मुंबई : राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघासह इतर काही ठिकाणी मतदानादरम्यान गैरप्रकार आणि ईव्हीएम छेडछेडीच्या घटना समोर आल्या होत्या. यावर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. हे व्हिडिओ जुने असून त्याचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. (Maharashtra Loksabha Election 2024 Chief Electoral office clarification on viral videos of EVM tampering)
महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानं ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, "काही व्यक्ती निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवणारी कृती करतानाचे आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतानाच्या इतर राज्यांमधील जुन्या चित्रफिती समाज माध्यमांवर फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या चित्रफिती लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेशी संबंधित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान पार पडलं. यावेळी परळीसह केज, धारुर तालुक्यांमध्ये मतदान केंद्रचं ताब्यात घेऊन तिथं उघडपणे बोगस मतदान सुरु असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी एकामागून एक असे मतदानावेळी घडलेल्या गैरप्रकारांचे अनेक व्हिडिओ ट्विट केले होते. परळीत भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता. रोहित पवारांनी परळीतील या प्रकाराला धनंजय मुंडेंच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी या गैरप्रकारांवरुन निवडणूक आयोगाकड तक्रार केली होती. त्यांनी पत्रात म्हटलं होतं की, परळी मतदार संघातील इंजेगांव, सारडगांव, धर्मापुरी, डिग्रस, नाथ्रा, कीडगांव साबळा, जिरेवाडी, बालेवाडी व कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्र १८८, १८९, १३२ व १६१ आणि केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव, माजलगांवमधील गोविंदवाडी व धारुर मधिल सोनिमोहा, पिंपरवडा, मंदवाडी व चाडगांव आष्टीमधील वाली आणि पाटोदा मधील वाघीरा हे सर्व मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान करण्यात आलं आहे.
या बोगस मतदानांबाबतचे व्हिडिओ शऱद पवार गटाकडून कालच निवडणूक आयोगाकडं देखील सादर करण्यात आले होते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाकडून हे व्हिडिओज जुने असल्याचं स्पष्टीकरण आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.