Nashik Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्वतः त्यांनीच पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मी नाशिकमधून लढावं, असं मोदी-शाहांनी सुचवलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र मी नाशिकमधून लढणार नाही, मी माघार घेतली आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाचे लोक माझ्यासोबत होतो. पाच वर्षांमध्ये जी कामं झाली आहेत त्यामुळे त्यांनी मला समर्थन दिलं होतं. परंतु मी माघार घेत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
भूमिका स्पष्ट करताना छगन भुजबळ म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो होतो. त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरु झाली तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळांसाठी जागा मागितली. परंतु अमित शाह यांनी माझं (छगन भुजबळ) नाव पुढे केलं.
भुजबळ पुढे म्हणाले, दुसऱ्या दिवशीही माझंच नाव फायनल झाल्याचं मला सांगितलं. त्यामुळे मी बैठका घेतल्या. मराठा, ब्राह्मण, दलित, मुस्लिम सर्वांनीच माझ्यासोबत असल्याचा मला शब्द दिला. नंतर ही बातमी मीडियाच्या माध्यमातून बाहेर गेली. मी यासंदर्भात कामाला सुरुवात केली होती.
परंतु उमेदवार जाहीर होत नव्हता. मी याबाबत खात्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. त्यांना म्हटलं समीरला उभं करु. परंतु ते म्हणाले, नाही तुम्हालाच उभं राहायचं आहे.
मात्र जागा महायुतीने अधिकृतरित्या जाहीर करायला पाहिजे होती. अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही.
तीन आठवडे गेले तरी उमेदवार जाहीर झाले नाहीत. विरोधी पक्षांचे उमेदवार जाहीर होऊन त्यांचा प्रचारदेखील पुढे गेला आहे. यापेक्षा जास्त उशीर झाला तर नाशिकमध्ये महायुतीला अडचण येऊ शकते. सध्या जी संदिग्धता आहे, त्यामुळे मी हा गोंधळ दूर करण्यासाठी भूमिका जाहीर करत आहे.
''मी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझं नाव सुचवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु नाशिकच्या जागेबाबत अधिकृत घोषणा होत नसल्याने, तिढा सुटत नसल्याने मी माघार घेतली आहे.'' अशा शब्दात भुजबळांनी भूमिका स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.