मुंबई : उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे येत असताना प्रारंभीच्या काळात सोपी वाटणारी काही गणिते अवघड बनत चालल्याचे चित्र पुढे येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंना नव्या गुंतागुंतीचा सामना करावा लागत असल्यामुळे उमेदवारी यादीच्या घोषणेला विलंब होत आहे.
सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित मानले जात असताच आज त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढविण्यास नकार दिला. श्रीनिवास पाटील यांच्या नकारामुळे साताऱ्याचे सोपे गणित पवार यांच्यासाठी अवघड बनल्याचे चित्र पुढे आले. उदयनराजे भोसले यांनी आधीच शक्तिप्रदर्शन करून महायुतीवर दबाव वाढवला असल्यामुळे महायुतीसाठीही साताऱ्याची जागा वादात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अदलाबदलीची चर्चा असलेल्या नाशिकचा गुंताही हेमंत गोडसे यांच्या आक्रमक भूमिकेने अवघड बनला आहे.
एकोप्याचा सूर?
सांगली आणि भिवंडीसाठी काँग्रेसची मागणी कायम असून मुंबई दक्षिण -मध्यसाठीही पक्षाचे नेते आक्रमक आहेत. आता विषय मैत्रीपूर्ण लढतीपर्यंत पोहोचला आहे. महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद तीन एप्रिलला होणार आहे. त्यात एकोप्याचा सूर कसा आळवला जाणार हा प्रश्न आहे. अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीचा भाग असलेल्या बच्चू कडू यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. हे बंड राणा यांच्याविरोधात दाखवले जात असले तरी ‘प्रहार’च्या उमेदवारीचा फायदा नवनीत राणा यांना होणार असल्याचा अंदाज आहे.
नगर दक्षिणचा विषय मार्गी
‘राष्ट्रवादी’साठी (शरद पवार गट) नगर दक्षिणचा विषय मार्गी लागला आहे. पारनेरचे आमदार नीलेश लंके हे त्यांची आमदारकी शाबूत ठेवून पत्नी राणी लंके यांना लोकसभेला लढविण्याच्या विचारात होते. परंतु सुजय विखे यांच्या विरोधात तुल्यबळ लढत होण्यासाठी ते आमदारकीचा राजीनामा देऊन रिंगणात उतरले आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील ठाम राहणार का?
माढ्यातून धैर्यशील मोहिते यांच्या उमेदवारीची स्पष्टता अद्याप होऊ शकलेली नाही. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक पाहता धैर्यशील मोहिते पाटील भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहणार का, असा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.