Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

‘‘महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, ते हुतात्मे महाराष्ट्राची होणारी लूट आणि पायदळी तुडविली जात असलेली अस्मिता पाहत आहेत. कोणासाठी बलिदान दिले, असे त्यांना वाटत असेल. त्यामुळे प्राण गेला तरी चालेल, हुकूमशहांच्या ताब्यात महाराष्ट्र जाऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी तोफ डागली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

पुणे : ‘‘महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, ते हुतात्मे महाराष्ट्राची होणारी लूट आणि पायदळी तुडविली जात असलेली अस्मिता पाहत आहेत. कोणासाठी बलिदान दिले, असे त्यांना वाटत असेल. त्यामुळे प्राण गेला तरी चालेल, हुकूमशहांच्या ताब्यात महाराष्ट्र जाऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी तोफ डागली. संयुक्त महाराष्ट्र समिती फोडण्याचे काम जनसंघाने केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, सहसंपर्क प्रमुख सचिन अहिर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही सभा होत आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तेव्हाचा जनसंघ सहभागी झाला नव्हता. माझे आजोबा आणि वडील अग्रभागी होते. जनसंघ संयुक्त समितीत सामील झाला, परंतु जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली, तेव्हा समिती फोडण्याचे पाप या जनसंघाने केले होते. भाजपने कायमच महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यामुळे मी शपथ घेऊ सांगतो, महाराष्ट्रासाठी ज्यांनी मर्दासारख्या गोळ्या छातीवर घेतल्या, तो महाराष्ट्र हुकूमशाहांच्या कचाट्यात जाऊ देणार नाही.’’

ठाकरे म्हणाले, ‘‘सुप्रिया तुमचे मला कौतुक वाटते. पहाडासारखी तू बापासोबत उभी राहिलीस. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवार यांनी काय केले, असे विचारतात, तर त्यांनी देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. महाविकास आघाडीचा मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ केले. आम्ही कधी खोटे बोललो नाही, जे बोलतो ते करून दाखवतो. राष्ट्रवादीला ‘करप्ट पार्टी’ म्हणता. परंतु सत्तर हजार कोटींचा गैरव्यवहार कोणी केला, बँक गैरव्यवहार कोणी केला, त्यांना आज तुम्ही बरोबर घेतले. तेव्हा ही करप्ट पार्टी तुम्हाला कशी चालते?, माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात आणि त्यांच्यासोबत असलेल्या गाढवांच्या आणि गद्दारांच्या टोळीला असली शिवसेना मानतात.’’

पंतप्रधान मोदी यांनी पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा, असा उल्लेख केला होता. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘‘भटकती आत्मा आहे, तशी एक वखवखलेली आत्मादेखील आहे. जी महाराष्ट्रात सगळीकडे फिरून सभा घेत आहे. ती आत्मा स्वत:साठी आणि मित्रांसाठी लढत आहे. त्यांनी जरा शेतकऱ्यांकडेही बघावे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घराकडे आणि त्यांच्या पत्नीच्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघावे. साडेतीनशे वर्षांपूर्वी

अशीच एक वखवखलेली आत्मा महाराष्ट्र आणि स्वराज्यावर चालून आली होती. ती परत कधीच गेली नाही. आजही ती आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे. एवढी वखवख बरी नव्हे.’’

Loksabha Election 2024
Lok Sabha Election : उमेदवारांची प्रचार रॅली आणि डोंबिवलीकरांची वाहन कोंडी!

त्यांचा झोपेतही घोडेबाजार...

पंतप्रधान मोदी यांची सोमवारी रेसकोर्सवर सभा झाली. त्याबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘सभेचे ठिकाण योग्य होते... रेसकोर्स. त्यांना झोपेतही घोडेबाजार दिसतो. हे घोडे वेगळे असून, तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतले आहे, ते ओझी वाहणारी गाढवे आणि खेचरे आहेत. खरे घोडे अश्वमेधाचे असतात. टरबुजाला हातगाडी लागते.’’

उद्धव ठाकरे म्हणाले...

  • २०१४ व २०१९च्या निवडणुकीत मी त्यांच्यासोबत सभा केल्या. तेव्हा त्यांना एवढ्या वेळा महाराष्ट्रात यावे लागले नाही.

  • दहा वर्षे तुम्हाला जनतेने दिली. तुम्ही काय केले, ते सांगा.

  • सर्वसामान्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले नाहीत, मात्र निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात कोट्यवधी रुपये आले

  • न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी दहा हजार कोटी रुपयांचे रोखे भाजपने छापून ठेवले होते.

...म्हणूनच मोदींना वारंवार यावे लागते : शरद पवार

पुणे : ‘‘कर्नाटकात एकाच टप्प्यात, तर उत्तर प्रदेशात दोन टप्प्यांत निवडणुका होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत निवडणुका कशासाठी,’’ असा सवाल करून ‘‘याचे कारण म्हणजे त्यांच्या यंत्रणांचा अहवाल त्यांना चांगला दिसत नाही. यश मिळण्याची शक्यता दिसत नाही, म्हणून देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावे लागते,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

पवार म्हणाले, ‘‘२०१४च्या निवडणुकीत पेट्रोलचे दर ७१ रुपये प्रतिलिटर होते. सत्तेत आल्यावर तो पन्नास दिवसांत कमी करू, असे मोदींनी सांगितले होते. आज ३ हजार ६५० दिवस झाले. आता पेट्रोलचे दर १०६ रुपये झाले आहेत. घरगुती गॅस ४१० रुपयांवरून खाली आणू. आज तो १ हजार १६० रुपये झाला आहे. मतदानाला जाताना सिलिंडरला नमस्कार करून जा आणि मते द्या, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यापैकी एकही आश्‍वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही.’’

तरुणांमध्ये अस्वस्थता असून, दोन कोटी लोकांना नोकरी देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. ‘आयएलओ’ संस्थेच्या अहवालानुसार आज शंभरपैकी ८७ तरुणांना नोकरी मिळू शकत नाही, असे सांगून पवार म्हणाले,‘‘त्यांच्या हाती सत्ता देणे हे देशाच्या हिताचे नाही, असा निष्कर्ष यावरून निघतो. सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी वापरायची असते. मोदी या सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे देशात बदल करण्याची गरज असून, निवडणुकीने ती संधी दिली आहे.’’

मावळे बरबाद करण्याचे पाप : पटोले

नाना पटोले म्हणाले, ‘‘मोदी-शहा यांच्या तानाशाह सरकारने लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराष्ट्राने एल्गार पुकारला आहे. जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी केवळ गुजरातचे आहेत. खोके सरकार येथील उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले. महाराष्ट्रात ड्रग्ज हे गुजरातच्या मार्गाने आणून शिवाजी महाराजांचे मावळे बरबाद केले जात आहेत, हे पाप केल्यावर महाराष्ट्र कधीही शांत राहणार नाही.’’

राज्यातील गुंतवणूक घालविली : सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘मी काहीच विकास केला नाही, असे म्हणणाऱ्या लोकांना माझे पुस्तक मी पाठवले आहे. ते वाचल्यावर कदाचित तेसुद्धा तुतारीला मत देतील. इतके वाईट गुण होते, तर इतकी वर्षे गप्प का बसलात. त्यांना कोण भाषणे लिहून देतात ते माहिती नाही. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवायची आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक घालविण्याचे पाप या सरकारने केले. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.