नवी दिल्ली : अवघा देश राजकीय प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये न्हाऊन निघाला असताना शनिवारी अठराव्या लोकसभेची रणभेरी वाजली. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असून पहिला टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी एकाचवेळी म्हणजे येत्या ४ जून रोजी होणार आहे.
लोकसभेच्या महासंग्रामात देशातील ९७ कोटी मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहे. लोकसभेबरोबरच आंध्रप्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही पार पडतील. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आज जाहीर केल्यानंतर देशभर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती व विविध राज्यांतील सणांचा विचार करून निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवादी देशातील या निवडणुकांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. ही निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पडावी म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
निवडणूक प्रचाराच्या काळात द्वेष पसरविणारी भाषणे आणि वैयक्तिक टीका रोखण्यासाठी निवडणूक आयोग अत्यंत गंभीर असून असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत,’’ असे ते म्हणाले. उमेदवारांना सुरक्षा पुरविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परंतु लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मात्र लगेच जम्मू व काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंध्रप्रदेशात एकाच टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. ओडिशामध्ये चार टप्प्यांत १३ मे, २० मे, २५ मे व १ जून रोजी मतदान होईल. अरुणाचल प्रदेश व सिक्कीममध्ये पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाचे लक्ष या ९ गोष्टींकडे
झुंडशाही
पैशाचा गैरवार
चुकीची माहिती
आचारसंहिता भंग
सीमांवरती ड्रोनची नजर
खासगी विमानांची उड्डाणे
दिशाभूल करणाऱ्या
जाहिराती
विविध माध्यमांवरील फेकन्यूज
लोकसभेनंतर नंदनवनातही निवडणूक
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्यात येईल. भौतिक आणि काही सुरक्षाविषयक अडथळ्यांचा विचार करता एकाचवेळी निवडणूक घेणे शक्य नव्हते, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये निर्वासितांच्या छावण्यांत राहणाऱ्या लोकांसाठीही वेगळी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.