नाशिक : लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा रणसंग्राम संपल्यावर आता सोमवारी (ता. २०) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघांसह धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. ‘मीच निवडणार माझा खासदार’ हे घोषवाक्य प्रशासनाने तयार केले असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
नाशिकमध्ये ३१, तर दिंडोरीत दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मतदारांसाठी दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्र, प्रत्येक मतदान केंद्रावर वॉटरप्रूफ मंडप, दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर, ८५ वर्षांवरील व्यक्तींचे घरूनच मतदान आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्च २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली.
महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या. यात सर्वांत शेवटच्या पाचव्या टप्प्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा समावेश असल्याने अगदी शेवटच्या काही दिवसांत प्रचाराची रंगत वाढली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शनिवारी सायंकाळी सहाला थांबल्या आणि उमेदवारांनी मतदानापूर्वी दोन दिवस अंडरग्राऊंड प्रचार केला. सोशल मीडिया, फोन कॉल्स आणि मेसेज यावरून प्रचार सुरूच राहिला.
चार हजार मतदान केंद्र
जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत चार हजार ८०० मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात अनिवासी भारतीय ५६ मतदार आहेत. तृतीयपंथी ११४ मतदार असून, दिव्यांग मतदारांची संख्या १९ हजार २८७ इतकी आहे. सर्वाधिक चार लाख ३८ हजार ३७५ एवढी मतदार संख्या नाशिक पश्चिम मतदारसंघात असून, सर्वांत कमी दोन लाख ७० हजार १९६ मतदार हे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात आहेत. नाशिक जिल्ह्यात स्त्री-पुरुष मतदार संख्या गुणोत्तर ९१९ इतके असून, सर्वाधिक गुणोत्तर ९६५ इतके कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.