Loksabha Election: भूमिका पटवून देताना नेत्यांची उडतेय भंबेरी! राजकीय मित्र शत्रूपक्षात; गेल्या 5 वर्षांतील राजकीय उलथापालथीचा परिणाम

Loksabha Election: २०१९च्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, त्याला पराभूत करण्यासाठी आता अनेकजण झटत आहेत. तर गतवेळी ज्यांना पराभूत करण्याचा विडा उचलला होता, त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी अनेकांवर आली आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionEsakal
Updated on

- विजय चोरमारे

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत प्रचंड उलथापालथी झाल्या असून पक्षांमधील फूट आणि युती-आघाडीच्या फेरजुळणीमुळे एकेकाळचे राजकीय मित्र कट्टर विरोधक बनल्याचे चित्र दिसत आहे. २०१९च्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, त्याला पराभूत करण्यासाठी आता अनेकजण झटत आहेत. तर गतवेळी ज्यांना पराभूत करण्याचा विडा उचलला होता, त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी अनेकांवर आली आहे. आपली बदललेली भूमिका मतदारांना पटवून देताना संबंधित नेत्यांची भंबेरी उडताना पाहावयास मिळत आहे.

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती तुटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची महाविकास आघाडी आकाराला आली. नंतरच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहराच बदलून गेला. अनेक नेत्यांवर गतवेळच्या निवडणुकीच्या नेमकी उलट जबाबदारी आली आहे.

Loksabha Election
Loksabha Election: पश्चिम महाराष्ट्रात महायुती, मविआचं जोरदार शक्तीप्रदर्शन, अस्तित्वाची लढाई असलेल्या जागांवर अर्ज दाखल होणार

नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१९च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची तातडीने राज्यसभेवर नियुक्ती केली. आता गेल्यावेळी ज्यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्या चिखलीकरांचा प्रचार करण्याची वेळ चव्हाण यांच्यावर आली आहे.

शिरुरमध्ये शिवसेनेच्या आढळराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी जिवाचे रान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्यावर यावेळी आढळराव पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी आहे. गेल्यावेळी त्यांनी प्रचार केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. दिलीप वळसे-पाटील यांचा छोटासा अपघात झाल्यामुळे ते अद्याप प्रचारात सक्रीय नाहीत. त्याचप्रमाणे गतवेळी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची आघाडी सांभाळणारे अजित पवार आता त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Loksabha Election
Weather Update : राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर, तर दुसरीकडे उष्णतेचा अलर्ट; हवामान विभागाचा काय आहे अंदाज?

कोल्हापूर मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी काम केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही सतेज पाटील यांनी महाडिक यांना विरोध करण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ म्हणून प्रचारमोहीम राबवली होती. मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सतेज पाटील यावेळी त्यांचा पराभव करून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना निवडून आणण्यासाठी मैदानात आहेत. तर गतवेळी मंडलिक यांच्याविरोधात लढलेले खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे यावेळी मंडलिक यांच्या प्रचाराची जबाबदारी आहे.

माढा मतदारसंघात २०१९ मध्ये रणजित नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराची आघाडी सांभाळणा-या अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांनी यावेळी बाजू बदलली आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये गेले होते. मात्र यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील यांनाच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आले असून नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात ते मैदानात उतरले आहेत.

भंडारा-गोंदियामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्याविरोधातील प्रचाराची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती, आता मेढे यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे.

Loksabha Election
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १३ जूनपासून! परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या कमी; सुटीतही विद्यार्थ्यांना फोटो कॉपीसाठी मारावे लागणार हेलपाटे

रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात गेली दहा-बारा वर्षे नारायण राणे यांना दीपक केसरकर विरोध करीत होते. राणे विरोधक या निकषावर ठाकरे यांनी त्यांना युतीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्रिपद देऊन बळ दिले होते. आता स्वतः नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित होत असताना दीपक केसरकर यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले असून ते राणेंच्या प्रचारात आघाडीवर असतील.

बीड मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर होती. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. गतवेळी प्रचार केलेल्या बजरंग सोनवणे यांच्याविरोधात मुंडे प्रचार करीत आहेत.

Loksabha Election
अबब..! सोलापूर जिल्ह्यात 44 दिवसांत 163 कोटींची दारु विक्री; तुमच्या गावात अवैधरित्या दारू विकत असल्यास ‘या’ क्रमांकावर द्या माहिती

दिंडोरीमध्ये गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरहरी झिरवळ यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याविराधातील प्रचाराची आघाडी सांभाळली होती. सध्या ते अजित पवार यांच्यासोबत असल्यामुळे डॉ. भारती पवार यांच्या प्रचारात सक्रीय राहण्यावाचून पर्याय नाही.

मुख्यमंत्र्यांनाही करावा लागणार विचारेंविरोधात प्रचार

ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना निवडून आणण्याची जबाबदारी २०१९मध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला मिळणार असल्यामुळे विचारे यांना पराभूत करण्यासाठी शिंदे आपली ताकद पणाला लावतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()