कसा आहे मोदी पर्वातील ‘नवा भाजप’?

भाजप आता सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारा पक्ष ठरण्याच्या वाटेवर आहे. अशातच आता ‘वेगळेपण जपणारा पक्ष’ असे ब्रीद असलेल्या भाजपची ही ओळख कशा पद्धतीने बदलत आहे, याबद्दल चर्चा करणे रंजक ठरेल.
New Era of BJP
New Era of BJPeSakal
Updated on

- शेखर गुप्ता

भाजप ‘वेगळेपण जपणारा पक्ष’ ठरेल असे अभिवचन भारतरत्न लालकृष्ण अडवानी यांनी भारतीय जनसंघ आणि जनता पक्ष या दोघांचे १९७७ मध्ये विलीनीकरण होऊन सहा एप्रिल १९८० रोजी निर्माण झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेवेळी दिले होते. योगायोगाने त्या दिवशी ‘ईस्टर संडे’ होता. त्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले अडवानी आनंदाने म्हणतीलही की ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले त्याच दिवशी आपल्या पक्षानेही नवे रूप घेतले.

तेव्हापासून ते आजपर्यंत जवळपास ४४ वर्षांनंतर आता भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारा पक्ष ठरण्याच्या वाटेवर आहे. अशातच आता ‘वेगळेपणा जपलेला पक्ष’ असे ब्रीद असलेल्या भाजपची ही ओळख कशा पद्धतीने बदलत आहे, याबद्दल चर्चा करणे रंजक ठरेलच पण जेव्हा हा पक्ष अजून सहा वर्षांनी पन्नाशी गाठेल, तेव्हा त्याचे स्वरूप कसे असेल?

भाजप दावा करत असलेला वेगळेपणा म्हणजे (इतर पक्षांपेक्षा विशेषतः काँग्रेसपेक्षा आपला पक्ष कसा वेगळा आहे हे दाखवताना) विचारधारेशी प्रामाणिक राहणे, त्यामध्ये कोणती भेसळ होऊ न देणे, कट्टर राष्ट्रवाद, नम्र, संयमी जीवनशैली आणि सामूहिक नेतृत्व हे गुण अंगी बाणणे आणि या पक्षाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक धोरणे.

मात्र सध्याच्या घडीला जेव्हा हा पक्ष राजकीय सत्तेच्या शिखरावर आहे तेव्हा तो या या मूलतत्वांपासून दूर जात असल्याचे चित्र आहे. आता भाजपमध्ये व्यक्तीकेंद्रित संस्कृती रुजू पाहत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या उदयापूर्वी पक्षाचे नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी या जोडीकडे दीर्घकाळ होते. वाजपेयी पक्षाचा आवाज तर पक्षाचे मन म्हणजे अडवानी तर पडद्यामागील सूत्रे ही नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिग्गजांकडून हलविली जात होती. आता मात्र हे चित्र पूर्णतः वेगळे दिसत आहे. मोदी आता एकमेव आणि निर्विवाद नेतृत्व म्हणून उदयाला आले आहेत. हा पक्षाच्या मूलतत्वांमध्येच झालेला महत्त्वाचा बदल आहे. अर्थात या बदलाचे पूर्ण श्रेय नरेंद्र मोदींमध्ये असलेल्या क्षमतेचेच आहे.

ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी काँग्रेसला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे मोदींनीही आपली क्षमता वापरून स्वतःच्या नावावर पक्षाला अतिरिक्त मते मिळवून दिली. ही मते जर नसती, तर पक्षाला लोकसभेच्या २०० जागाही जिंकणे अवघड होते. वाजपेयींनी त्याच्या काळात सर्वाधिक म्हणजे १८२ चा आकडा गाठला होता. पण आता जी मतांची विभागणी आणि जागांच्या आकड्यांचे पक्षाच्या संस्थापक सदस्यांनी केवळ स्वप्नच पाहिले होते, कधी कल्पनाही केली नव्हती, तो आकडा आता पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहता येत आहे पण भाजपने नेहमीच एककेंद्री नेतृत्वाला (विशेषतः इंदिरा गांधींच्या काँग्रेसला) विरोध केला होता, त्यात आता बदल होत आहे.

New Era of BJP
Lok Sabha Survey: मोदी सोडून PM म्हणून कोणाला पसंती? तमिळनाडूत भाजपला भोपळा? सी वोटरचा सर्व्हे आला समोर

आता भाजपच्या स्थापनेला जवळपास ४४ वर्षे झाली असून आजचा भाजप जसा मोदींचा आहे, तसाच १९८० च्या पूर्वार्धात काँग्रेस हा इंदिरा गांधींचा होता. कालानुरूप, अडवानी आणि त्यांच्या विचारगटाने मूलतत्वांमध्ये म्हणजे दिशा, चारित्र्य आणि प्रतिमा यांत असे काही बदल केले की ज्यामुळे पक्ष आता त्यांच्या विरोधकांपेक्षा वेगळा, उठून दिसत आहे. आपण आता ही चर्चा पुढे नेण्यासाठी या तीन मूलतत्वांचा क्रम थोडा बदलू. दिशा, चेहरा आणि चारित्र्य असा क्रम आपण विचारात घेऊ.

दिशा आणि चेहरा

सुरुवातीला पक्षाच्या वाटचालीमध्ये काहीच बदल नव्हता. काहीही झाले तरी पक्षाची विचारधारा त्याच्या सर्व कृतींमध्ये आणि धोरणांमध्ये प्रधान मानली जात होती. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा नारा भाजपच्याच कोणीतरी संस्थापकाने लिहिलेला असावा किंवा संघाच्याही कोणा सदस्याने लिहिलेला असू शकतो. परराष्ट्र धोरण, आर्थिक बाबी, धर्म, समाज अशा विविध विषयांसंदर्भातील पक्षाची कार्यपद्धती आणि दिशा ही सातत्यपूर्ण आहे. आता पुढचा मुद्दा चेहरा किंवा प्रतिमा. इथे आपल्याला बदल झालेला दिसत आहे. सगळ्यात प्रमुख बदल म्हणजे, ज्याबद्दल आपण आधी बोललो, तो म्हणजे एककेंद्री नेतृत्व. इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदी हे देशभरातील निवडणुकांवर प्रभाव पाडणारे नेतृत्व आहेत. देशभरात ‘हा माझा उमेदवार आहे, याला मत द्या’, अशा पद्धतीचा प्रचार होताना आपल्याला दिसत आहे. ही भाजपसाठी चांगली बाब आहे. पण त्याचबरोबर आपण हेही लक्षात घ्यायला हवे की, पक्षाच्या सदस्यांची प्रतिमेविषयीची संकल्पना १९८० मध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसच्या अगदी विरुद्ध होती. पण आता भाजपही या बाबतीत काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व कमी होणे हे एक प्रकारे नुकसानच आहे. पण संघ असे मानत असेल, असे मला वाटत नाही. भाजपची विचारधारा असलेला संघ सध्या सत्ता अनुभवत आहे आणि कलम ३७०, राम मंदिर (आणि कदाचित भविष्यात मथुरा आणि वाराणसीसुद्धा), तिहेरी तलाक आणि अशी बरीच स्वप्ने सत्यात उतरताना पाहत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगाने होणाऱ्या भाजपच्या वाढीमुळे पक्षाला आज मानवी संसाधनाची कमतरता वाटू लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या फळीतील कर्तृत्ववान नेतृत्व सध्या पक्षाकडे नाहीत. त्यामुळे पक्षाला विरोधकांकडील नेत्यांना आपल्याकडे ओढून घेण्याची जास्त गरज वाटत होती. याची उदाहरणे आपण महाराष्ट्र आणि बिहारमध्ये पाहिलेली आहेत.

आणखी एक मुद्दा म्हणजे पारंपरिक विरोधकांसाठी मोकळेपणाने उघडलेले पक्षाचे दार. यापैकी अनेकजण सहज सत्ता मिळावी यासाठी भाजपमध्ये येत आहेत. काही जण त्यांच्या पक्षातील नेतृत्वाला कंटाळून तर काही जण भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्तता आणि तपास यंत्रणांच्या जाळ्यातून सुटका करून घेण्यासाठी भाजपचे दार ठोठावत आहेत. मात्र, विरोधकांनी भाजपला ‘वॉशिंग मशिन म्हणून कितीही हिणवू देत, पण भाजपला काहीही फरक पडत नाही. राजकारणामध्ये महत्त्वाचा आहे तो निवडणुकीचा निकाल. बाकी सगळा नुसता दंगा, आरडाओरडा आहे, असे भाजपला वाटते, असे चित्र आहे.

New Era of BJP
BJP Releases Poll Manifesto: मोदी की गॅरंटी! जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

याचाच परिणाम म्हणजे बाहेरून पक्षात आलेल्यांना फक्त संरक्षणच मिळाले नाही तर, पक्षातील प्रमुख पदेही मिळाली जी सामान्यपणे पक्षातील मूळ कार्यकर्त्यांसाठी राखीव असायला हवीत. उदाहरणार्थ, ईशान्येकडील राज्यांचे चार मुख्यमंत्री, ज्या राज्यांमध्ये भाजपचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे. उदाहरणार्थ, ईशान्येकडील राज्यांमध्ये हिमंता बिस्व सरमा हे पक्षाचे प्रमुख नेते मानले जातात. तर बिजू जनता दलातून भाजपमध्ये आलेले बैजयंत जय पांडा हे आता उत्तर प्रदेशातील प्रचाराचे प्रमुख आहेत. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनोवाल आता संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. विविध राष्ट्रीय उपाध्यक्षांव्यतिरिक्त, बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत, तर आंध्र प्रदेशमध्ये डी. पुरंदेश्वरी आणि पंजाबमध्ये सुनील जाखर हे राज्यातील महत्त्वाच्या पदांवर आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे एकेकाळचे निष्ठावंत आणि लालू प्रसाद यादवांचे निकटवर्तीय असलेले सम्राट चौधरी बिहारमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री झाले आहेत. हे बदल पक्षाच्या चारित्र्यामध्ये झालेले महत्त्वाचे बदल अधोरेखित करतात.

बहादूरशाह जफर मार्गावर माझ्या खिडकीबाहेर भाजपच्या प्रचाराचा एक मोठा फलक लावलेला आहे. त्यावर मोदींचे वर्णन ‘भ्रष्टाचाराविरोधात लढणारा’ असे केले आहे. तर बाकी प्रमुख विरोधकांच्या प्रतिमा ‘ब्लॅक अँड व्हाइट (शक्यतो काळ्या म्हणाव्यात अशाच रंगछटेत) दाखविल्या आहेत. ‘आप’ची टोपी आणि मफलर घातलेल्या एका प्रतिमेचाही यात समावेश आहे. यामधून भाजपला इतरांपेक्षा वेगळे असलेले आपले चारित्र्य दाखवायचे आहे पण अजित पवारांपासून अशोक चव्हाणांपर्यंत, बाहेरून आलेले इतके नेते असताना भाजप हे कसे काय करू शकणार आहे, हा मोठा प्रश्नच आहे.

सीएसडीएस-लोकनीतीचे सर्वेक्षण

या आठवड्यात, ‘द हिंदू’ने सीएसडीएस-लोकनीतीच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. विशेषतः यातील भ्रष्टाचारविषयीचे निष्कर्ष अधिक रंजक आहे. प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या पाच वर्षांत भारतातील भ्रष्टाचार वाढला आहे, असे ५५ टक्के भारतीयांना वाटते. हा आकडा २०१९ मधील अशाच प्रकारच्या अभ्यासातील टक्केवारीपेक्षा १५ टक्क्याने वाढल्याचे दिसते. विविध उत्पन्न गटामध्ये ही टक्केवारी बऱ्याच अंशी सारखीच आहे. पण कमी उत्पन्न गटामध्ये टक्केवारी आणखी कमी आहे. पण तरीही भाजप स्वतःला आता भ्रष्टाचारविरोधी धर्मयोद्ध्यांचा पक्ष म्हणवत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, हाच अभ्यास असेही सांगतो की भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा आहे, असे केवळ ८ टक्के लोकांना वाटते. हा मुद्दा राम मंदिरासोबत चौथ्या क्रमांकावर असून बेरोजगारी (२७ टक्के), महागाई (२३ टक्के) आणि विकास (१३ टक्के) हे मुद्दे अग्रस्थानी आहे. हा वेगळा राजकीय कालखंड आणि वेगळी भाजप आहे. पण भारतीय मतदारही वेगळा आहे का?

(अनुवाद - वैष्णवी करंजकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.