शिवसेनेची ३०-३२ वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या लोकसभेच्या परभणी मतदारसंघात यंदा उद्धव ठाकरे गटाच्या संजय जाधव यांना शह देण्यासाठी महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता जाधव विरुद्ध जानकर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीने जाधवांविरुद्ध काढलेले ‘महादेवास्त्र’ प्रभावी ठरते का, हा सध्या चर्चेचा विषय आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान खासदार संजय जाधव यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. महायुतीने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (अजित पवार) कोट्यातून महादेव जानकर यांना संधी दिली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी जानकरांनी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींबरोबर चर्चा केली होती.
‘महाविकास’ने तत्काळ प्रतिसाद देत त्यांना माढ्याची जागा देऊ केली. परंतु, जानकर यांनी कलाटणी देत पुन्हा महायुतीचा रस्ता धरला. अंतिम चर्चा करीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा खेचून आणली.
उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीने सर्व समीकरणे ओळखून हा मोठा निर्णय घेतला. पक्षश्रेष्ठींच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीत ‘रासप’च्या सहभागासह राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकरांना उमेदवारीचा निर्णय जाहीर झाला तेव्हा लढत स्पष्ट झाली.
‘आपण विजयी होऊ’, असा दावा दोघांनीही सुरू केला आहे. असे असले तरी दोघांनाही ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. ‘महाविकास’चे संजय जाधव यांचे परभणी हे ‘होमपिच’ आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील गावागावांत संपर्क आहे.
लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परभणीसह जालना जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना यापूर्वी चांगले मताधिक्य मिळत आले आहे.
आता धनुष्यबाण चिन्ह आणि मोदींची प्रतिमा सोबत नसल्याने त्यांना ही निवडणूक अवघड ठरू शकते. महायुतीचे महादेव जानकर यांच्या पक्षाचे डॉ. रत्नाकर गुट्टे (गंगाखेड) हे विद्यमान आमदार आहेत. मोदींची प्रतिमा त्यांना फायद्याची ठरू शकते. ते या भागातील नसल्याने प्रचारकाळात मतदारसंघ पिंजून काढण्यासह आपली भूमिका ठसविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
जाधव व जानकरांच्या या दिग्गजांच्या लढतीत आता वंचित बहुजन आघाडीद्वारे कोणास उतरविले जाईल, याची उत्सुकता आहे. ‘वचित’ने गेल्या निवडणुकीत आलमगीर खान यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी सुमारे १ लाख ४८ हजार मते मिळवून लक्ष वेधले होते. आता त्यांना पुन्हा संधी मिळते की नव्याचा विचार होतो, याकडे लक्ष असेल.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजेश विटेकर यांनी अजित पवार यांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच त्यांना खासदारकी खुणावत होती. त्यांच्या नावाला हिरवा कंदीलही मिळाला होता. परंतु महादेव जानकरांची ‘एंट्री’ झाल्याने विटेकरांचे काय, हा प्रश्न होता. त्यांना विधिमंडळात संधी देण्याचा शब्द अजित पवार यांनी दिल्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.