Sangli Lok Sabha : सांगलीत ईर्ष्येने 61 टक्क्यांवर मतदान; तीन पाटलांचे भवितव्य यंत्रात कैद

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) हेही आपले नशीब आजमावत आहेत.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Updated on
Summary

भाजपने देशात दुसऱ्या यादीत सांगलीची उमेदवार संजय पाटील यांना जाहीर करून आघाडी घेतली होती.

सांगली : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) अपवाद वगळता चुरशीने आणि शांततेत ६१ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली, मात्र सुमारे १२० ठिकाणी रात्री सातनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे मतांचा टक्का वाढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार ११ लाख २० हजारांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी (ता. ८) दुपारी दोन वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे.

भाजप उमेदवार खासदार संजय पाटील (Sanjay Patil) विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर, अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) असा थेट सामना झाल्याचे चित्र आज दिसले. शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) हेही आपले नशीब आजमावत आहेत. या तीनही पाटलांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले. ४ जून रोजी निकाल असेल. तोवर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात रवाना केल्या. तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.

Sangli Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : 192 ज्येष्ठांनी गमावला मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

सकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर श्रीफळ वाढवून जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा अधिक असल्याने सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान खेचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. सांगली, मिरज, विटा, तासगाव या शहरांत त्याला प्रतिसाद मिळाला, मात्र ग्रामीण भागात संथ मतदान झाले. सकाळी नऊपर्यंत ५.८१ टक्के, दुपारी एकपर्यंत २९.६५ टक्के, दुपारी ३ पर्यंत ४१.३० टक्के, सायंकाळी ५ पर्यंत ५२.५६ टक्के आणि सहा वाजेपर्यंत ५८ टक्के मतदानाची नोंद झाली. गुलाबी मतदान केंद्र, इको फ्रेंडली मतदान केंद्र, सेल्फी पॉईंट असे विविध प्रयोग लक्षवेधी ठरले. अपंग मतदारांसाटी व्हील चेअर, सावलीसाठी मंडप, उन्हामुळे शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती.

भाजपने देशात दुसऱ्या यादीत सांगलीची उमेदवार संजय पाटील यांना जाहीर करून आघाडी घेतली होती. महाविकास आघाडीत शिवसेनेने कुरघोडी करत सांगलीची जागा घेतली आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी झगडा करत विशाल पाटील यांनी अखेर बंड केले. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीने राज्याचे लक्ष वेधले. यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची, अस्मितेची, स्वाभिमानाची करण्यात आली. देश, राज्य पातळीवर नेत्यांच्या फौजा सांगलीत आल्या. गल्ली ते दिल्ली अनेक मुद्दे चर्चेत आले. कार्यकर्ते आक्रमक झाले. सोशल मीडियाचा प्रचंड वापर करण्यात आला.

एकमेकांवर व्यक्तिगत हल्ले करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर कालची रात्र जागून काढलेल्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मतदान केंद्र गाठले आणि हळूहळू मतदानाचा माहोल तापत गेला. सोबतीला उन्हही तापले. सकाळी दहापासूनच सूर्य आग ओकत होता. दुपारी चारपर्यंत उन्हाचा ताव होता. या काळात मतांचा टक्का घसरला. सायंकाळी चारनंतर पुन्हा मतदानाने वेग पकडला. सायंकाळी सहापूर्वी मतदान केंद्रावर दाखल झालेल्या शेवटच्या मतदाराने हक्क बजावण्यापर्यंत केंद्र सुरू ठेवण्याचा नियम आहे. त्यानुसार सायंकाळी साडेसातपर्यंत १२० ठिकाणी मतदान सुरू होते.

Sangli Lok Sabha
Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

हरिपूरमध्ये तणाव

हरिपूर (ता.मिरज ) येथे सायंकाळी चारनंतर सर्वच केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले. दोन केंद्रांवर तर सायंकाळी साडेसातपर्यंत मतदान सुरू होते. दोन अडीच तास मतदार रांगांमध्ये थांबून होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मतदान केंद्र क्रमांक २८५ मधील ईव्हीएम बंद पडले. नागरिक वैतागून गेले. केंद्राधिकाऱ्याने मतदान प्रक्रियेस विलंबाचे कारण स्पष्ट न केल्याने मतदार संतापले. एका कर्मचाऱ्याने मतदारांशी हुज्जत घातली. नागरिकांनी फैलावर घेताच मतदान खोलीचे दारच बंद केले गेले. कर्मचाऱ्यांच्या या वर्तनामुळे कार्यकर्तेही वैतागले. काही काळ तणाव निर्माण झाला.

लिंगनूरमध्ये बाचाबाची

मिरज तालुक्यातील लिंगनूर येथे भाजप समर्थक आणि विशाल पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढल्याच्या आणि त्याकडे यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तक्रार झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेण्यात आली. पोलिस यंत्रणा तेथे दाखल झाली आणि कार्यकर्त्यांना केंद्राबाहेर काढण्यात आले.

Sangli Lok Sabha
Kolhapur : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान; निकाल 4 जूनला

विधानसभानिहाय टक्केवारी

  • मिरज : ५९.९९ टक्के

  • सांगली : ५७.५० टक्के

  • पलूस-कडेगाव : ५६.४४ टक्के

  • खानापुर-आटपाडी : ५१.११ टक्के

  • तासगाव : ६१.१६ टक्के

  • जत : ५९.३२ टक्के

(ही आकडेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची आहे)

२९ यंत्रात बिघाड

मतदान सुरू झाल्यानंतर दिवसभरात १७ व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बदलण्यात आले. याशिवाय चार कंट्रोल युनिट (सीयु) तर आठ बॅलेट युनिट (बीयु) मध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्याठिकाणी दुसरी यंत्रे बसवली. तसेच मॉकपोलवेळी सीयु ६, बीयु ७ आणि ११ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

५०० सैनिकांचे मतदान

जिल्हा प्रशासनातर्फे सैनिकांसाठी सहा हजार ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड बॅलेट’ पाठवण्यात आले होते. सैनिक त्याची प्रिंट काढून मतपत्रिकेवर मतदान करुन पोस्टाद्वारे ते पाठवत आहेत. आतापर्यंत ५०० मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जूनला सकाळी आठ वाजेपर्यंतची मतपत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील केवळ ६ जणांनाच अधिकार मिळाला आहे. निवडणूक कामातील अधिकारी, कर्मचारी यांनी फॅसिलिटी सेंटरमध्ये मतपत्रिकेवर मतदान केले.

Sangli Lok Sabha
Satara Lok Sabha : साताऱ्यात चुरशीने 63.07 टक्के मतदान; प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?

जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे

सांगली : ईव्हीएमवरील मतदानाचे फोटो व्हायरल केल्याने तसेच पोलिंग एजंट नेमण्यावरून वाद झाल्याने दोन ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. भगत मळा वडीये रायबाग (ता. कडेगाव) लखन दगडू भगत (वय ३४) याने मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनवर मतदान केल्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यावरून चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडला.

मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यासाठी बंदी असताना फोटो घेतला. तसेच हे फोटो सोशल मीडियावर टाकून गोपनियतेचा भंग केला, तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. साखराळे गावातील समाज भवन मतदान केंद्रात पोलिंग एजंट नेमण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हरीपूर येथे मतदानासाठी रांगेत पुढे जाण्याच्या कारणावरून एका व्यक्तीसोबत किरकोळ बाचाबाची आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मात्र, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com