सध्या प्रत्येकजण एका दबावाखाली असतो. कुटुंबाचे, कामाचे, आर्थिक घडी बसवण्याचे टेन्शन प्रत्येकाला असते. काही लोक तर या तणावाच्या ओझ्याखाली इतके दबतात की आत्महत्या करण्याचा विचार करतात. प्रश्न असा पडतो की, माणूस किती ताण सहन करू शकतो.
कधी कधी कामाचा ताण इतका वाढतो की तो मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. केरळच्या ॲना सेबॅस्टियन पेरिल या २६ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा पुण्यात मृत्यू झाला, कथितपणे कामाच्या जास्त दबावामुळे तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
चेन्नईतील एका 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने कामाच्या अत्याधिक दबावामुळे आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयन यांनी विजेचा शॉक घेऊन आपले जीवन संपवले. गेल्या दोन महिन्यांपासून ते नैराश्याच्या आजारावर उपचार घेत होते. कामाच्या दबावामुळे ते मानसिक त्रासात होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्याची भारतातली ही काही पहिलीच केस नाही. याआधी बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी कामाचा ताण जास्त असल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. याच वर्षी मे महिन्यात मध्य प्रदेशमधील एका प्रायव्हेट बँकेत असलेल्या मॅनेजरने आत्महत्या केली होती.
हे पाऊल उचलण्याआधी त्याने बहिणीला फोन करून मला कामाचा अधिक ताण आहे, मला तो सहन होत नाही. आणि मी पुन्हा घरी कधीच परतणार नाही, असा निरोप दिला होता. तर याच वर्षी उत्तर प्रदेश मधल्या एका पोस्टमास्तराने फाशी घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पोस्टमास्तर नेहमी कामाच्या व्यापात व्यस्त होता. कधी कधी त्याचं टेन्शन घेऊन सुद्धा ते बसायचे. सहा महिन्यापूर्वी त्यांना नोकरी लागली होती पण त्यांनाही नोकरी मनापासून करायची इच्छा नव्हती त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले.