Lok Sabha Election Voting : उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ‘इंडिया’आघाडीचे पारडे जड? अशी बदलली समीकरणे

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील ज्या आठ जागांवर शुक्रवारी मतदान झाले, त्यापैकी सर्व जागांवर २०१४मध्ये भाजपने विजय मिळविला होता. तर मागील निवडणुकीमध्ये भाजपला या पैकी तीन जागांवरच विजय मिळविण्यात यश आले होते.
Lok Sabha Election Voting
Lok Sabha Election Votingsakal
Updated on

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील ज्या आठ जागांवर शुक्रवारी मतदान झाले, त्यापैकी सर्व जागांवर २०१४मध्ये भाजपने विजय मिळविला होता. तर मागील निवडणुकीमध्ये भाजपला या पैकी तीन जागांवरच विजय मिळविण्यात यश आले होते. यंदाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे पाहता यावेळीही भाजपपेक्षा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचेच पारडे येथे जड वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच उत्तर प्रदेशात सर्व जागांवर भाजपला विजय मिळेल असा दावा करायला सुरुवात केली होती. चुकीच्या मुद्यांच्या आधारे समाजाची एक विशिष्ट मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न करायचा, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुभवसिद्ध धोरणाचे प्रतिबिंबच या दाव्यांमध्येही दिसत होते. अशातच विरोधकांच्या आघाडीतील मतभेदांमुळे तर, भाजपकडून करण्यात येत असणाऱ्या दाव्यांना अधिकच बळ मिळत होते. परंतु जशी निवडणुकीची वेळ जवळ येत गेली तसतसे पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान झाले त्या जागांपैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले.

मात्र वस्तुस्थिती पाहता पहिल्या टप्प्यातील आठ जागांवर विजयाची अपेक्षा बाळगणाऱ्या भाजपसह आणि इंडिया आघाडीलाही या जागांवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. २०१४मध्ये जेव्हा भाजपने उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवला होता त्यावेळी या आठही जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. मात्र २०१९मध्ये यापैकी पाच जागांवर पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Lok Sabha Election Voting
Loksabha Election 2024 : जिंकण्याच्या निकषावर जागावाटप ,आशिष शेलार : निवडणूक ‘मोदी विरुद्ध गांधी’ अशीच होणार

या निवडणुकीमध्ये येथील समीकरणे बदलली आहेत. सीबीआयची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे मायावती यांनी तडजोड केल्याचे दिसत आहे तर, राष्ट्रीय लोक दलानेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घ्यायचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी ‘एकला चलो रे’चा दिलेली नारा आणि पहिल्या टप्प्यातील आठपैकी तीन जागांवर मुस्लिम उमेदवार देत मुस्लिम मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

बदललेली समीकरणे

मागील निवडणुकीमध्ये भाजपला पिलिभीत येथे वरुण गांधी यांच्या लोकप्रियतेमुळे विजय मिळाला होता. मात्र, वरुण यांनी स्पष्टवक्तेपणे सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत व्यक्त केलेली मते ही त्यांच्या पक्षाच्या धोरणाला न रुचल्याने त्यांना यंदा उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे यंदा येथील भाजपचे उमेदवार जितन प्रसाद यांना विजय मिळविणे कठीण असल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे.

सहारनपूर येथे काँग्रेस बहुजन समाज पक्ष(बसप) आणि भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. पहिल्या टप्प्यातील हा एकमेव मतदारसंघ होता जिथे काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे भाजपने राघवलाल लखनपाल यांना तर बसपने माजीद अली यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसने येथून इम्रान मसूद यांना रिंगणात उतरविले आहे. रामपूर हा मतदारसंघ आझम खान यांच्यामुळे चर्चेत राहिला आहे. समाजवादी पक्षाचा (सप) बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात अखिलेश यांनी मुळचे दिल्लीचे असलेले इमाम मोईतुल्ला नदवी यांना उमेदवारी दिली. तर भाजपने घनश्‍याम लोधी यांनाच उमेदवारी दिली. मुझफ्फरनगर, पिलिभीत व कैराना या जागांवर भाजपला पुन्हा यश मिळाले तरी, अन्य पाच जागांवरील निवडणूक भाजपसाठी तितकी सोपी नाही.

मुरादाबादमध्ये भाजपला संधी?

मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार ए. पी. हसन यांच्याऐवजी येथून आझमखान यांच्या निकटवर्तीय रुची वेरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हसनसमर्थक नाराज असल्याचे मानले जात असून, भाजपचे उमेदवार सर्वेश कुमार यांना येथे विजयाची संधी असल्याचे स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे.

आझाद यांचे आव्हान

दलितांचा बुलंद आवाज म्हणून उदयास आलेले चंद्रशेखर आझाद यांनी नगिना येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील समीकरणे बदलू शकतात. त्यांना ‘इंडिया’ आघाडीमध्ये समाविष्ट करण्यात आले असते, तर त्याचा इंडिया आघाडीला नक्कीच फायदा झाला असता, असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.