मुलाखत : राज्यात ओबीसी समाजाचे २२ उमेदवार उभे करणार

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी जनमोर्चा या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही.
प्रकाश शेंडगे
प्रकाश शेंडगेsakal
Updated on

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी जनमोर्चा या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही. त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी लोकसभेच्या रिंगणात २२ उमेदवार उतरविण्याचा त्यांचा मानस असून त्यासाठी ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेण्याची त्यांची तयारी आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत...

पांडुरंग म्हस्के

प्रश्न : धनगर समाजासह अन्य ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यातील अग्रणी म्हणून तुम्ही आहात. असे असताना समाजाच्या माध्यमातून लढा उभा करण्याऐवजी स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याची गरज का भासली?

उत्तरः महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचे तीन तेरा वाजताना आपण पाहत आहोत. मराठा समाजाने सत्तेच्या माध्यमातून सत्तेवर दबाव टाकून आमच्या आरक्षणाचा सत्यानाश केला आहे. ओबीसी भटके मुक्त, मागासवर्गीय समाज आणि सर्व मिळून आपले राज्य आणायचे असे ठरले आहे. यासाठी राजकीय पक्ष काढण्याचा आम्ही ठरवले. आता ही आरक्षणाची लढाई राजकीय लढाई म्हणून येऊन ठेपली आहे.

प्रश्न : असे असले तरी राजकीय पक्षाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवू शकाल का ?

उत्तरः ओबीसी समाजाची संख्या ६० ते ६५ टक्के एवढी असताना सुद्धा सगळे खासदार मराठा, सगळे आमदार मराठा, घटनेचा अधिकार असताना सुद्धा सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊन दिला नाही. आता पक्ष स्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे उरला नव्हता.

मुळात राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नव्हता. मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु झाले आणि त्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका वारंवार मांडली गेली. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नव्हता. परंतु सरसकट कुणबी दाखले देऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आणणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर घाला होता. त्यानंतर आमदारांची घरे जाळणे, ओबीसी समाजावर बहिष्कार घालणे आदी प्रकार झाले. त्यामुळे समाजात भीतीची लाट निर्माण झाली. अशावेळी या समाजाला आधार देणे गरजेचे असल्याने पक्षाची आवश्यकता होती. त्यातूनच ओबीसी जनमोर्चा या पक्षाची निर्मिती झाली.

प्रश्न : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या विरोधात थेट भूमिका घेऊन रान पेटविले. त्यामुळे ओबीसींचा नेता म्हणून भुजबळ यांच्याकडे पाहू लागले. त्याला शह देण्यासाठी तुम्ही हा पक्ष काढला ?

उत्तरः भुजबळ हे आमचे नेते आहेत. भविष्यातही ओबीसी समाजाचे नेते म्हणून भुजबळच राहणार आहेत. मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भुजबळ यांना ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात आले. ते पाहता त्यांना संरक्षण देण्याची गरज होती, त्यासाठी ओबीसी समाज म्हणून आम्ही पुढे यायचे ठरवले. आणि ओबीसींचे मेळावे घेण्यास सुरवात केली. एक भुजबळ पडले, तर १६० मराठा आमदार आम्ही ओबीसी पाडू, अशी भूमिका आम्ही घेतली. ओबीसींच्या आरक्षणाचे वस्त्रहरण हतबलपणे पाहणे आम्हाला शक्य नव्हते. कारण शासन जरांगे यांच्या दबावाखाली होते. त्यातूनच ५७ लाख बोगस कुणबी दाखले देण्यात आले.

प्रश्न : या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची काय भूमिका असणार आहे ?

उत्तरः या निवडणुकीत २२ जागांवर बहुजन समाजाचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. बारामती, सांगली, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, हातकणंगले, बीड, उस्मानाबाद, माढा,शिर्डी, नगर-दक्षिण, रत्नागिरी, उत्तर मध्य मुंबई, औरंगाबाद, सातारा आणि मावळ आदी मतदार संघात आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर यांचीही भेट घेणार आहोत.

प्रश्न : प्रकाश आंबेडकर यांनी तर जरांगे यांची भेट घेतली आहे, अशा परिस्थितीत वंचित बरोबर जाणार का ?

उत्तरः प्रकाश आंबेडकर जर जरांगे यांची भेट घेऊन त्यांचे राजकीय समीकरण जुळणार असेल, तर त्यांच्याशी युती शक्य नाही. मात्र आमचा प्रयत्न सर्व समाज घटकांना सोबत घेण्याचा असेल.

प्रश्न : निवडणुकीसाठी पक्षाचा अजेन्डा काय असणार आहे ?

उत्तरः या निवडणुकीत आरक्षण वाद्यांना मतदान करा असाच आमचा अजेंडा असणार आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसा नव्हे मात्र लोकशक्ती आहे. केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला सुद्धा पाहायला मिळेल. मागील ७५ वर्षात जे पाहायला मिळाले, ते यापुढे न पाहण्यासाठी आता आम्ही उतरलो आहोत. आमच्याकडे साधना नाहीत आमच्याकडे पैसा नाही. पण, आमच्याकडे लोकशक्ती आहे. आमच्याकडे वोट बँक आहे. मराठा आरक्षणासाठी आमच्या आरक्षणाचा घास घेईपर्यंत षडयंत्र झाले. त्यामुळे आमच्या पक्षात पुढे इतर कुठल्याही पक्षाचा निभाव लागेल, अशी शक्यता नाही.

प्रकाश शेंडगे
Sangli loksabha Constituency : सांगलीवरून खडाखडी सुरूच ; संजय राऊत यांच्या टीकेनंतर काँग्रेसचा सबुरीचा सल्ला

प्रश्न : निवडणुकीसाठी कोणत्या समाजाबरोबर जाणार आहात ?

उत्तरः लोकसभेबरोबरच विधानसभेत मुस्लिम, दलित आणि आदिवासी यांना सोबत घेऊन जवळपास ८० टक्के व्होट बँक आम्ही तयार करणार आहोत. त्याचबरोबर बोगस कुणबी दाखल्याला न्यायालयात आव्हान देणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.