Yusuf Pathan : युसूफ पठाणसाठी खेळपट्टी खडतर ;बहरामपूर मतदारसंघात अधीररंजन चौधरी यांचे एकमुखी वर्चस्व

गुजरातचे क्रिकेटपटू युसूफ पठाण यंदा पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथील लोकसभा निवडणुकीच्या खेळपट्टीवर तृणमूल काँग्रेसकडून मैदानात उतरले आहेत. परंतु ही खेळपट्टी अनुकूल नसल्याची जाणीव आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे.
Yusuf Pathan
Yusuf Pathansakal
Updated on

बरहामपूर (पश्चिम बंगाल) : गुजरातचे क्रिकेटपटू युसूफ पठाण यंदा पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथील लोकसभा निवडणुकीच्या खेळपट्टीवर तृणमूल काँग्रेसकडून मैदानात उतरले आहेत. परंतु ही खेळपट्टी अनुकूल नसल्याची जाणीव आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे. ‘‘आप मुझे वोट दो मै तुम्हारा काम करूंगा’’ या वाक्याची रेकॉर्ड वाजविणाऱ्या युसूफ यांना बहरामपूरमध्ये विजयी षटकार मारणे आवाक्यात नसल्याचे दिसून येत आहे.

बहरामपूर हा काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा बालेकिल्ला मानला जातो. १९९९ पासून सातत्याने तेच येथून निवडून आलेले आहेत. बहरामपूरचे व्यापारी माणिक लाल अग्रवाल म्हणाले, ‘‘ अधीरबाबूंनी या भागाचा विकास केला. २५ वर्षांपूर्वी बहरामपूर म्हणजे केवळ जंगल होते. लोकांना घरे नव्हती, सर्वकाही अधीरबाबूंनी तयार केले. अनेक बेघरांना घरे मिळवून दिली.’’

मुस्लिमांचे वर्चस्व

जवळपास ४० टक्के मुस्लिम मतदार असलेल्या या मतदारसंघातील काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युसूफ पठाण यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. मुस्लिम चेहरा तसेच ‘आयपीएल’मध्ये ‘केकेआर’कडून खेळलेल्या युसूफ पठाण यांचे वास्तव्य बहरामपूरच्या एका महागड्या हॉटेलमध्ये आहे.

गुजरात आणि मुंबईतून त्यांची खास टिमही येथे आली आहे. त्यांच्या दिमतीला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’चे कर्मचारीही आहेत. त्यांची प्रचारयंत्रणा एकदम हायटेक आहे. परंतु तरीही मतदारांना आकर्षित करणे सोपे नाही. ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही आपल्या भावासाठी रोड शो केला. एवढे करूनही युसूफभाई किती मते घेतील, यावर ‘टीएमसी’चे जिल्हा प्रमुखही विश्वासाने बोलू शकत नाही. आपल्या आक्रमक फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांची भंबेरी उडविणाऱ्या युसूफ यांना निवडणुकीच्या मैदानात मात्र सावध पवित्रा घ्यावा लागला आहे.

बंगाली भाषा महत्त्वाची

मुस्लिम आहे म्हणून युसूफ पठाणला मुस्लिमांची मते मिळणार नसल्याचे येथील व्यावसायिक अमित मंडल याने सांगितले. ‘‘पश्चिम बंगालमधील मुस्लिम हिंदीपेक्षा बंगाली भाषा अधिक चांगली बोलतो. त्यांची संवादाची भाषा बंगालीच आहे. युसूफ पठाण हे केवळ ‘मुझे व्होट दो, मुझे व्होट दो’ करीत आहेत. याचा कोणताही परिणाम मतदारांवर होत नाही.

भाजपचा भूमिपुत्र

या दोन दिग्गजांच्या लढाईत भाजपने भूमिपुत्राची निवड केली. डॉ. निर्मलकुमार साहा हे बहरामपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत भाजपच्या उमेदवाराला एक लाख ४३ हजार मते मिळाली होती. तर ‘टीएमसी’च्या उमेदवाराला पाच लाख १० हजार मते मिळाली होती. यावेळी भाजपच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. भाजपचा उमेदवार जिंकणार नसला तरी पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत निश्चितच वाढ होणार आहे. एक सहृदयी डॉक्टर म्हणून साहा यांची या परिसरात ओळख आहे. डॉ. साहा यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली तरी कुणाला आश्चर्य वाटू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.