्मीताई यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली.

आमच्या सातारा जिल्ह्यात ज्वारी, बाजरी सहज उपलब्ध होते; तसेच भाकरीला स्थानिक ग्राहकही मिळू शकतात हे लक्षात आले. त्यानुसार मग मी भाकरीनिर्मिती आणि विक्रीच्या अर्थकारणाचा अभ्यास करून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

अशी केली सुरुवात

मी २०२१ मध्ये श्री ओमसाई महिला गृह उद्योग या नावाने ज्वारी, बाजरी भाकरी निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी घराशेजारी पत्राचे शेड तयार केले. सुरुवातीस परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करून घरगुती पातळीवर भाकरीनिर्मितीला सुरुवात झाली.

चार महिलांना सोबत घेऊन मी भाकरीनिर्मिती सुरू केली. या महिलांना मी आणि सासू छायाबाई यांनी पापड भाकरीनिर्मितीचे धडे दिले. स्थानिक प्रदर्शनात जाहिरात करण्यात सुरुवात केली. हळूहळू भाकरीस मागणी होऊ लागल्याने उत्साह वाढू लागला. पती आणि सासऱ्यांच्या मदतीने गाव परिसरातील हॉटेल, धाबाचालकांशी संवाद साधून पापड भाकरीची माहिती देण्यास सुरुवात केली. स्थानिक ठिकाणी गरम भाकरी; तसेच इतर ठिकाणी पापड भाकरी याप्रमाणे विक्रीचे नियोजन मी केले.

पहिली दोन वर्षे भाकरीनिर्मितीचा व्यवसाय चार महिलांच्या मदतीने करत होते. ज्वारी, बाजरी भाकरीला मागणी वाढल्याने मग या व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून मी दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाच्या रकमेतून भाकरी बनविण्याची स्वयंचलित यंत्र, पीठ मळणी यंत्र आणि इतर आवश्यक गोष्टी खरेदी केल्या. पूर्वीच्या पत्र्याच्या शेडचे नूतनीकरण केले. यांत्रिकीकरणामुळे कष्ट कमी झाले. कमी वेळेत जास्त प्रमाणात भाकरी निर्मिती सुरू झाली. या यंत्रामुळे दररोज एक हजार भाकरी करता येतात.

सध्या दररोज ५०० भाकऱ्यांचा पुरवठा परिसरातील हॉटेल व्यावसायिक; ग्राहकांना केला जातो. भाकरीच्या बरोबरीने ज्वारीचे पापड, फ्राय पापड, उडीद, लसूण, नाचणी पापड निर्मिती सुरू केली आहे. रुद्र पापड या नावाने ते बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत.

घरच्यांची साथ मोलाची...

भाकरीनिर्मिती व्यवसायात सासूबाई छाया, सासरे अशोक, पती मयूर यांची चांगली मदत आणि मार्गदर्शन मिळाले आहे. याचबरोबरीने तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, मंडळ कृषी अधिकारी डी. टी. शिंदे, जिल्हा प्रकल्प समन्वयक आरती साबळे़, तसंच मंगेश कुंभार, गणपत गायकवाड, अरीफ मुलाणी यांचे वेळोवेळी सहकार्य मिळते.

(शब्दांकन - संजय शिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()