Parbhani Lok Sabha : जगात जर्मनी, भारतात परभणी, असा गाजावाजा असललेल्या जिल्ह्याचं राजकारणं ही असंच, भन्नाट आहे. शिवसेनाच्या सुरूवातीच्या काळात शिवसेनेचा दिल्लीत दबदबा निर्माण करण्यात परभणीचा मोठा वाटा आहे. याठिकाणी कोणीही उमेदवार असो, जनता ही नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभी राहीली आहे. पण आता २०२४ची लढत खूप अटीतटीची होणार. याचं कारण म्हणजे महादेव जानकरणांची एन्ट्री झाल्याने शिवसेनेच्या गडाला आता तडे जाणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवारांवर गुगली टाकून जानकरांनी महायुतीशी संग केला, आणि शरद पवारांच्या लोकसभेच्या गणिताला सुरूंग लावला. काय आहे परभणी लोकसभेचा इतिहास आणि २०२४ची लढत कशी असेल जाणून घेऊया.
परभणीमधून महायुतीचे महादेव जानकर उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. परभणी हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारा एक वेगळा मतदार परभणी लोकसभा मतदार संघात आहे. अगदी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही उद्धव ठाकरेंच्या मागे परभणी जिल्हा आणि उमेदवार उभे राहिले होते. मात्र याचंही एक कारण आहे. परभणी जिल्ह्याचा इतिहास असा आहे, की ज्याने शिवसेना सोडली त्याचं राजकीय करियर संपतं. १९९१ पासून (१९९८ चा अपवाद वगळता) सात वेळा शिवसेना पक्षाचा खासदार परभणीमधून लोकसभेत जात आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघ हा परभणी आणि जालना जिल्ह्यात पसरला आहे. परभणीतील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी हे विधानसभा मतदारसंघ येतात तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसांगवी यांचा समावेश होतो.
जिंतूरमधून मेघना बोर्डीकर या भाजपाच्या आमदार आहेत. परभणीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल पाटील, गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हे रासपचे तर पाथरी येथून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. जालना जिह्यातील परतूरमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि घनसावंगी येथून राजेश टोपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे परभणी मतदारसंघात आघाडीचं वर्चस्व असलं, तरी परिस्थिती महादेव जानकरांसाठी अनुकुल आहे. असं म्हणायचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी.
मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी गेली ७ महिने राज्यव्यापी आंदोलने झाली. मनोज जरांगेच्या मागणीमुळे मराठा विरूद्ध ओबीसी असं चित्र तयार झालं, आणि ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार मेळावे घेण्यात आले. याचाच फायदा आता जानकरांना होताना दिसत आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसींचे मतदान हे निर्णायक ठरतं, जवळपास ८० टक्के मतदान हे ओबीसींचे आहे. त्यासोबत मुस्लिम मतदानाचा टक्का ही भरपूर आहे. त्यामुळे जानकरांना ओबीसी मतदाननाचा फायदा होईल, असं मत राजकीय विशलेष्क व्यक्त करत आहेत. ओबीसी मतदान हे जरी जानकरांची जमेची बाजू असली, तरी परभणीची निवडणूक ही सोपी नसणार आहे.
शिवसेनेची भक्कम पकड असणाऱ्या परभणी लोकसभेत २०२४ साठी संजय जाधवांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गेली १० वर्ष खासदार असणाऱ्या संजय जाधवांबाबत मतदारसंघात नाराजी असल्याचे बोललं जातंय. यासोबत वंचित बहुजन आघाडी महाआघाडीसोबत नसणार हे जवळपास निश्चित झालं आहे. २०१९ ला परभणीमधून वंचित MIM युतीच्या उमेदवाराने तब्बल १ लाख ४० हजार मते घेतली होती. त्यामुळे वंचितने उमेदवार दिल्यास त्याचा फायदा हा जानकरांनाच होईल असा अंदाज बांधला जातोय.
परभणी लोकसभेसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे तो मराठा आरक्षणाचा, वंचितने मनोज जरांगेंना दिलेली ऑफर स्विकारल्यास परभणी मतदारसंघावर त्याचा निश्चितच फरक पडू शकतो. तसेच महादेव जानकारांची एन्ट्री होण्याआधी परभणीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असणार हे स्पष्ट होतं. मात्र बारामतीचे गणित पाहता अजित पवारांनी महादेव जानकरांना ही जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. परभणी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आढावा घेतल्यास, जानकरांसाठी गंगाखेड मतदारसंघ हा मताधिक्य देईल असं दिसतंय, गंगाखेड येथील रासपचे आमदार गुट्टे ही जानकरांची जमेची बाजू आहे.
जिंतूरमधून भाजपचे आमदार बोर्डीकर देखील युती धर्म पाळून जानकरांच्या पाठीशी असतील असं चित्र आहे. पाथरी आणि परभणी येथे आघाडीचे आमदार असल्याने महाविकास आघाडी येथे प्रबळ आहे. जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेलं वातावरण हे महाविकास आघाडीला मदत करणार असलं, तरी लोणीकरांच्या शब्दाला परतूरकर मान देतील का; हा मोठा प्रश्न आहे. राजेश टोपेंची लोकप्रियता आणि मराठा आरक्षण आंदोलन त्यांच्या मतदारसंघातून सुरू झालं अशा घनसावंगी येथून आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे आकडे सांगतायत.
मोदींचा चेहरा आणि ओबीसी नेते म्हणून असणारी ओळख या जानकरांच्या जमेच्या बाजू आहेत. तर बाहेरचा उमेदवार, ओबीसी एल्गार सभेतून केलीली भाषणं, आणि भाजपला दिलेली साथ या बाबी जानकरांसाठी अडचणीच्या ठरू शकतात. दुसऱ्या बाजूला संजय जाधवांच्या मागे असणारी शिवसेनेची ताकद आणि हिंदुत्वाचा मुद्द्यामुळे त्यांची बाजू भक्कम म्हणून समोर येत आहे. त्यामुळे जानकर आणि संजय जाधवांमध्ये अटीतटीचा सामना होणार हे नक्की...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.