माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत होणार हे आता निश्चित झाले आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी (ता.११) शरद पवार यांची भेट घेऊन रविवारी (ता. १४) राष्ट्रवादी प्रवेश निश्चित केला आहे. खासदार निंबाळकर यांना २०१९ च्या निवडणुकीत माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते. आता २०२४ च्या निवडणुकीत खासदार नाईक-निंबाळकर विरुध्द मोहिते-पाटील अशी लढत होत असल्याने ते एक लाखाचे मताधिक्य कोणाचे? भाजपचे की मोहिते-पाटलांचे? याचे गुपित उलगडणार आहे.
विजयसिंह मोहिते-पाटील यांनी २०१९ मध्ये ‘राष्ट्रवादी’तून भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजप उमेदवार नाईक-निंबाळकर यांना माळशिरस विधानसभा मतदार संघातून एक लाख ६३० एवढे मताधिक्य दिले. त्यावेळी मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर हे देखील भाजपमध्येच होते. त्यामुळे एक लाखाच्या मताधिक्यात कोणाचा वाटा किती? हा प्रश्न अनुत्तरितच होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादीचे उत्तम जानकर अशी लढाई झाली. या निवडणुकीत भाजपच्या सातपुतेंचा अवघ्या २,५९० मतांनी विजय झाला. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील एक लाखाच्या मताधिक्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिले होते.
चमत्काराची शक्यता नाकारता येत नाही
माढ्याची आताची लढत ही ज्यांना (खासदार नाईक-निंबाळकर) एक लाखाचे मताधिक्य मिळाले त्यांच्या विरुध्द ज्यांनी (मोहिते-पाटील) हे मताधिक्य लीड दिले, यांच्यात होणार आहे. उत्तम जानकर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच बोलावून घेतले होते. माळशिरसच्या राजकारणात मोहिते-पाटील आणि जानकर यांच्यात साटेलोटे (तुम्ही खासदारकीला आमचे काम करा, आम्ही तुम्हाला माळशिरसमधून आमदार करतो) झाल्याचे समजते. माढा लोकसभा मतदारसंघात विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भाजपबद्दल रोष दिसत आहे. शरद पवारांची ‘तुतारी’ या ठिकाणी कमी काळात कमालीची लोकप्रिय झाली आहे. या दोन्ही गोष्टीला धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासारखा युवा आणि मतदार संघात परिचित असलेला उमेदवार मिळाल्यास माढ्यात चमत्कार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जयसिंहांच्या म्हणण्याला पुन्हा महत्व
मोहिते-पाटील घराण्यातील रणनितीकार म्हणून बाळदादा ऊर्फ जयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य देऊ, अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते. या निवडणुकीत सोलापूर, माढा, बारामती व सातारा या मतदारसंघातून भाजपला घालवायचे आहे, अशी घोषणा जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे. त्यांची ही घोषणा खरी होणार का, हे पाहण्यासाठी लोकसभेच्या निकालाची वाट पाहावी लागेल.
मोदींची पुन्हा माळशिरसमध्ये सभा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटलांच्या अकलूजमध्ये (ता. माळशिरस) प्रचारसभा घेतली होती. या सभेचा मोठा परिणाम सोलापू्र व माढ्याच्या जागांवर झाला होता. आता २०२४ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांची सभा सांगोला किंवा माळशिरस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवार तथा खासदार नाईक-निंबाळकर कोणत्या ठिकाणी सभा घेण्यासाठी प्रयत्न करतात? यावरही बरेच काही अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.