सांगली जिल्ह्याच्या राजकारणात महाआघाडीत राजकीय दंगल रंगली आहे. या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात तुंबळ युद्धच सुरू आहे. या जागेमुळे महाआघाडी फुटेल की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी महाविकास आघाडीतीलच प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे प्रमुख नेते जयंत पाटील मौनात आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या या भांडणात राष्ट्रवादीचा संबंधच नाही, असे जयंत पाटील कसे काय म्हणू शकतात? पश्चिम महाराष्ट्राचील नस त्यांना माहिती आहे. सांगलीची नस त्यांना कळू नये?
खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते तीन दिवस सांगलीत मुक्कामी होते. सूर्यकुमार यादवसारखे त्यांनी फटके मारले. त्या फटक्यांना शास्त्रशुद्ध ठरवता येत नाही, मात्र किमान त्या फटक्यांनी संघासाठी धावा तरी वसुल झाल्या का, याचे उत्तर भविष्यात चंद्रहार पाटलांचा स्कोअरकार्ड देईल. त्याआधी उद्धव ठाकरे मिरजेला सभा घेऊन गेले. इकडे आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील मुंबई, दिल्ली वारी करून दमले.
मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला आदी राष्ट्रीय नेत्यांना भेटले. त्यात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात अशी मान्यवर मंडळी सतत सांगलीबद्दल बोलती झाली. एवढेच कशाला, काही संबंध नसताना कालपासून नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणेही सांगलीवरून तुफान फटकेबाजी करत आहे
लोकांचे लक्ष मात्र एका चेहऱ्याकडे आहे, जयंत पाटील... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. ते ‘मला काही बोलायचे आहे, पण मी बोलणार नाही’, कविता सादर करत आहेत, असे चित्र आहे. ते मुत्सद्धी राजकारणी आहेत. त्यांचे ‘कार्यक्रम’ सहजी लक्षात येत नाहीत. सांगलीच्या राजकारणात काँग्रेसची दुर्दशा झाली, त्याला स्वतः काँग्रेस नेते जबाबदार आहेतच, मात्र त्यामागचे जयंतरावांचे ‘कार्यक्रम’ महत्त्वाचे होते. एक काळ भाजपशी असलेला त्यांचा दोस्ताना ‘जयंत जनता पार्टी’ या नावाने ओळखला जात होता.
आता तो नाही, असे सांगितले जाते. परंतु, तो काँग्रेससोबत आहे का, याचे उत्तरदेखील मिळत नाही. सध्या जयंतरावांच्या मौनाबद्दल चर्चा आहे. एखाद्याचे मौन फारच लांबले तर लोक ‘मौनांची भाषांतरे’ करायला लागतात. जयंतराव राज्याच्या निवडणुकीत कुठेच दिसत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जयंतराव सांगलीत तर कुठे आहेत? त्यांचे सुपुत्र प्रतीक सांगली किंवा हातकणंगलेतून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती मात्र या चर्चेलाही सुद्धा जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला. त्यांच्या शांत राहण्यामुळे ‘हिचकॉक’च्या चित्रपटासारखा सस्पेन्स तयार होतोय.
संजय राऊत यांनी विश्वजित कदमांचे विमान ‘गुजरातच्या दिशेने जाणारे’, असा उल्लेख केला. तशी चर्चा जयंतरावांच्या विमानाचाही होत असते. त्याला जयंतराव उत्तर देताना दिसत नाहीत. ते शांत असणे म्हणजेच ‘काहीतरी गेम आहे बरं का!’ अशा चर्चा सुरू होतात. तसे जयंतराव यांचे राजकीय व्यक्तिमत्व गूढ स्वरूपाचे आहे. मराठी भाषेत ‘कार्यक्रम करणे’ याला वेगळा अर्थ त्यांनी दिला. सांगलीच्या राजकारणात असलेला ‘दादा-बापू वाद’ एके काळी गाजला होता. जयंतराव आणि दादा घराण्यातील संघर्ष सगळ्यांना माहिती आहे. तो संपला असेही अनेकदा जयंतरावांनी जाहीर केले आहे. तरी निवडणुका आल्या की वादाची चर्चा होते. विशाल यांना जयंतरावांचा विरोध आहे का, अशी शंका त्यामुळेच घेतली जाते.
विशाल पाटील कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे, त्या पत्रात सर्व नेत्यांची नावे आहेत, मात्र राजारामबापूंचे नाव नाही. त्यामुळे तुम्ही बाजूने संघर्ष आहे. या संदर्भात‘झारीतील शुक्राचार्य’ वगैरे शब्द वापरून काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा या आठवणी ताज्या करताना दिसताहेत. ही स्थिती सांगलीच्या विकासालाही मारक आहे. दादा-बापू वादाचे दुष्टचक्र संपता संपायला तयार नाही. जयंत पाटील यांनी महाआघाडीचा उमेदवार कोण असावा, याबाबत तरी भाष्य करणे अपेक्षित होते. चंद्रहार पाटील की विशाल पाटील यावर बोलले पाहिजे. अन्यथा, लोक अर्थ काढतच राहतील...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.