आजी-माजी आमदार, खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा दिग्गज प्रमुख चौघांतील लढतीमुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघात कमालीची उत्कंठा आणि चुरस निर्माण झाली आहे.
नाट्यमय घडामोडींमुळे मतांच्या आकडेमोडीत सातत्याने होणारे बदल, देश पातळीवर शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या रूपाने पुढे आलेले नेतृत्व आणि यावेळी एकाकी झुंज देण्याची आलेली वेळ, बहुतांश पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी, उमेदवारीवरून नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदार संघाची निवडणूक उमेदवारांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरेल.
या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी व शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शाहूवाडीत जनसुराज्यचे विनय कोरे,
हातकणंगलेत कॉँग्रेसचे राजू आवळे, इचलकरंजीत प्रकाश आवाडे (अपक्ष), शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), इस्लामपूरमध्ये जयंत पाटील (राष्ट्रवादी), शिराळ्यात मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) हे आमदार आहेत.
हातकणंगलेची निवडणूक ही आजपर्यंततरी दुरंगी स्वरूपाची झाली आहे. यामुळे निवडणुकीचे आडाखे बांधणे सोपे होते. यावेळी मात्र वाढलेले दिग्गज उमेदवार राजकीय विश्लेषकांना देखील विचार करायला भाग पाडत आहेत. सध्या कोण कोणाबरोबर, आतून कोणाचा पाठिंबा आणि जाहीर पाठिंबा कोण कोणाला देणार यावरून मतांची गोळा बेरीज करण्यात अनेक जण व्यस्त आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. हातकणंगलेत नेमका हाच उमेदवार विजयी होईल, असे सांगणे मोठे धाडसाचे होणार आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यामुळे निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने रणनीती निश्चित केली आहे. केंद्राच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदार संघात ठळकपणे प्रचार होत आहे. तर मतदारसंघ ऊस पट्ट्यात येत असल्याने ऊसदरासंदर्भात केंद्र आणि राज्याची शेतकरी विरोधी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्याकडून ठासून सांगितली जात आहे.
कारखानदार एकत्र आले असून शेतकरी आपल्या बरोबर असल्याचे शेट्टी सांगत थेट केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणावर बोट ठेवत आहेत. सहा विधानसभा मतदार संघांचा हातकणंगले लोकसभा हा एक मतदारसंघ आहे.
मतदारसंघात इचलकरंजी सर्वात मोठे शहर आहे. शहराच्या मतावर सर्वच पक्षांचा डोळा आहे. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरुन उमेदवारांनी सावध भूमिका घेतली आहे. इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरात नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन स्थानिक पातळीवर सुरू आहे.
एकूणच दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे हातकणंगलेची निवडणूक रंगतदार होणार आहे हे स्पष्ट असले तरी निकालावरून राजकीय विश्लेषक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर करून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी रातोरात त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आश्वासन दिले. आमदार विनय कोरे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली.
या मतदार संघातील काही समस्या अनेक वर्षांपासून जशाच्या तशा आहेत. यामध्ये पंचगंगा प्रदूषण, महापूर व सध्या भव्य अशा प्रस्तावित शक्ती महामार्गावरून शेतकरीविरुद्ध शासन असे निर्माण झालेले चित्र अशा काही प्रमुख समस्या ठळकपणे पुढे आल्या आहेत.
नदीकाठच्या गावातील लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणारी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या संकल्पनेला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. विशेष म्हणजे लोकसभेच्या मैदानात असणाऱ्या उमेदवारांनीच याप्रश्नी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्यक्षात कृती झाली नाही ही खंत मतदारांना आहे.
हातकणंगलेमध्ये उमेदवारांची वाढती संख्या, अंतर्गत हेवेदावे, गटबाजी, पर्यायी उमेदवार आणि विधानसभेच्या निवडणुकीची आखणी या पार्श्वभूमीवर मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. मतविभागणी कशा पद्धतीने होणार यावर निकालाची चित्र अवलंबून असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.