गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जागतिक पातळीवर सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. हिवताप अर्थात मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट होते; मात्र समूळ उच्चाटन होत नाही. जोपर्यंत डासोत्पत्ती आहे, तोवर मलेरियाचे उच्चाटन अशक्य आहे. दरवर्षी आरोग्य विभागात जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. जनजागृती केली जाते. तरीही दरवर्षी मलेरियाचे तब्बल १० हजार रुग्ण पूर्व विदर्भात आढळतात.
प्लाझमोडीअम या परोपजीवी जंतूंमुळे होणाऱ्या हिवतापावर मात करायची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांबरोबर जनतेचा सहभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव करू शकतो. हिवतापाचे रुग्ण आढळत असले तरी, उद्रेक होऊ नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभाग करीत आहे. यामुळेच हिवतापावर नियंत्रण असून, दरवर्षी घट दिसून येते.
हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे
ताप सततचा असू शकतो
तापानंतर घाम येतो
अंग गार पडणे
डोके दुखणे
बऱ्याच वेळा उलट्या होतात
आरोग्य विभाग राबवते प्रतिबंधात्मक उपाययोजना
रुग्ण शोधणे
रुग्णावर उपचार करणे
डास नियंत्रण
औषधोपचार
डासांची उत्पत्तीस्थाने व्हावी नष्ट
साचलेल्या पाण्यात मलेरियाचे डास होतात. अर्थात भात शेती, पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्यात मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. ‘ॲनापिलस’ डासांची मादी हिवतापाचा संसर्ग पसरविते. मादी चावल्यावर रक्तासोबत हिवतापाचे जंतू पोटात जातात. शरीरात ते जंतू यकृतमध्ये जातात, त्यांची वाढ होऊन दहा दिवसात थंडी वाजून ताप येतो.
नागपूर मुक्त होतोय का?
नागपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून हिवतापबाधितांची (मलेरिया) संख्या कमी होत आहे. यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात केवळ एक बाधित आढळला. त्यामुळे नागपूर जिल्हा हिवताप निर्मूलनाच्या दिशेने प्रवास करत आहे, अशी चर्चा आरोग्य विभागात रंगली आहे. जिल्ह्यात २०२१ मध्ये हिवतापाचे ७ रुग्ण आढळले होते. तर २०२२ मध्ये रुग्णसंख्या १२ होती. २०२३ मध्ये ५ रुग्ण आढलले. १ जानेवारी ते एप्रिलदरम्यान केवळ एक रुग्ण आढळला.
नागपूर आरोग्य विभागाने पूर्व विदर्भात वेळोवेळी कीटकनाशक फवारणीसह इतर उपाय केले. यंदा वेळी अवेळी पाऊस येतो; मात्र गतवर्षीच्या तुलनेत हिवतापाची रुग्णसंख्या कमी आहे. ती आणखी खाली आणण्याचे प्रयत्न आहे. दशकापूर्वीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मलेरियाबाधितांची संख्या कमी झाली. सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत आढळतात. नागपूर जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
-डॉ. श्याम निमगडे, सहायक संचालक (हिवताप),
सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.