World Breastfeeding Week: गर्भातून काळजाचा तुकडा सुखरूप बाहेर यावा, यासाठी आई नऊ महिने वेदना सहन करते. यातूनच तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे मातृत्व जपले जाते. यामुळेच जन्माला आलेल्या शिशूला आयुष्यमान बनवण्यासाठी आईचे दूध अमृतासमान आहे.
आई आणि बाळ यांच्यातील भावनिक नाते स्तनपानापासून सुरू होते. आईचे दूध बाळासाठी आयुष्यभराचे ‘टॉनिक’ आहे. योग्यरीत्या बाळाला स्तनपान दिल्यास १९ ते २६ टक्के अर्भकांचे मृत्यू टाळता येतात, असे मत स्त्री व प्रसूतीरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने स्तनपानाचे महत्त्व सांगितले जात आहे. यावर्षीच्या स्तनपान सप्ताहासाठी ‘आई आणि बाळामधील अंतर कमी करूया, स्तनपानाला समर्थन देऊया’ ही थीम निश्चित करण्यात आली. या थीमद्वारे नवजात बालकांचे वडील, त्यांचे कुटुंब, आरोग्यसेवा प्रदाते आणि संपूर्ण समाजाचा स्तनपानाला पाठिंबा घेण्यावर भर देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर बाळाला दिवसातील ठरावीक वेळी स्तनपान करणे फायद्याचे असल्याची भावना स्त्री व प्रसूतीरोगतज्ज्ञांनी बोलून दाखवली. आई दिवसातून केव्हाही आपल्या बाळाला स्तनपान करू शकते. पण, रात्रीच्या वेळी बाळाला दूध पाजल्याने जास्त लाभ होतो. रात्रीच्या वेळी शरीरात प्रोलेक्टिन हार्मोन जास्त असते आणि बाळालासुद्धा रात्रीच्या वेळी जास्त भूक लागते. एक ते सहा महिन्यांचे बाळ रात्री आपल्या भुकेच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त दूध पिते.
बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
योग्यरीत्या स्तनपानातून बाळाची योग्य वाढ होते
बाळाला श्वसनविकारापासून दूर ठेवता येते
बाळाला मधुमेहाचा धोका कमी असतो
बाळाचा पोटाच्या संसर्गापासून बचाव होतो
बाळ हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाइप बी पासून बचावते
न्यूमोनिया होण्याची जोखीम कमी असते
मेनिन्जायटिसपासून बाळाला दूर ठेवता येते
लघवीच्या जागी होणारा संसर्ग रोखता येतो
पहिल्या दुधातून बाळाची झोपही पूर्ण होते.
बाळासोबतच आईचादेखील जन्म होत असतो. स्तनपानाने आईच्या शरीरात काही हॉर्मोन्स निर्मित होतात. यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो. आईच्या दुधाला पूर्ण अन्न असे म्हटले जाते. त्यामुळे किमान पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचेच दूध द्यावे. यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. थेट स्तनपान होत असल्याने इन्फेक्शनचा धोका नसतो.
- डॉ. विजय कल्याणकर उपविभाग प्रमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, घाटी रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.