नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 88 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून एकूण 1210 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मंगळवारी देण्यात आली. या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक 20 जागांसाठी पाचशे उमेदवार रिंगणात आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमधील 14 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात आहेत.
दुसऱ्या टप्प्यात बारा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. 88 जागांसाठी 2633 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील 1428 अर्ज वैध ठरले होते. 8 एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या तारखेनंतर रिंगणात एकूण 1210 उमेदवार शिल्लक राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यात ज्या प्रमुख नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यात काँग्रेसचे राहुल गांधी, डाव्या आघाडीच्या ऍनी राजा आणि भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांचा समावेश आहे. हे तिघेही वायनाड मतदारसंघातून उभे आहेत. याशिवाय तिरुवअनंतपूरम मध्ये काॅंग्रेसचे शशी थरुर, भाजपचे राजीव चंद्रशेखर आणि डाव्या आघाडीचे पी. रवींद्रन अशी तिहेरी लढत होत आहे. राजस्थानमधील कोटा मतदारसंघात मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, जोधपूरमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तर चित्तोडगडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांचे भवितव्य ठरणार आहे.
बिहार, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, त्रिपुरा, छत्तीसगड, आसाम, जम्मू काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, प. बंगाल आणि आउटर मणिपूर या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात २६ तारखेला मतदान होणार आहे. आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या 13 विधानसभा मतदारसंघात 26 तारखेलाच मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ जागांसाठी मतदान होईल. यासाठी एकूण 477 अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर 299 अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेतल्याच्या शेवटच्या तारखेनंतर या आठ जागांसाठी 204 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. राज्यातील ज्या आठ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.