Aditya Thackeray Interview : आजचा भाजप विश्‍वासघातकी ; आदित्य ठाकरे,कधीच सोबत जाणार नाही

लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे. त्यानंतरच्या संभाव्य घडामोडींमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतील, अशा चर्चांवर साफ पडदा टाकताना आदित्य ठाकरे यांनी ‘‘इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी शंभर कोटी भारतीयांचे चेहरे आहेत. भाजपकडे एकच चेहरा आहे.
Aditya Thackeray Interview
Aditya Thackeray Interviewsakal
Updated on

लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे. त्यानंतरच्या संभाव्य घडामोडींमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतील, अशा चर्चांवर साफ पडदा टाकताना आदित्य ठाकरे यांनी ‘‘इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी शंभर कोटी भारतीयांचे चेहरे आहेत. भाजपकडे एकच चेहरा आहे. अशा राजकारणाचा देशाला धोका आहे,’’ असा आरोपही त्यांनी केला. ‘‘जोपर्यंत भाजपमध्ये हुकूमशाही, लोकशाहीविरोधी वृत्ती आहे, तोपर्यंत त्यांच्यासोबत जायचा विषयच नाही. हा विरोध केवळ व्यक्ती म्हणून मोदी-शहा यांना नाही तर त्यांच्या पक्षाच्या प्रवृत्तीबद्दल आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही. आम्ही देशातील जनतेसोबत असणार आहोत,’’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

‘हृदयात राम आणि हाताला काम’ असे आमचे हिंदुत्व आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे नुकसान होत आहे. नकली शिवसेना, नकली संतान, भटकती आत्मा अशी वक्तव्ये करून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. महाराष्ट्राला गृहित धरले जात आहे. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशाराही आदित्य यांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत वीस मे रोजी मतदान होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रचाराचा आढावा घेतानाच अनेक मुद्द्यांवर आदित्य यांनी भाष्य केले. मुलाखतीतील ठळक मुद्दे असे -

महाराष्ट्राला काय मिळाले?

भाजपचे सरकार गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि साडे आठ वर्षे महाराष्ट्रात आहे. पण यातून महाराष्ट्राला काय मिळाले, हा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे गुजरातला पळविणे, शेतीमालाला भाव नाही अशी महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. त्यात परत हे घटनाबाह्य मिंधे सरकार आले. महाराष्ट्रासाठी भाजपने काय दिले याचा विचार मतदारांनी करावा, असे आम्ही सांगत आहोत. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. भाजपने कान बंद करून घेतले आहेत, त्यांना जनतेचा आवाज ऐकायचा नाही. राज्यात पक्ष फोडून मिंधे सरकार आल्यानंतर गेली अडीच वर्षे मुंबईसह राज्यभर मी फिरतो आहे. जिथे जिथे अन्याय अत्याचार झाला त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो. शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित केले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत.

सरकारचे गैरव्यवहार

गेल्या दहा वर्षांच्या काळात भाजपकडून मुंबईला संपविण्याचा आणि महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले. हिऱ्यांचा व्यापार स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला. उद्योगपतींना गुजरातला जाण्यासाठी धमकावले. मुंबईतील कष्टकऱ्यांना वसई-विरारमध्ये स्थलांतरित करायचे, असे भाजपचे उमेदवार पियुष गोयल सांगतात. धारावीतील भूखंड एकाच उद्योगपतीच्या घशात घातला. यामध्ये मोठा टीडीआर गैरव्यवहार झाला. पोलिसांच्या गृहनिर्माण योजनेतही सहा हजार कोटींचा गैरव्यवहार झाला. आरोप केल्यानंतर त्यातील एक हजार कोटी वाचविण्यात आम्हाला यश आले. पण या सरकारकडून एकही काम पूर्ण होऊ शकले नाही. मेपासून वीजेचे दर वाढविले आहेत. मुंबई महापालिकेच्या ठेवी काढून घेतल्या जात आहेत. असे असेल तर कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देणार?

कर भरणारा तो मुंबईकर

आमचे मुंबईतील सर्व उमेदवार अस्सल मुंबईकर आहेत. मुंबईच्या भावना ते संसदेमध्ये मांडू शकतात. भाजप किंवा मिंधे गटाचे खासदार संसदेत मुंबईचा आवाज उठवूच शकणार नाहीत. त्यामुळेच मुंबईकर महाविकास आघाडीलाच पाठिंबा देतील. मुंबईत जातपात, धर्म असा कुठलाही भेद नाही. सर्वजण मुंबईकर आहेत. भाजपला मुंबईकरांमधला केवळ ‘कर’ दिसतो. मुंबई दिसत नाही. भाजपच्या तावडीतून मुंबई वाचण्याची गरज आहे. भाजपच्या हिंदुत्वापेक्षा ‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे आमचे हिंदुत्व आहे. कोणी काय खावे, कपडे घालावे याचा हिंदुत्वाशी संबंध येत नाही.

गद्दारांचा, उद्योगपतींचा विकास

भाजप सरकारच्या काळात राज्याचा विकास झाला नाही. केवळ गद्दारांचा व ठराविक उद्योगपतींचा विकास झाला. भाजपच्या काळात पुणे विमानतळ रखडले, विस्तारीकरणाला सहा महिने उशीर झाला. मविआ सरकारने मेट्रो कारशेड, मेट्रो मार्ग, कोस्टल रोड यासह अनेक प्रकल्पांना गती दिली. पण भाजपला गेल्या अडीच वर्षांत एकही काम पूर्ण करता आले नाही. निवडणुकीसाठी कोस्टल रोड केवळ सायंकाळी पाच ते आठ पर्यंत खुला केलेला आहे.

‘एक अकेला सब से भारी’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जरी ठाकरेंवर हल्ला करत असले तरी ‘एक अकेला सबसे भारी’ अशी स्थिती आहे. अन्य कोणाची गरज नाही. ते खोटे बोलत आहेत. आम्ही खरे बोलत आहोत. खरे बोलणारा एकटासुद्धा पुरेसा आहे.

राजकारण स्वच्छ करा

महाविकास आघाडीतील सरकारच्या काळात प्रशासन, शासन कसे चालते हे मला मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून बघायला मिळाले. कोरोनाच्या अनपेक्षित संकटाच्या काळातून आम्ही महाराष्ट्राला बाहेर काढले. शेतकऱ्यांना देखील त्या काळात मदत केली गेली. मात्र, गेल्या अडीच वर्षांत शासनाची व्यवस्था कोलमडून गेली आहे. राज्यातील राजकारण गलिच्छ झाले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी खोक्यांचे आणि धोक्यांचे राजकारण कधीही झालेले नव्हते. पण भाजपकडून अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्रावर लादले जात आहे. ते स्वच्छ झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे.

मी ‘ग्रुम’ झालो नाही ते चांगलेच

मला मुख्यमंत्री करण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली असेल, ती माहिती नाही. तेव्हा जी काही चर्चा झाली ती मातोश्रीमध्येच झालेली होती. त्या सरकारमध्ये ‘ग्रुम’ झालो नाही, हे चांगलेच आहे. पक्ष फोडणे, घर फोडणे यामध्ये मी ‘ग्रुम’ झालेलो नाही हे माझ्या दृष्टीने चांगले आहे.

त्यांचा मुंबईवर राग

भाजप विश्‍वासघातकी पक्ष आहे. नोटाबंदी त्यांनी न सांगता केली. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखले. भाजपच्या ‘डीएनए’मध्येच मुंबईवर राग आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. घाटकोपर येथे होर्डिंग पडून अनेकांचा बळी गेला. त्याच भागातून ते ‘रोड शो’ करतात.

‘‘आजचा भाजप वाजपेयींच्या काळासारखा राहिलेला नाही. आजच्या भाजपमध्ये हुकूमशाही आहे. अशा भाजपसोबत आम्ही कधीही जाणार नाही,’’ असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. तर, ‘‘लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एकमेव मुद्दा आहे. देशाचा कारभार मोदींकडे द्यायचा की ममता बॅनर्जी-राहुल गांधी यांच्यासारख्यांकडे याचा विचार करून जनता मोदींच्या बाजूने मतदान करते आहे. मोदींविरुद्ध बोलण्यासाठी विरोधकांना मुद्दे सापडत नाहीत. त्यामुळेच ते हुकूमशहा, घटना बदलणे असे विषय आणत आहेत,’’ असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुलाखतीत केला.

- सम्राट फडणीस, ब्रिजमोहन पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.