प्रश्न : सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळेल अन् नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, याबद्दल भाजपला प्रचंड विश्वास दिसतोय. तो अतिआत्मविश्वासाकडे झुकतो आहे, असे आपणास वाटते का?.
शेलार : नरेंद्र मोदी स्वत:ला प्रधानसेवक मानतात. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात विकासाची गती प्रचंड वेग घेत आहे. भारतातील प्रत्येक वर्गाला त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीपथावर नेणारे काही महत्वाचे मिळत असल्याने ‘मोदी की गॅरंटी’ हा शब्द रुढ झालाय आणि त्या विश्वासामुळेच मोदी परिवार वाढतो आहे. नोकरी, व्यवसाय, धंदा, शेती यात बरकती येते आहे. चांगले शिक्षण, गरिबी निर्मूलन, महिलांना विकासासाठी सोयीसुविधा, सामान्य आणि गरीब सर्वसामान्यांसाठी मोफत किंवा माफक दरात सुधारलेल्या आरोग्यसेवा या बदलांमुळे भारत विश्वगुरु होण्याकडे वाटचाल करतो आहे. त्यामुळेच जनता मोदी यांना सलग तिसर्यांदा अन् तेही मताधिक्क्यात भरघोस भर घालत निवडून देणार हे सरळ आहे. जनतेच्या आकांक्षा मोदी पूर्ण करु शकतात याचा विश्वास आहे. तो किती सार्थ आहे ते बघालच.
प्रश्न : मोदींच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली...
शेलार : (मध्येच तोडत) १९७० साली ज्या मानसिकतेच्या नोकऱ्या असायच्या त्यात पोस्टात चिकटवले, मंत्रालयात घुसवले, असे असायचे. तो निकष लावून तपासले जातेय त्यामुळे रोजगाराबद्दल ओरड होतेय. आता संधी, साधने बदलली आहेत. तंत्रज्ञानावर आधारित रोजगार, लघुउद्योग वाढले आहेत. रोजगार बदलले आहेत.
प्रश्न : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही वर्षांत विचका झाला, त्याबदद्ल आपले मत?
शेलार : तीन पक्ष आमच्याविरोधात एकत्र आले आहेत. त्यांची विचारसरणी एक नाही. ध्येयधोरणे वेगळी आहेत. ते सत्याचा अपलाप करताहेत. खरे तर ‘दिया और तुफान’ची गोष्ट आहे. आमचा सत्याचा दिवा आहे. तीन पक्ष अपप्रचाराचे तुफान आणण्याचा प्रयत्न करताहेत. ते आले तरीही सत्याचा दिवा विझणार नाही.
प्रश्न : तुम्ही पक्ष फोडलेत, घरे फोडली?
शेलार : पक्ष फुटले याला भाजप जबाबदार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला योग्य संधी मिळाली असती तर शिवसेनेची दोन शकले झाली नसती. अजित पवार यांना राष्ट्रवादीत वाढीला सुरक्षित वातावरण आहे, असे वाटले असते तर त्या पक्षात काही झाले नसते. शिवसेना फुटली ती अतिमहत्वाकांक्षेमुळे अन् राष्ट्रवादी पुत्रीप्रेमामुळे. भाजप हा जनतेच्या आकांक्षांशी नाते सांगणारा पक्ष असल्याने ते आमच्याकडे आले. उध्दव ठाकरे काय किंवा शरद पवार काय त्यांना चाणक्याच्या सुत्रानुसार दंडित करणे उचित होतेच. आमच्यासमवेत निवडणूक लढवून अन् मोदीजींच्या नावावर मते घेवून उध्दव ठाकरेंनी दोगलेपणा केला होता आणि आमच्या विरोधात मोट बांधली जाईपर्यंत आम्हाला सत्तास्थापनेच्या चर्चात गुंतवून शरद पवारांनी धोका दिला होता. हे दोघेही आमच्याशी ठगासारखे वागले. सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी काही वेळा नीतिनियम जरा बाजूला ठेवावे लागतात. ते आम्ही केले.
प्रश्न : नियम बाजूला ठेवणे म्हणजे आज ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याला उद्या पावन करून घेणारे वॉशिंग मशिन होणे काय?
शेलार : आमच्याकडे आलेल्या कुणावरचेही खटले मागे घेतलेले नाहीत. यंत्रणा त्यांचे काम करताहेत. दोषसिध्द झालेल्या कुणालाही आम्ही पक्षात घेतलेले नाही. तसा नियमच आहे आमचा.
प्रश्न : तुमच्यावर निष्ठा असणाऱ्या मतदारांनाही हे पटत नाही.
शेलार : असे जर खरेच असेल तर काही वर्गांशी संवाद साधण्यात आम्ही कमी पडलो असू. त्यांना परिस्थिती माहिती आहेच. शिवाय शंकानिरसन करण्याचे काम आमची कार्यकर्त्यांची फळी करेल. विरोधी आघाडीकडे भाजप आणि महायुतीच्या ताकदीला पुरुन उरण्याचे ना मनोबल आहे ना कार्यक्रम ना कार्यकर्त्यांची यंत्रणा.
प्रश्न : राज्यातील महायुती सरकारने असे काय केलेय की जनतेने आपल्या मागे उभे राहावे?
शेलार : पेट्रोल, डिझेलचे उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले दर कमी करण्यापासून तर अडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गतीने सुरू करण्यापर्यंत सगळे केले आम्ही. शेतकऱ्यांना मदत, महिलांना प्रवास सुविधा, किती तरी निर्णय सांगता येतील.
प्रश्न : तरीही मुंबईतला मराठी माणूस तुमच्यासमवेत नाही.
शेलार : शिवसेना एकसंघ होती तेव्हाही मुंबई आमच्यासमवेत होती. महापालिका निवडणुकीतही अन् विधानसभेतही. उद्धव ठाकरेंच्या सरकार विरोधातला कौल मतयंत्रातून बाहेर पडेल. कारण घरी बसणाऱ्या, सत्तेसाठी विचारसरणीशी तडजोड करणाऱ्या, कुठलेही प्रगतीप्रकल्प न राबवणारे नेते जनतेला आवडत नाहीत. भाजप विकासाला गती शक्ती देणारा प्रकल्प आहे, हे जनता जाणते.
आशिष शेलार
जनहिताची ठोस पावले उचलणारे सरकार आणि जनतेच्या विकासाची मोदी गॅरंटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कटिबध्द असलेली पक्षयंत्रणा या दोन भाजपच्या नेतृत्वातील महायुतीच्या जमेच्या बाजू आहेत. आम्हाला निवडणुकीत पराजित करण्याचे बळ कोणत्याही आघाडीत नाही. देशात ४०० आणि महाराष्ट्रात ४५ जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार व्यक्त करतात.
मृणालिनी नानिवडेकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.