Amravati Lok Sabha Constituency : नवनीत राणा- वानखेडेंत चुरशीची लढत ; यंदा भाजप व कॉँग्रेस अनेक वर्षांनंतर समोरासमोर

अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांनंतर भाजपचे कमळ व काँग्रेसचा पंजा दिसणार आहे. काँग्रेसचे बळवंत वानखडेंविरुद्ध भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात थेट लढत होईल.
Amravati Lok Sabha Constituency
Amravati Lok Sabha Constituencysakal
Updated on

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांनंतर भाजपचे कमळ व काँग्रेसचा पंजा दिसणार आहे. काँग्रेसचे बळवंत वानखडेंविरुद्ध भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात थेट लढत होईल. मात्र दिवसागणिक घडणाऱ्या विविध घडामोडींनी अतिशय वेग घेतल्याने यंदा चुरशीची टक्कर राहील, हे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी व महायुतीत एकाच वेळी बंड पुकारण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बंड टिकेल काय, याकडेच आता मतदारांचे लक्ष आहे.

महायुतीतला बेबनाव, आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत ‘प्रहार’च्या वतीने दिनेश बूब यांना जाहीर केलेली उमेदवारी, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, रिपाइंने उमेदवारीची केलेली घोषणा, यामुळे ही निवडणूक गाजणार आहे. त्यातच शिवसेनेच्या दोन्ही गटांनी चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीत असतानाही माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते उमेदवारी दाखल करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असलेल्या दिनेश बूब यांनी ‘प्रहार’च्या वतीने निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय राजकीय हालचाली होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, अमरावती मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकाही ठिकाणी भाजपचा आमदार नाही, तर दुसरीकडे तीन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणा दाम्पत्याने मोर्चा उघडल्याने शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते त्यांच्या विरोधात प्रखरपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच काँग्रेससुद्धा या मतदारसंघात आपला पंजा प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.

त्यांना ठाकरे गटाची तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची भक्कम साथ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दिनेश बूब यांच्या उमेदवारीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुणाच्या बाजूने राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विविध पक्ष, संघटना तसेच नेते राणा यांच्याविरोधात असले तरी आमदार रवी राणा यांच्या आजवरच्या राजकीय हालचाली लक्षात घेता ते गप्प बसणाऱ्यातील नाहीत. त्यामुळे ही लढत राजकारणाच्या सारीपाटावर इतिहास घडवेल, असे जाणकारांचे मत आहे.

Amravati Lok Sabha Constituency
Loksabha Election 2024 : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष उमेदवार होत्या व त्यांनी ५ लाख १० हजार ९४७ मते मिळवून विजय प्राप्त केला होता. तर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी ६५ हजार १३५ मते मिळविली होती.

विकासावर केवळ राजकारणच

अचलपूरची फिनले मिल गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून विमानाचे उड्डाण झालेले नाही. चिखलदऱ्याचा स्कायवॉक रखडला आहे. शकुंतला रेल्वेसुद्धा बंद पडली आहे. रोजगाराच्या दृष्टीने पाहिजे तसे प्रकल्प जिल्ह्यात आलेले नसल्याची ओरड आहे. असे असले तरी विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक होण्याऐवजी राजकीय मुद्देच अधिक प्रभावी राहतील, हे स्पष्ट आहे.

समीकरणावर खल

अमरावती मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख २८ हजार ९७० एवढी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाची मते सुमारे चार ते पाच लाख आहेत. मेळघाटच्या आदिवासीबहुल भागात सुमारे तीन ते चार लाख मते आहेत. मुस्लिम मतांची संख्या तीन ते चार लाखांच्या घरात आहे, तर ओबीसी प्रवर्गाची मते सहा ते सात लाख आहेत. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल तसेच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना उमेदवारी दिल्याने ते मेळघाटात चांगलाच जोर लावतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे नवनीत राणा येथे कोणती युक्ती लढवितात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.