Kolhapur : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान; निकाल 4 जूनला

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्‍ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त होता.
Kolhapur Voting
Kolhapur Votingesakal
Updated on
Summary

कोल्हापुरात प्रमुख लढत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यात आहे.

कोल्हापूर : स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काल (मंगळवार) चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान (Kolhapur Voting) झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान, मतमोजणी चार जूनला होणार आहे.

Kolhapur Voting
Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

चंदगड शहरातील किरकोळ वादावादी आणि हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील साखराळे (ता. वाळवा) येथील केंद्रावर हमरा-तुमरी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली. या दोन्ही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला होता. त्याचे प्रतिबिंब आज मतदानतही उमटले होते. उन्हाचा तडाखा असूनही मतदारांनी उत्साह कायम राखला.

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्‍ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त होता. काही संवेदनशील केंद्रावर शस्त्रधारी बंदोबस्त होता. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा होत्या. कोल्हापूर मतदारसंघातून प्रमुख उमेदवारांसह २३ तर हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरात उमेदवार जास्त असले तरी प्रमुख लढत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यात आहे.

हातकणंगलेमध्ये विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत आहे. काल चुरशीने मतदान झाले. सायंकाळनंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा होत्या. केंद्राबाहेर मतदारांच्या स्वागतासाठी त्या त्या परिसरातील प्रमुख नेते, कार्यकर्ते थांबून होते. अनेक नेत्यांनी आपापल्या बालेकिल्ल्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवले. कोल्हापूर मतदारसंघात सकाळी नऊला ११ टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदारांचा प्रतिसाद चांगला होता.

हातकणंगलेमध्ये पहिल्या टप्प्यात आठ टक्के मतदान झाले. सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूरसाठी २०.७४ टक्के, तर हातकणंगलेसाठी २३.७७ टक्के मतदान झाले होते. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी मतदानाचा वेग कमी झाला. संध्याकाळी चारनंतर मात्र पुन्हा मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात ६३.७१ टक्के मतदान झाले. हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले. काही अपवाद वगळता मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान यंत्रे आणि मतदान साहित्य विधानसभानिहाय असणाऱ्या संकलन केंद्रावर आणण्यात आले. तेथून ही मतदानयंत्रे जीपीएस असणाऱ्या कार्गो वाहनातून स्ट्राँगरूममध्ये रात्री उशिरा आणण्यात आले. कोल्हापूर मतदारसंघातील मतदानयंत्रे रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आले आहेत, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानयंत्रे राजाराम तलाव येथील पाटबंधारे विभागाच्या गोदामात ठेवण्यात येणार आहेत. मतदानयंत्रे ठेवण्यापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनकडून याची पडताळणी करण्यात आली. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत स्ट्राँगरूममधील मतदानयंत्रे ठेवण्यात आली आहेत.

Kolhapur Voting
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : 192 ज्येष्ठांनी गमावला मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

सकाळी सातपूर्वीच लोक केंद्रावर

मतदान सकाळी सातला सुरू झाले; पण शहरासह ग्रामीण भागातील काही केंद्रांवर सातपूर्वीच लोकांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. यातून मतदारांत उत्साह दिसून आला. दिवसभर मतदारांचा हाच उत्साह टिकून राहिला. त्यामुळे प्रक्रियेची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर रांगा होत्या. उन्हाच्या तडाक्यातही ग्रामीण भागात मतदानासाठी लोक बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.

परदेशस्थ तरुणांचे गावात येऊन मतदान

शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात असणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदारांनीही आज मतदानासाठी कोल्हापुरात हजेरी लावली. कुटुंबीयांसह त्यांनी मतदानावर भर दिला. त्यानंतर त्यांनी सेल्फी सेलिब्रेशनही केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे वॉररूममधून नियंत्रण

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी वॉररूममधून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले. त्यापूर्वी त्यांनी सपत्नीक दत्ताबाळ हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना भेट दिल्या.

Kolhapur Voting
Satara Lok Sabha : साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल; माजी मुख्यमंत्र्यांना विश्वास

झाडांच्या सावलीचा आधार...

शिवाजी पेठेतील दौलतराव भोसले विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी सातपासूनच रांग होती. मतदारांची रांग रस्त्यावर होती. नऊनंतर उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे मतदारांना रस्त्यावरील झाडाच्या सावलीत रांग लावावी लागली. येथे मंडपवाल्यांकडून मंडप घालणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले.

एक टेबल, दोन खुर्च्या

जवाहरनगर, सुभाषनगर परिसरात एकाच बूथवर चार-पाच टेबल आणि वीस-पंचवीस खुर्च्यांवर कार्यकर्ते बसून होते. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सर्वांना हटवून एक टेबल-दोन खुर्च्यांच ठेवण्याच्या सूचना पोलिस जीपमधूनच दिल्या. यामुळे बूथवरील कार्यकर्त्यांची गर्दीही पागंली. सकाळी नऊला असलेली ही स्थिती अकरानंतर पुन्हा जैसे थे झाली.

नाश्‍ता, टेबलची कोण व्यवस्था करणार?

शहरातील अनेक बूथवरील कार्यकर्त्यांना टेबल लावण्यापासून ते नाश्‍तापर्यंत सुविधा न मिळाल्यामुळे काही माजी पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. खुद्द उमेदवारांनाही माहिती देऊन त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील नियोजन दिलेल्या नेत्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पक्षाच्या प्रमुखांकडे तक्रारी आल्या.

एकच रिक्षा कशी येते?

शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळ १३ केंद्रांवर मतदान होते. येथे रिक्षांतून महिला, ज्येष्ठ येत होते; मात्र त्यांची रिक्षा मतदान केंद्रावर सोडली जात नव्हती. रिक्षाचालक मतदारांना चालता येत नाही म्हणून सांगत होते; मात्र पोलिसांनी रिक्षा आत सोडणार नाही, असे सांगितले. काही क्षणात रिक्षातील महिला चालत केंद्रात पोचल्या. यावर पोलिसांनी सकाळपासून अनेक मतदारांना ही एकच रिक्षा कशी दिसते, असे विचारले.

Kolhapur Voting
रामराजेंपासून उदयनराजेंपर्यंत.. सातारा-माढा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सन्मानपत्रावर व्याकरणाच्या चुका

ज्येष्ठ आणि दिव्यांगांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केल्यास त्यांना सन्मानपत्र दिले जात होते. हे माहिती असणारे ज्येष्ठ सन्मानपत्र आवर्जून मागून घेत होते. केंद्राध्यक्षांनीही खात्री सन्मानपत्र दिले. काही दिव्यांगांनी त्याच सन्मानपत्राचा व्हॉटस ॲपवर स्टेटस लावले. या सन्मानपत्रावर जिल्हाधिकाऱ्यांची सही आहे; मात्र व्याकरणाच्या चुकाही आहेत.

मतदारांना नेण्यासाठी चढाओढ

उपनगरात ज्येष्ठांना, महिलांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत चुरस होती. ज्या गल्लीत एका उमेदवाराची गाडी जाईल. तेथे दुसऱ्या उमेदवाराची गाडी आणून उभी केली जात होती. एका रिक्षात एकाच मतदाराला कार्यकर्ते घेऊन जात होते. यामुळे बूथ लेव्हलला कार्यकर्त्यांमध्ये ईर्ष्या दिसून आली.

स्टेटस्‌वरून दिले संकेत

मतदान करून आल्यानंतर अनेकांनी व्हॉटस ॲप स्टेटसवर आपण मतदान केल्याची छायाचित्रे अपलोड केली. यामध्ये काहींनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या फोटोजवळ बोटाला शाई लावलेले दाखवून ‘मान गादीला, मत गादीला’ असे स्टेटस ठेवले. काहींनी कुटुंबीयांसह शाईचे बोट दाखवून ‘जय श्रीराम.. जय शिवराय... जय शाहू...’ असे लिहून मतदान कोणाला केले, याचे संकेत दिले.

Kolhapur Voting
Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी (संध्याकाळी पाचपर्यंत)

कोल्हापूर

  • चंदगड ६८.१८

  • कागल ७३.८०

  • करवीर ७८.८९

  • कोल्हापूर उ ६४.५४

  • कोल्हापूर द ६९.८०

  • राधानगरी ६६.६८

हातकणंगले

  • हातकणंगले ७०.००

  • इचलकरंजी ६६.०५

  • इस्लामपूर ६७.२०

  • शाहूवाडी ७०.९६

  • शिराळा ६५.९६

  • शिरोळ ६८.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.