Beed Lok Sabha 2024: बीड लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे हे बहीण पंकजाचा प्रचार करणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. दरम्यान आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे यांनी एकत्र गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे पंकजा यांना भावाची साथ मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा गोपीनाथ गडावर आली आहे. माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मी सांगितले होती की मी तुमच्या घरी येणार आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात, पालकमंत्री आहात मला कामात मदत करा. पण मला त्यांनी सांगितलं मी गोपीनाथ गडावर येतो. आता गोपीनाथ गडावर भाऊ आलाय पण पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या घरी जाणार आहे."
धनंजय मुंडे म्हणाले, हा माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाली. घरात मी मोठा आहे, त्यामुळे मी स्वत: भाऊ म्हणून आलो. त्यांनी माझ्या घरी येण्यापेक्षा मी त्यांच्या भेटीसाठी येणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं होत.
काही नेते महायुतीच्या बाहेर जाऊन उमेदवारी मागत आहेत, यावर धनंजय मुंडे म्हणाले, त्यांची ऐपत मला माहीत आहे. त्यांना त्यांच्या मुलीला ग्रामपंचायतीत देखील निवडून आणता आलं नाही.
बहिणीच्या मागे मोठा भाऊ म्हणून ताकदीने मी उभा आहे. ताईंच्या राजकारणातील सुरुवातीला २००९ ला मी ताईंचा प्रचार केला. या २०२४ च्या निवडणुकीत मी ताईंचा प्रचार करणार हे मुंडे साहेबांचे आशिर्वाद आहेत. तेव्हा मुंडे साहेब हयात होते. आज ते नसताना माझे वडिल नसताना मोठा भाऊ म्हणून मी ही जबाबदारी घेणं माझं कर्तव्य आहे. देशाला विजय गर्व वाटावा असा विजय पंकजा मुंडेंचा होणार आहे. (Latest Marathi News)
पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी देत, भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे बोललं जात आहे. आता महाविकास आघाडी बीडमधून कोणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. बीड लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार आहे. त्यामुळे शरद पवार बीडमधून कोणाला उमेदवारी देतात. याची बीडकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.