विजय चोरमारे : सकाळ वृत्तसेवा
लोकसभेच्या रणांगणात गेल्या दोन महिन्यांत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्षाने महाराष्ट्र ढवळून निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका आणि पवार-ठाकरे यांनी त्यांचा घेतलेला सडेतोड समाचार यामुळे महाराष्ट्रातला सामना विशेष रंगतदार बनला. ‘मोदी की गॅरंटी’पासून सुरू झालेला प्रचार अखेरीस मंगळसूत्र, मुसलमान आणि पाकिस्तानपाशी येऊन थांबल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीच्या टीकेवरूनही कलगी तुरा चांगलाच रंगला. प्रत्येक टप्प्यात वेगळा मुद्दा आणि त्यावरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी हे यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. नवे सरकार बनवण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे, परंतु महाराष्ट्र ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने कौल देतो की, ‘एनडीए’ची पाठराखण करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिला टप्पा
विदर्भाच्या वाऱ्याची दिशा
१९ एप्रिल : पाच मतदारसंघ
(रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर)
रामटेकमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यातील लढत वगळता अन्य चारही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होती. २०१९ ला फक्त चंद्रपूरची जागा काँग्रेसला मिळाली होती, बाकी सर्व जागांवर युतीने कब्जा केला होता. यावेळी नागपूर वगळता सर्व ठिकाणी काँग्रेसने महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले असल्यामुळे चार जूनला पूर्व विदर्भातून आश्चर्यकारक निकाल येतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत असल्यामुळे या टप्प्याकडे देशाचे लक्ष लागून राहिले होते. प्रारंभीच्या टप्प्यात एकतर्फी वाटत असलेल्या नागपूरच्या लढतीत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी उत्तरार्धात तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र अयोग्य ठरवण्याच्या वादग्रस्त निर्णयाचा प्रभाव या टप्प्यावर दिसून आला. चंद्रपूरमधील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीतील १९८४च्या दंगलीच्या संदर्भाने केलेले वादग्रस्त विधानही या टप्प्यामध्ये चर्चेत राहिले. पहिल्या टप्प्यात स्थानिक प्रश्नांना पूर्णपणे बगल देऊन पूर्णपणे राष्ट्रीय मुद्यांवरच निवडणूक फिरत राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनी वातावरण तापवले होते. परंतु मतदान पार पडल्यानंतर मात्र वा-याची दिशा बदलली असल्याची चर्चा सुरू झाली. पूर्व विदर्भामध्ये भाजपचा पूर्वीसारखा प्रभाव दिसून आला नसल्याचा सूर निघू लागला.
दुसरा टप्पा
महाविकास आघाडीची हवा
२६ एप्रिल : आठ मतदारसंघ
(बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी)
पहिल्या टप्प्याच्या अखेरीस वातावरण बदलत असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच दुस-या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. या टप्प्यामध्ये पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचा समावेश होता. पंतप्रधानांसह राष्ट्रीय नेत्यांच्या सभांनी गाजलेल्या या टप्प्याने महाराष्ट्रातील महायुतीसाठी वातावरण चिंताजनक असल्याचा ठळक संदेश गेला. विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर आणि त्यांच्याविरोधात गतवेळी पराभूत झालेले अशोक चव्हाण एकत्र असूनही भाजपसाठी नांदेडची निवडणूक कठीण बनल्याचे चित्र पुढे आले. यावरून वारे कसे वाहात होते, याचा अंदाज येत होता. अकोला, अमरावती या दोन बहुचर्चित जागा या टप्प्यात होत्या. ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकरांमुळे अकोल्याची जागा चर्चेत होती. तर नवनीत राणांमुळे अमरावतीची चर्चा होती. राणांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा निकाल प्रलंबित असताना भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. आणि अर्ज भरण्याच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने येणे या गोष्टी दुर्लक्षित करता येणा-या नव्हत्या. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने इथून उमेदवार दिल्यामुळे लढत अधिक रंगतदार बनली. हिंगोलीच्या हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशीममधून दिलेली उमेदवारी तसेच परभणीतून राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना दिलेली उमेदवारी यासुद्धा या टप्प्यातील लक्षवेधी बाबी होत्या. विदर्भ-मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांपासून मराठा आरक्षणापर्यंतच्या अनेक मुद्द्यांचा प्रभाव या टप्प्यावर राहिला. सत्ताधा-यांसाठी हा टप्पा सर्वाधिक खडतर असल्याचे मानले जाते.
तिसरा टप्पा
साखर पट्ट्यातील संघर्ष
७ मे – ११ मतदारसंघ
(रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले)
रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदूर्ग वगळता हा टप्पा म्हणजे महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यावरील वर्चस्वाची लढाई होती. भारतीय जनता पक्षाने हा टप्पा इतका गांभीर्याने घेतला, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसांत सहा सभा झाल्या. बारामतीची सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही या टप्प्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत होती. माढ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून अखेरपर्यंत ताणलेली उत्कंठा आणि अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीमुळे माढा आणि सोलापूर दोन्ही मतदारसंघांतील रंगत वाढली. कोल्हापुरातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उमेदवारीने आणि सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीपासून अंतर ठेवण्याची राजू शेट्टी यांची भूमिका त्यांचा राजकीय घात करणारी ठरली. त्यांच्या निर्णयाने राज्यभरातील त्यांच्या हितचिंतकांना निराश केले. कोल्हापुरात सतेज पाटील, सांगलीत विश्वजित कदम, सोलापुरात प्रणिती शिंदे आणि लातूरमध्ये अमित देशमुख अशा काँग्रेसमधील नव्या पिढीतील चार नेत्यांच्यादृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरणारा आहे. सातारा येथील उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या लढतीकडेही लक्ष लागले आहे.
चौथा टप्पा
मराठा आंदोलनाचा प्रभाव
१३ मे २०२४ : ११ मतदारसंघ
(नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड)
खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा तीन विभागांतील निवडणूक या टप्प्यात झाली. महाराष्ट्रात अनेक महिन्यांपासून बहुचर्चित ठरलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण विषयक आंदोलनाचा प्रभाव या टप्प्यावर ठळकपणे जाणवला. बीड, जालना या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे नंदूरबारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या. याच टप्प्यात पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’चा उल्लेख केला आणि मोदींनी केलेल्या टीकेला विधायक वळण देऊन शरद पवार यांनी त्याभोवतीच प्रचार केंद्रित केला. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन्ही पक्षांना सोबत येण्याचे आवाहनही याच टप्प्यात मोदींनी केले आणि तेही त्यांच्या अंगलट आल्याचे पाहावयास मिळाले.
पाचवा टप्पा
मुंबईवरील वर्चस्वाची लढाई
२० मे- १३ मतदारसंघ
(धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण)
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरील वर्चस्वाची लढाई या टप्प्यामध्ये आहे. २००९ मध्ये सहापैकी सहा मतदारसंघ ताब्यात असलेली काँग्रेस २०१४ मध्ये शून्यावर आली आणि २०१९ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या सहकार्याने मुंबईतील निसटलेली जमीन पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस इथे करीत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईतील तीन जागा लढवत असल्यामुळे खरी शिवसेना कोणती, याचाही निकाल लागेल. कल्याणची लढत श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने एकतर्फी असली तरी एकनाथ शिंदे यांचे ठाणे कुणाला कौल देणार याची उत्कंठा आहे. धुळे, दिंडोरीतील लढती अखेरच्या टप्प्यात लक्षवेधी बनल्या असून भुजबळांच्या भूमिकेमुळे नाशिकमध्येही रंग भरले आहेत. भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष मुंबई महानगर क्षेत्रात झेंडा फडकावण्याची आस बाळगून आहे. पालघरमध्ये भाजप आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या सामन्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ‘इम्पॅक्ट प्लेअर’ ठरणार काय, याची उत्कंठा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.