लक्षवेधी लढत : भाजपच्या आव्हानामुळे तिरंगी लढत

तमिळनाडूतील प्रमुख मतदारसंघ शिवगंगामधील मुख्य लढत ही काँग्रेस आणि अण्णा द्रमुक यांच्यात आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम काँग्रेस आणि सत्ताधारी द्रमुकच्या आघाडीचे उमेदवार आहेत.
लक्षवेधी लढत
लक्षवेधी लढत sakal
Updated on

नवी दिल्ली : तमिळनाडूतील प्रमुख मतदारसंघ शिवगंगामधील मुख्य लढत ही काँग्रेस आणि अण्णा द्रमुक यांच्यात आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम काँग्रेस आणि सत्ताधारी द्रमुकच्या आघाडीचे उमेदवार आहेत. तर त्यांना अण्णा द्रमुकचे ए. झेवियर दास यांनी आव्हान दिले आहे.

शिवगंगामधील सहा विधानसभांपैकी थिरुमायम, अलांगुडी, तिरुपत्तुर, मनमदुराई या चार विधानसभा द्रमुककडे आहेत. तर कराईकुडी मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. अण्णा द्रमुककडे केवळ शिवगंगा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे कागदावर कार्ति चिदंबरम यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र,दक्षिणेतील राजकीय दुष्काळ संपविण्याच्या ईर्ष्येने लढणाऱ्या भाजपने इथे यादव मतांवर डोळा ठेवून स्थानिक पक्ष इंडिया मक्कल कल्वी मुन्नेत्र कळघम (आयएमकेएमके)यांच्याशी आघाडी करून पक्षाचे प्रमुख टी. देवनाथन यादव यांनाच आपल्या निवडणूक चिन्हावर मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढतीची चिन्हे आहेत.

शिवगंगा लोकसभा मतदारसंघ तसा तब्बल नऊ वेळा काँग्रेसकडे राहिला आहे. त्यातही पी. चिदंबरम तब्बल पाच वेळा येथील खासदार होते. १९६७ आणि १९७१ मध्ये द्रमुकने शिवगंगामध्ये विजय मिळवला असला तरी त्यानंतर १९७७ आणि २०१४ मधील अण्णा द्रमुकच्या विजयाचा अपवाद सोडला तर हा मतदारसंघ १९८० ते २०१४ पर्यंत सलग दहा वेळा काँग्रेसच्या त्यातही सर्वाधिक काळ पी.चिदंबरम यांच्या ताब्यात राहिला आहे.

१९८० मध्ये काँग्रेसचे आर व्ही.स्वामिनाथन यांचा अपवाद सोडला तर १९८४,१९८९,१९९१ पर्यंत पी. चिदंबरम यांनी काँग्रेसतर्फे शिवगंगाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले.त्यानंतर त्यानंतर जी. के.मुपनार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्थापन केलेल्या तमीळ मनिला काँग्रेसतर्फेही पी.चिदंबरम १९९६ ते १९९९ असे दोनदा शिवगंगाचे खासदार राहिले. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि २००४ ते २०१४ पर्यंत शिवगंगाचे खासदार राहिले.अर्थात,२००९ मध्ये चिदंबरम यांची निवडणूक वादग्रस्त ठरली होती.

अवघ्या ३५४ मतांनी ते निवडून आल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीपासून पी. चिदंबरम दूर गेले आणि २०१९ मध्ये त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम काँग्रेसतर्फे शिवगंगाचे खासदार झाले. तमिळनाडूत भाजपने प्रभाव वाढविण्यासाठी कंबर कसली असल्यामुळे शिवगंगामध्ये मात्र भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे दिसते. २०१९ च्या निवडणुकीमध्ये कार्ति चिदंबरम यांनी विजय मिळवला असला तरी भाजप आणि अण्णा द्रमुक युतीचे उमेदवार असलेले एच. राजा यांनी दुसऱ्या क्रमांकाची २१.६३ टक्के मते घेतली होती.

पक्षाचे वर्चस्व

२०१४ : अण्णाद्रमुक, २००९ : काँग्रेस, २००४ : काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.