Ramtek Lok Sabha 2024: रामटेकचा ‘गढ’ कोण सर करणार? सुनील केदार अस्मान दाखवणार की भाजपचं संघटन कामाला येणार?

Ramtek Lok Sabha 2024: रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने हिंदू दलित उमेदवार दिले आहेत.
Ramtek Lok Sabha 2024
Ramtek Lok Sabha 2024esakal
Updated on

Ramtek Lok Sabha 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघाकडे राज्याच्या विशेषत: विदर्भाच्या जनतेचे लक्ष लागलं आहे. कारण या लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. नागपूर पेक्षा रामटेकची परस्थिती पूर्ण भिन्न आहे. रामटेक मतदारसंघाचे चित्र कसे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने हिंदू दलित उमेदवार दिले आहेत. त्यामुळे १६ ते १८ टक्के असणाऱ्या बौद्ध समाजामध्ये काहीशी नाराजी दिसून येते. शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत होणार आहे. आधी काँग्रेसकडून रश्मी बर्वे या मैदानात होत्या पण त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र ऐन वेळी रद्द झालं आणि सर्व चित्रच पालटलं.

रामटेकमध्ये सहा विधानसभा

रामटेकमधे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यातील काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख, सावनेरमधे काँग्रेसचे सुनील केदार, उमरेडमधे काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत असलेले राजू पारवे, कामठीमध्ये भाजपचे टेकचंद सावरकर, हिंगणामध्ये भाजपचे समीर मेघे आणि रामटेकमधून अपक्ष आशिष जयस्वाल हे आमदार आहेत. आशिष जयस्वाल सध्या महायुतीच्या बाजूने आहेत.

तुमानेंचे तिकीट कापले

शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले आहे. ते सलग दोनवेळा खासदार राहिले आहेत. पण ते पुन्हा निवडून येतील याचा भाजपला भरोसा नव्हता. तुमाने यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गावांना भेटी दिल्या, लोकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. पण, मतदारसंघात विकासकामे करण्यात ते कमी पडले.   त्यामुळेच भाजपने आपला उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. राजू पारवे यांना पक्षात घेण्याची तयारी पूर्ण झाली, पण शिंदे रामटेकसाठी ठाम राहिले. यासाठी एक पर्याय शोधण्यात आला.  राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नेता काँग्रेसचा, उमेदवार शिवसेनेचा आणि संघटन भाजपचं अशी स्थिती महायुतीच्या उमेदवाराची आहे.

तिकीट कापलं गेल्याने कृपाल तुमाने नाराज आहेत, पण त्यांना खासदारकीपेक्षा मोठे गिफ्ट देऊ असं म्हणत शिंदेंनी त्यांची बोळवण केली आहे. ते राजू पारवे यांच्या प्रचारकार्यात सहभागी होत आहेत. तुमाने पुन्हा खासदार झाले असते तर त्यांना मंत्री करावं लागलं असतं म्हणूनच भाजपवाल्यांनी त्यांना तिकीट नाकारलं असं तुमानेंचे कार्यकर्ते खाजगीत बोलून  दाखवतात. दुसरीकडे, नागपूरमधे विकास कामांचा बोलबाला असला तरी रामटेक विकासापासून वंचित आहे. कृपाल तुमाने यांनी मतदारसंघात काम न केल्याचं लोकांचं ठाम मत आहे.

Ramtek Lok Sabha 2024
DY Chandrachud: CJI चंद्रचूड खुर्ची सोडून स्टूलवर का बसले?; सरन्यायाधीशांच्या हालचालीने कोर्टरुममधील सर्वजण आश्चर्यचकित

काँग्रेसला दोन मोठे धक्के

सुनील केदार यांनी रश्मी बर्वे यांच्यामागे ताकद उभी केली होती. रश्मी बर्वे या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांनी आपल्या कामातून लोकांवर छाप पाडली होती. बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कमालीची तत्परता दाखवली. त्यांचे प्रमाणपत्र रद्द होणे काँग्रेससाठी पहिला मोठा धक्का होता. रश्मी बर्वे बाद झाल्याने उमेदवारी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्याकडे आली. सुनील केदार यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. इतके दिवस ते स्थानिक राजकारणातच सक्रिय होते.

किशोर गजभिये यांची बंडखोरी

माजी आयएएस अधिकारी राहिलेले किशोर गजभिये हे २०१९ मधे कृपाल तुमाने यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर लढताना पराभूत झाले होते. २०२४ मधे त्यांना पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा होती, पण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी सुनील केदार यांच्या उमेदवाराला कौल दिला. त्यामुळे नाराज गजभिये यांनी बंडखोरीचे अस्त्र उचलले असून अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणारी मते ते खाण्याची शक्यता आहे.  शिवाय बसप आणि वंचितचा धोका काँग्रेसला असणार आहे.

राजू पारवेंची ताकद किती?

राजू पारवे हे काँग्रेसचे माजी आमदार. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकीसाठी नशीब आजमावत आहेत. राजू पारवे यांचा उमरेडच्या बाहेर प्रभाव नाही. उमेदवारी घोषित होईपर्यंत लोकसभा मतदारसंघातील अनेकांना त्यांचा चेहरा देखील माहिती नव्हता. पण सध्या त्यांच्यामागे शिवसेना खासकरुन भाजपचं संघटन उभं आहे. त्यामुळे त्यांना मोठं बळ मिळालं आहे. राजू पारवे विरुद्ध रश्मी बर्वे अशी लढत झाली असती तर रश्मी बर्वे या वरचढ राहण्याची शक्यता होती. पण आता चित्र वेगळं आहे. ही लढत आता भाजप विरुद्ध सुनील केदार अशी झाली आहे. त्यामुळे कोण खासदारकी पटकावतं हे पाहावं लागेल.

Ramtek Lok Sabha 2024
Raj Thackeray Sabha: "वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.