कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन ११ दिवसांचा कालावधी उलटला तरी उमेदवार व पक्षांनी मागणी करूनही केंद्रनिहाय किती मतदान झाले, याची माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही. फक्त कोल्हापुरातच नव्हे तर मतदान झालेल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांत ही स्थिती आहे.
लोकसभेच्या जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान झाले. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्या त्या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले, त्यात महिला, पुरुष मतदारांची संख्या किती ही माहिती जाहीर करण्यात आली; पण केंद्रनिहाय किती मतदान झाले, याची आकडेवारी जाहीर झालेली नाही. केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची माहिती मिळावी म्हणून उमेदवार आणि पक्षांनी त्या-त्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत; पण अजूनही ही माहिती मिळाली नसल्याची तक्रार आहे.
पूर्वी मतपत्रिकेद्वारे मतदान होत होते. त्यावेळी प्रत्येक केंद्रनिहाय मतमोजणी न करता सुरुवातीला सर्व मतपत्रिका एकत्रित करून प्रत्येकी २५ मतपत्रिकेंचे गठ्ठे करून त्याची मतमोजणी केली जात होती. केंद्रनिहाय मतमोजणी झाली तर कोणत्या गावांत कोणाला किती मते पडली, ही बाब उघड होत होती. त्यातून त्या गावांवर निवडून येणाऱ्या प्रतिनिधींकडून अन्याय होण्याची शक्यता गृहित धरून मतपत्रिका एकत्रित करून त्या मोजल्या जात होत्या. आता मतदान यंत्राद्वारे मतदान होत आहे.
त्यामुळे प्रत्येक केंद्रावरील यंत्रात कोणाला किती मते मिळाली, हे जाहीर होत होते. यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ज्या दिवशी मतदान होईल, त्यानंतर एक-दोन दिवसांतच केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रसिध्द केली जात होती. निवडणुकीच्या निकालानंतरही केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची माहिती प्रसार माध्यमांनीही दिली जात होती; पण यावेळची निवडणूक त्याला अपवाद ठरत आहे.
लोकसभेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात काही जिल्ह्यांत किंवा राज्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. हा प्रकार ताजा असतानाच उमेदवार व पक्षांनी मागणी करूनही केंद्रनिहाय आकडेवारी का दिली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कायद्यानुसार काय प्रक्रिया?
निवडणुकीबाबत असलेल्या कायद्यानुसार मतदान संपल्यानंतर संबंधित केंद्रावरील केंद्राध्यक्षांकडून त्या त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्या केंद्रावर एकूण मतदान किती झाले, याची लेखी माहिती दिली जाते. त्यावर संबंधित केंद्राध्यक्षांची सही असते; पण एकत्रित सर्व केंद्रांवरील आकडेवारी देण्याबाबत स्पष्टता नाही.
आयोगाकडून मार्गदर्शन मागवले : जिल्हाधिकारी
याबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी मिळावी म्हणून उमेदवार व पक्षांकडून अर्ज आले आहेत; पण ही आकडेवारी द्यावी किंवा नाही याबाबत स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाकडून आलेले नाहीत. या अर्जांचा विचार करून त्याबाबत आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे. आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.