नवी दिल्लीः देशभरात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार बुधवारी सायंकाळी थांबला. शेवटचा दिवस गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांमुळे गाजला.
पहिल्या टप्प्यात विकासाच्या मुद्यावरून सुरू झालेला या प्रचाराला दुसऱ्या टप्प्यात जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वळण मिळाले. संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्यावरून विरोधकांची विचारधारा ‘नक्षलवादी सोच’ ठरविणाऱ्या पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीची नजर स्त्रीधनावर (मंगळसूत्र) असल्याचा आरोप केला. पुढच्या टप्प्यात त्यांनी धर्मावर आधारित आरक्षणाचा काँग्रेसचा डाव असल्याचे टीकास्त्र सोडले होते.
राज्यात येत्या शुक्रवारी (ता.२६) बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. देशभरातील तेरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ८९ जागांवरही मतदान होणार आहे.
प्रचाराचा शेवटचा दिवसही वादाचा ठरला. ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा हक्कावरील कराच्या मुद्यावरून भारतात देखील चर्चा व्हायला हवी असे मत मांडल्यानंतर भाजपनेही याच मुद्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच धागा पकडत तुम्हाला वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीवरही काँग्रेसला हात मारायचा असल्याची टीका केली. काँग्रेसने मात्र या आरोपांचे खंडन करताना पित्रोदा यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचा दावा करत त्याचा पक्षाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
चौथ्या टप्प्याचे तेरा मेला मतदान
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार असून यासाठी गुरुवार (ता.२५) हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा यात समावेश आहे. या टप्प्यातील उमेदवारांच्या अर्जांची छाननी २६ एप्रिल रोजी होईल. अर्ज मागे घेण्याचा २९ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे त्यानंतर १३ मे रोजी मतदान होईल.
सभांचा धुरळा
मराठवाडा
- राष्ट्रीय नेत्यांच्या सभाः ३
- प्रादेशिक नेत्यांच्याः १९
विदर्भ
- राष्ट्रीय नेत्यांच्या सभाः १९
- प्रादेशिक नेत्यांच्या सभाः २३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.