सांगली : ‘‘सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. ही राजकीय परिपक्वता म्हणत नाहीत. तसे करायचे झाले तर महाराष्ट्रात ४८ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. आघाडीत मैत्री होते किंवा लढत होते, असा गर्भित इशारा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. विशाल पाटील यांना संसदेत नेण्याची काळजी व जबाबदारी आम्ही घेऊ,’’ असा प्रस्ताव त्यांनी दिला.
सांगली लोकसभा मतदार संघात ताणलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत आजपासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते म्हणाले, ‘‘सांगलीचा विषय देशात, राज्यात गाजतोय. सांगलीचे काय होणार आणि सांगलीमुळे काय होणार, हा मुद्दा चर्चेत आहे. त्याचे उत्तर एकच आहे, सांगलीतून चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहेत.’’ ‘‘देशाचा मूड भाजपचे सरकार घालवण्याचा आहे. मोदी पंतप्रधान होणार नाहीत. ४०० पारचा नारा फसवा आहे, हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रात ३५ जागांवर आम्ही जिंकू,’’ असे ते म्हणाले.
विशाल पाटील, विश्वजीत कदम महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीचे सरकार बनवताना विश्वजीत यांची मोठी भूमिका आहे. विशाल यांना भविष्यात संधी मिळेल आणि शिवसेना त्यासाठी पुढाकार घेईल. तसा प्रस्ताव दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवला आहे. तेथे सांगलीचा विषय संपेल.’’
राष्ट्रीय प्रश्नांवर निवडणूक
सांगलीत शिवसेनेची ताकद कमी आहे, सरपंच नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांत ताकद नाही, असा मुद्दा विश्वजित कदम यांनी मांडला होता. त्यावर राऊत म्हणाले, ‘‘ही निवडणूक सरपंच कुणाचे किती यावर होणार नाही. ही निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर होणार आहे.’’
एकमताने निर्णय
कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला घ्या, असे तुम्हाला सांगणारी व्यक्ती कोण? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘‘चार भिंतीच्या आत झालेली चर्चा उघड सांगायची नसते.’’ हा निर्णय झाला तेव्हा काँग्रेसचे पाच नेते हजर होते, असे तुम्ही सांगता, ते पाच नेते कोण, या प्रश्नाला राऊतांना बगल दिली. ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या चर्चेला शिवसेनेकडून मी आणि विनायक राऊत जात होतो. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पाच-सहा लोक जागा वाटपाला यायचे. हा निर्णय एकमताने झाला. आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम दोघेही या चर्चांमध्ये सहभागी नव्हते, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.