Mallikarjun Kharge : संघाचाही होता ‘लीग’ला पाठिंबा ; काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांची टीका

‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वैचारिक पूर्वज असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम लीग आणि इंग्रजांना पाठिंबा दिला होता तसेच भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता,’’
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वैचारिक पूर्वज असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम लीग आणि इंग्रजांना पाठिंबा दिला होता तसेच भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता,’’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केला.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. या आरोपाला आज खर्गे यांनी उत्तर दिले. ‘‘देशातील सामान्य लोकांच्या विकासासाठी तयार केलेल्या काँग्रेसच्या न्यायपत्राला मुस्लिम लीगशी जोडत असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या वैचारिक पूर्वजांनी भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता.

मोदींच्या पूर्वजांनी १९४० च्या दशकात मुस्लिम लीगशी संधान साधून बंगाल, सिंधमध्ये राज्य सरकारे स्थापन केली होती. जनसंघाचे पहिले अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी इंग्रजांना पत्र लिहून भारत छोडो आंदोलन कसे कमजोर करता येईल? यासाठी सहकार्य करण्याची भाषा केली होती. या विचारधारेचे पाईक असलेल्या पंतप्रधानांना आता मुस्लिम लीगशी असलेल्या ऋणानुबंधांची आठवण येत असावी,’’ असा टोला खर्गे यांनी लगावला आहे.

हा जाहीरनामा काँग्रेसचा की जिन्नांच्या मुस्लिम लीगचा : नड्डा

नवी दिल्ली, ता ८: काँग्रेसचा जाहीरनामा हा पक्षाचा आहे की पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिम लीगचा, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे विभाजनाची रुपरेखा (ब्लूप्रिंट) असल्याचेही नड्डा यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

राष्ट्रीय एकतेकडे दुर्लक्ष करीत तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेसने चालवले आहे. देशात सदैव विभाजनाची स्थिती राहावी, असा या पक्षाचा प्रयत्न असला तरी विभाजनाचे राजकारण देशवासीयांनी फेटाळून लावलेले आहे, यापुढेही जनता अशा राजकारणाला जवळ करणार नाही. समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना भाजप तीव्र विरोध करेल. सर्वांगीण विकास याच उद्दिष्टावर आमचा पक्ष काम करेल. तुष्टीकरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असे नड्डा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच अजमेर येथे जाहीर सभेत बोलताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती.

पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार

काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याची तुलना मुस्लिम लीगच्या अजेंड्याशी केल्याच्या विरोधात काँग्रेसने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा मुस्लिम लीगच्य विचाराचा असल्याचा आरोप केला होता.

यासंदर्भात आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘‘काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. अशा पक्षाची देशविरोधी कृत्य केल्याचा आरोप असलेल्या मुस्लिम लीगशी तुलना करणे हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यावर कारवाई करावी,’’ अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचे लष्करातील वेशातील जवानांसोबतचे फोटो भाजपच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात येत आहे.

Mallikarjun Kharge
Narendra Modi : काँग्रेसची भाषा विभाजनवादी ; चंद्रपुरातून फोडला प्रचाराचा नारळ,उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा

यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होत आहे. यामुळे आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होत आहे. ही छायाचित्रे भाजपच्या जाहिरातीतून त्वरित हटविण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तक्रारींची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.