Lok Sabha Election 2024 : वाराणसीत ‘अब की बार दस लाख पार’ होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१४ च्या निवडणुकीत वाराणसीमध्ये पाच लाखांहून अधिक मते मिळाली होती.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sakal
Updated on

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीतून यावेळी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवून देत विक्रम करण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी वाराणसीत भाजपने ‘अब की बार, दस लाख पार’ ही घोषणा दिली आहे. तर, पराभव अपेक्षित असला तरी मोदींचे मताधिक्य कमी करून भाजपला धक्का देण्याच्या प्रयत्नात विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी आहे. यासाठी विणकर, निषाद समाजातील नाराज मतदारांवर काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१४ च्या निवडणुकीत वाराणसीमध्ये पाच लाखांहून अधिक मते मिळाली होती. आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी त्यावर्षी वाराणसी येथून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवल्याने ही निवडणूक आणखी लक्षवेधी ठरली होती.

त्यावेळी ‘आप’सह काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांनी येथून स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविले होते. २०१४मध्ये मोदींच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी जवळपास ३.९३ लाख मते घेतली होती. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेली मते २०१४ च्या तुलनेत जवळपास पावणेसात लाख झाली. यावेळी मोदींचे मताधिक्य कमी करण्यासाठी काँग्रेस व समाजवादी पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे.

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरुद्ध इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे अजय राय हे उमेदवार आहेत. तर बहुजन समाज पक्षाने अजहर जमाल लारी यांना मैदानात उतरविले आहे. यावेळी, वाराणसीतील सुमारे १९.५ लाख मतदारांपैकी १० लाखांहून अधिक मते मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठरविले आहे.

त्यासाठी घरोघरी जाऊन प्रचारासोबतच मतदारांच्या संख्येची नोंदही भाजप कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे तसेच अरुंद गल्ल्यांमध्ये जय श्रीरामच्या घोषात प्रचार फेऱ्याही काढल्या जात आहेत.

चौसष्ट योगीनी मंदिर असलेल्या चौसट्टी भागातील चिंचोळ्या बोळात सायंकाळी भाजपची निघालेली प्रचार फेरी, मोदींनी वाराणसीकरांच्या नावाने लिहिलेले भावनिक पत्र आणि मताधिक्याच्या मुद्द्यावरच भाजपच्या ‘पन्ना प्रमुखांची’ काही दिवसांपूर्वी झालेली बैठक याच मोहिमेचा भाग आहे.

वाराणसीतील अहिल्या घाटावर मागील चौदा पिढ्यांपासून पूजाविधी करणारे आणि महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथचे मूळचे रहिवासी असलेले विशाल औंढेकर शास्त्री हे भाजपचे पन्नाप्रमुख आणि मंडल उपाध्यक्ष आहेत.

‘सकाळ’शी बोलताना त्यांनी, मोदींचे मताधिक्य यावेळी विक्रमी असेल असा दावा केला आहे. वारासणसीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले लोक राहत असल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने वेगवेगळ्या भाषांच्या प्रचारकांना व केंद्रीय मंत्र्यांनाही संपर्काची जबाबदारी दिली आहे.

प्रचारातील ठळक मुद्दे

भाजप ः काशी विश्वनाथ कॉरिडॉरपासून नवीन रस्ते, पूल. नवीन क्रिकेट स्टेडिअम, कॅन्सर हॉस्पिटल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची पायाभरणी

काँग्रेस ः वाराणसीचा विकास केवळ पर्यटकांसाठी, स्थानिकांसाठी काहीही नाही, महागाई, येथील आर्थिक घडामोडींचा फायदा गुजरातमधील व्यावसायिकांना, दहा वर्षांत वाराणसीत एकही नवीन कारखाना आलेला नाही

बनारसच्या विणकरांची खदखद

बनारसची विशेष ओळख असलेली बनारसी साडी तयार करणाऱ्या विणकरांमध्ये ८० टक्के विणकर अन्सारी मुस्लिम आहेत. तर उर्वरित हिंदू विणकर आहेत. विणकरांना मिळणारे वीजेवरील अंशदान बंद झाल्याने यंत्रमाग चालविण्याच्या खर्चात झालेली चौपट वाढ, सवलती देणारे ‘बुनकर कार्ड’ बंद होणे यामुळे विणकरांची नाराजी वाढली आहे.

मागील दहा वर्षात वाराणसीत धागा तयार करण्याचा कारखाना का सुरू झाला नाही, बनारसी साडी जगप्रसिद्ध असली तरी धागा, जरी, ताना-बाना, यंत्रे, उपकरणे सारे काही गुजरातमधून येते. विणकरांना सरकारने काहीही सवलती दिलेल्या नाहीत. दिवसभर यंत्रमाग चालवून मिळणारी रोजंदारी ३०० रुपये आहे. तर टोटो चालवून ५००-६०० रुपये मिळत मिळतात त्यामुळे काहींनी तर यंत्रमाग विकून टोटो (ई रिक्षा) घेतली आहे.

वाराणसीमध्ये मोदींबद्दल नाराजी नाही. पण विणकरांच्या सुविधा मिळत नाही त्याचे काय? माझ्याकडे २८ यंत्रमाग आहेत त्यापैकी अनेक बंद ठेवाव्या लागत आहेत.

-महम्मद आर्फिन अन्सारी, विणकर, वाराणसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.