नवी दिल्ली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होत असून तमाम देशवासियांचे आणि इतर देशांचेही लक्ष या निकालाकडे लागले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधणार की ‘इंडिया’ आघाडीचे सत्तेत येण्याचे स्वप्न साकार होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (Lok Sabha Election 2024 Result today excitement of NDA or INDIA would come to power)
१८ व्या लोकसभेसाठी देशात सात टप्प्यांत मतदान झाले. यातील उत्तर प्रदेश, प. बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये प्रत्येक टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत मतदान पार पडले होते. मतदानानंतर बहुतांश सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केलेल्या कलचाचणीमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मात्र, हे अंदाज फोल ठरतील आणि इंडिया आघाडी सत्ता काबीज करेल, असा विश्वास काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आणि ‘ईव्हीएम’मध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. तर, ‘ईव्हीएम’च्या सील तोडल्याचे आढळून आले तर त्याची तत्काळ तक्रार करावी, असे निर्देश भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. लोकसभेबरोबरच ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा निकालही मंगळवारी जाहीर होणार आहे.
विरोधी आघाडीने गतवर्षी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीत काँग्रेस, राजद, सप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, पीडीपी, द्रमुक तसेच डाव्या पक्षांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि 'आप'ची दिल्लीत आघाडी झाली होती, तर पंजाबमध्ये हे पक्ष वेगवेगळे लढले होते. त्याचप्रमाणे प. बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. तर ‘एनडीए’तील तमाम पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या.
नितीशकुमार दिल्ली दौऱ्यावर
निकाल जाहीर होण्यास काही तास बाकी असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यता लक्षात घेऊन भाजपने जल्लोषाची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ‘एनडीए’ला ३५० च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, इंडिया आघाडीला १२५ ते १६० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपची आढावा बैठक...
निकालाच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची आढावा बैठक पार पडली. अमित शहा, राजनाथ सिंह, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव या मंत्र्यांसह पक्षाचे इतर नेते या बैठकीस उपस्थित होते. नड्डा आणि शहा यांनी हरियानाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा केली.
मतमोजणीची तयारी पूर्ण...
मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत बरेचसे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. मोबाईलसहित इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट मतमोजणी केंद्रावर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणीसोबतच व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाईल. प्रत्येक फेरीतील मतमोजणीनंतर पर्यवेक्षक, उमेदवारांचे एजंट सहमती देतील आणि स्वाक्षरी करतील. यानंतर निवडणूक अधिकाऱ्याची स्वाक्षरी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.