Loksabha Election Result : मुसळधार पावसात भाजपचा जल्लोष ; ‘काय म्हणतात पुणेकर, निवडून आले मुरलीधर’

पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात मतमोजणीत पुणेकरांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने एकतर्फी कौल दिला.
Loksabha Election Result
Loksabha Election Result sakal

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात मतमोजणीत पुणेकरांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने एकतर्फी कौल दिला. पहिल्या फेरीपासून मोहोळ यांना आघाडी मिळत असल्याने तणावाखाली असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बघता बघता एक लाखाच्या जवळपास मताधिक्य मिळाले. दुपारी चारच्या दरम्यान पावसानेही दमदार हजेरी लावली. त्यामुळे भर पावसात चिंब भिजत मोहोळ यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. ‘काय म्हणतात पुणेकर निवडून आले मुरलीधर’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामाच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यास सुरुवात झाली. इतर मतदारसंघांच्या तुलनेत पुण्याचा निकाल येण्यास उशीर होत होता. त्यामुळे नेमके काय सुरू आहे, हे भाजप तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही समजत नव्हते.

सुरुवातीला शांतता

नऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल हाती आला, त्या वेळी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा, पर्वती, पुणे कँटोन्मेंट आणि शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांतून मताधिक्य मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ही निवडणूक घासून होणार, एकतर्फी होणार नाही, अशी चर्चा उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. मात्र त्याचवेळी कोथरूडसह अनपेक्षितपणे वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपच्या बाजूने मतदान होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.

मोहोळांची आघाडी कायम

मोहोळ यांना कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतील लोहगाव, कळस, धानोरी या भागांतून चांगले मतदान मिळत होते. त्यामुळे मोहोळ यांनी पहिल्या दोन फेऱ्यांतच १२ हजार ६०० पेक्षा जास्त आघाडी घेतली. त्यानंतर एकाही फेरीमध्ये धंगेकर यांना मताधिक्य मिळाले नाही. मोहोळ यांना तिसऱ्या फेरीत ६ हजार २००, चौथ्या फेरीत ८ हजार ६७५, पाचव्या फेरीत ८ हजार ८५, सहाव्या फेरीत २ हजार ८४५, सातव्या फेरीत ६ हजार ८९१, आठव्या

फेरीत १ हजार ५०, नवव्या फेरीत १० हजार ३२३, दहावी फेरी ३ हजार ६३९, अकरावी फेरी ६ हजार ४७५, बाराव्या फेरीत १० हजार ६९७, तेराव्या फेरीत ८ हजार ८०७ अशी आघाडी मिळाल्याने एकूण मताधिक्य ९० हजारांच्या जवळपास गेले.

काँग्रेस नेत्यांचा काढता पाय

प्रत्येक फेरीमागे पाच ते आठ हजारांनी भाजपचे मताधिक्य वाढत होते. त्यामुळे काँग्रेसचे शहरातील प्रमुख पदाधिकारी, नेत्यांनी मतमोजणीतून काढता पाय घेतला. काही वेळाने काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेदेखील मतमोजणी केंद्रातून गायब झाले. स्वतः उमेदवार रवींद्र धंगेकर हे मतमोजणी केंद्राकडे फिरकलेदेखील नाहीत.

पावसासोबत मोहोळ यांची एंट्री

दहा फेऱ्या झाल्यानंतर मोहोळ यांचे मताधिक्य साठ हजारांच्या पुढे गेले. बाराव्या फेरीनंतर ८० हजारांचा टप्पा ओलांडताच विजयाचा विश्वास आल्यानंतर मोहोळ यांना चारच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रावर बोलविण्यात आले. मोहोळ आणि त्यांचे कार्यकर्ते जल्लोषात मतदान केंद्रात येत असताना त्याच वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे कार्यकर्तांमध्ये संचारलेला उत्साह यामुळे विजयाच्या जल्लोषात आणखीन भर पडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com