पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारसमोर सध्या मोठे आव्हान आहे. लोकसभेसाठी चांगले चेहरे नसल्याचा फटकाही त्यांना बसताना दिसतोय. प्रमुख पक्ष अकाली दल आणि भाजपही स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत. काँग्रेसकडे अजूनही मजबूत नेत्यांची फौज आहे. त्यांच्या जोरावर त्यांना चांगली कामगिरी करता येऊ शकते. एकंदरीत पंजाबमधील निवडणूक रंगतदार होईल, यात शंका नाही.
पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचे सरकार असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र येथे काँग्रेसचा बोलबाला होता. संपूर्ण देश मोदी लाटेवर स्वार झालेला असताना या राज्यात काँग्रेसने आठ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आणि त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल हेच दोघे या निवडणुकीत विजयी होऊ शकले. फक्त दोनच उमेदवार निवडून आलेले असतानाही हरसिमरत यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. एकंदरीतच पंजाबच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी भाजपला अकाली दलाला सांभाळून घेणे किती महत्त्वाचे होते ते यावरून स्पष्ट होते.
२०२२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ने जोरदार बॅटिंग करत सत्ता काबीज केली. या वेळी भाजप आणि अकाली दर स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत भाजपने ७३ जागा लढवल्या. मात्र, त्याचा त्यांना मताधिक्य वाढविण्यासाठीदेखील फायदा झाला नाही. विधानसभेत पराभव झाल्यानंतर अकाली दल आपल्या जुन्या साथीदारासोबत जाण्यास इच्छुक दिसत होता. मात्र भाजपने त्यांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही. भाजपने ही निवडणूक आपण स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे आता ‘आप’ला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पंजाबमध्ये वेगळे वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बहुधा अशी पहिलीच लोकसभेची निवडणूक असेल जेव्हा अकाली दल आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार होईल यात शंका नाही.
छोट्या पक्षांना महत्त्व
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात या राज्यातील निवडणुका होणार आहेत. त्याला अजून दोन महिन्यांचा अवकाश असला तरी पंजाबमधील राजकीय वातावरण आताच तापायला सुरुवात झालेली आहे. भाजप आणि अकाली दल स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असतानाच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे इंडिया आघाडीचा घटक आहेत. त्यामुळे त्यांचा एकमेकांना फायदा होण्याची शक्यता आहे. याशिवायही अन्य लहान-मोठ्या पक्षांचे छोटे-मोठे गडकिल्ले इथे आहेत. त्यामुळेच पुढचा विचार करून भाजप आणि अकाली दल एकत्र येईल, असे वाटत होते. मात्र त्यांच्या चर्चांना अंतिम रूप येऊ शकले नाही. राज्यातील महत्त्वाच्या शीख नेत्यांना भाजपने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यांना त्यात यश येतानाही दिसते आहे. शीख समुदायाचा आवाज समजल्या जाणाऱ्या स्थानिक राजकीय पक्षांना या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे.
पंजाब राज्यात विविध योजना आणि मोहल्ला कमिट्यांच्या माध्यमातून पेरणी करण्याचे काम भाजप करताना दिसतो. इतर राज्यांप्रमाणेच निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर व्हायला सुरुवात झाली आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. दुसरीकडे त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळण्याची शक्यतादेखील येथील राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. ‘आप’कडे लोकसभेसाठी चांगले चेहरे नसल्याचा त्यांना फटका बसताना दिसतोय. पंजाबच्या मतदारांचा कल नेमका कोणत्या दिशेने आहे, याचा अंदाज लावणेदेखील कठीण वाटते आहे.
काँग्रेसला संधी
दिल्लीच्या सीमेवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला त्याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळेच केंद्राला कायदा मागे घ्यायला लागला. भाजपच्या बाजूने असलेल्या अकाली दलाला या कायद्यांना होणारा वाढता विरोध लक्षात घेता भूमिका बदलावी लागली. त्यामुळेच त्यांना भाजपसोबत घटस्फोट घ्यावा लागला होता. दुसरीकडे २०२२ च्या निवडणुकीत अपयशी ठरलेल्या काँग्रेसला यंदा चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. काँग्रेसमधील काही महत्त्वाचे चेहरे भाजपच्या गळाला लागलेले असले तरी काँग्रेस आणि अकाली दलाकडे अजूनही मजबूत नेत्यांची फौज आहे. त्या नेत्यांच्या जोरावर या पक्षांना चांगली कामगिरी करता येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.