Loksabha Election: राज्यासह देशात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणचे उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. राज्यात निवडणुकांसंबधी घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान आज राज्याचं लक्ष लागलेल्या महत्त्वाच्या जागांवरील अर्ज आज भरले जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज (ता. १८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने होणाऱ्या सभांमध्ये दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्ला चढविला जाणार आहे. त्यामुळे उन्हाच्या पाऱ्यासह शहरातील राजकीय वातावरणदेखील तापणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी पोलिस आयुक्तालयाजवळील हॉटेल ब्ल्यू नाईल चौकात सकाळी १० वाजता महायुतीची सभा होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुणे मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे तिघे एकत्रित अर्ज भरणार आहेत. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, संजय राऊत, संजय आहिर हे उपस्थित राहणार आहेत.
या उमेदवारांचा अर्ज भरल्यानंतर रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे महाविकास आघाडीची सभा होणार आहे. दरम्यान, तिन्ही मतदारसंघातील उमेदवार, राज्यातील नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याने पुण्यात महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे.
महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे पुढच्या आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर आणि पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे २५ एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेत. महायुतीतील सर्व नेते उपस्थित राहावेत, यासाठी त्यांच्या वेळेच्या नियोजनानुसार अर्ज भरण्याची तारीख ठरवली जात असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पर्यायी उमेदवार म्हणून सुनंदा राजेंद्र पवार व सचिन दोडके यांचा अर्ज भरला जाणार असल्याची शक्यता आहे, तर सुनेत्रा पवार यांना पर्यायी उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज विकत घेण्यात आला असल्याचे समजते. ऐनवेळेस काही तांत्रिक मुद्दे समोर आले तर पर्यायी उमेदवार असावेत, या उद्देशाने प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस अशा उमेदवारांचे अर्ज भरून ठेवले जातात. छाननीदरम्यान प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर पर्यायी उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.