Madhavi Latha Exclusive : थेट ओवेसींसमोर उभे राहण्याचा निर्णय का झाला ? माधवी लता यांनी सकाळशी बोलताना सांगितलं कारण

हैदराबादेत ओवेसी यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान देण्यासाठी भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे अभिनेत्री, गायिका, समाजसेविका, रुग्णालयाच्या अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत माधवी अत्यंत आत्मविश्वासाने ओवेसी यांना लोकसभा मतदारसंघात आव्हान देत आहेत.
Madhavi Latha Interview
Madhavi Latha Interviewsakal
Updated on

हैदराबाद : हैदराबादेत ओवेसी यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान देण्यासाठी भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे अभिनेत्री, गायिका, समाजसेविका, रुग्णालयाच्या अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत माधवी अत्यंत आत्मविश्वासाने ओवेसी यांना लोकसभा मतदारसंघात आव्हान देत आहेत.निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या माधवी लता यांची उमेदवारी अन् वक्तव्ये संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रचाराच्या धकाधकीत माधवी लता यांनी सकाळशी साधलेला हा संवाद

हैदराबादच्या मुस्लिम धर्माधिष्ठित राजकारणाला आव्हान देण्यासाठी आपण रिंगणात उतरला आहात का?

- मी सनातन धर्माची म्हणजेच हिंदू धर्माची पाईक आहे. या धर्माच्या तत्त्वात कुठल्याही धर्माला हीन लेखण्याची शिकवण नाही. दुसऱ्याची धर्मस्थळे फोडा, मूर्ती उद्‍ध्वस्त करा अशी या धर्माची शिकवणच नाही. त्यामुळे मी विशिष्ट धर्माला आव्हान देण्यासाठी सक्रिय झालेले नाही. मात्र कुणी धर्माच्या आधारावर केलेला अन्याय खपवूनही घेणार नाही. योग्य ते मत मांडणे, दु:खी दीनांची सेवा करणे हे माझ्या धर्माचे सार आहे. ते मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालत शक्य ते सर्व करण्यासाठी मी सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. मी मुस्लिम समाजातल्या महिला, तरुण मुलांसाठी यथाशक्ती काम करते. त्यामुळे मी कुठल्याही विशिष्ट धर्माच्या ठेकेदाराला आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरलेले नाही तर हैदराबादच्या अन् देशाच्या विकासाला गती देण्यासाठी निवडणूक लढते आहे.

आपल्यासारख्या नवागताला थेट ओवेसींसमोर उभे करण्याचा निर्णय कसा झाला?

- खरे तर मला निवडणूक लढण्यासाठी निवडले गेले आहे हे मलाही दूरदर्शनवरूनच समजले. मी तलाकपीडित मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी काम करते याची भाजपच्या नेत्यांना कल्पना होती अन त्यामुळेच मला ही संधी मिळाली असावी.

मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात येऊ नये असे पंतप्रधान मोदी यांना वाटते असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले, त्यावर तुमचे मत काय?

- नरेंद्रभाई मोदींना नव्हे तर असदभाईंनाच मुस्लिम समाजाला मागास ठेवण्यात रस आहे. सातत्याने जिंकून आले तरी त्यांनी जुन्या हैदराबादचा काय विकास केला? येथील नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी काय योजना आणल्या? नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ अशा विचारांचे आहेत. मतदार यादीत गैरव्यवहार करीत जिंकणाऱ्यांनी अकारण आरोप कशाला करावेत?

हैदराबादेत बोगस मतदारांची नावे आहेत असे आरोप आपण केले आहे?

- हो अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.कारवाई सुरू आहे. हैदराबादेतील कित्येक नावे अन्य मतदारसंघात पाठवली गेली आणि काही काल्पनिक नावे यादीत टाकण्यात आली असे म्हणतात. शोध सुरू आहे.

मशिदीच्या दिशेने आपण बाण मारलात असा आरोप होत आहे?

- हनुमान जयंतीच्या दिवशी हवेत प्रतिकात्मक बाण मारण्याचे कृत्य मी हावभावातून केले पण तो मशिदीच्या दिशेने मारलेला बाण नव्हता तर भारतात समृद्धी नांदू दे यासाठी देवाकडे याचना करणारी कृती होती. माझा धर्म मशीद किंवा कोणाच्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्याची शिकवण देत नाही.

आपण काही महिलांचे कारण देत कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले होते असा आरोप होत आहे

- संपूर्ण हकिगत सांगते. होळीच्या दिवशी रंग खेळणाऱ्या काही तरुणींना मशिदीतून नमाज पढून येणाऱ्या मुलांनी मारझोड केली. ही घटना समजताच मी या मुलींना मदत करायला तेथे जात होते, मला थांबवण्यात आले. याला मी विरोध केला.अडचणीत आलेल्या महिलांना मदत करणे ही मी माझी जबाबदारी मानते. मी मोफत प्रसूतीचे जे अभियान राबवते त्यातही गरीब महिलांना मदत करणे हाच उद्देश असतो. माझ्या या अभियानात जी हजारो मोफत बाळंतपणे झाली त्याचा लाभ कित्येक मुस्लिम महिलांनाही झाला.अल्पसंख्याकांना मदत करणे चालते अन बहुसंख्याकांना नाही हा कसला प्रकार?

‘एमआयएम’ हा पक्ष भाजपची ‘बी टीम’ आहे असे म्हणतात. त्यामुळे तुमची उमेदवारी ही प्रतिकात्मक आहे, जिंकण्यासाठी नाही असे म्हणतात.

- धर्माच्या नावाने राजकारण करणारा कोणताही पक्ष भाजपची ‘बी टीम’ कशी असू शकेल? आम्ही अत्यंत ताकदीने निवडणूक लढतोय, तेही जिंकण्यासाठी. प्रतिकात्मक लढाई असती तर पंतप्रधान मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आवर्जून प्रचारासाठी आले असते का?

या निवडणुकीत भाजपकडून धर्माधारित प्रचार झाल्याचा आरोप आहे

- नाही अजिबात नाही. धर्माच्या आधारावर भाजप नाही तर ‘एमआयएम’ आणि काँग्रेस मते मागतात.ओवेसी निवडणूक हरतील अशी स्थिती आहे म्हणून ते वाटेल ते आरोप करत आहेत.

तुम्ही उच्चवर्णीय महिला असल्याने तुम्हाला प्रसिध्दी मिळते असे ओवेसी म्हणतात

- मी जातीने ज्याला उच्च म्हणतात अशा जातीत जन्मले हे खरे पण मी दारिद्र्य अनुभवले आहे. घरातले उत्पन्न अत्यल्प होते. कसेबसे जीवन कंठले आहे आम्ही. आज परिस्थिती बदलली पण गरिबी व भेदभाव हे सगळे मी बघितले आहे.

हैदराबादचे मतदान झाल्यानंतर पुढील योजना काय?

- पक्ष आदेश देईल तिथे मी प्रचाराला जाईन. देशाची प्रगती व्हावी यासाठी समाजसेवा सुरू असेलच. अन विश्वास ठेवा मी जिंकणार आहे. भारतात सनातन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांची सत्ता आहे आणि ती कायम असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com