आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक झाल्यानंतर तत्काळ किरण सामंत यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, असे निवेदन पोलिसांना दिले आहे.
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे ज्येष्ठ बंधू तथा उद्योजक किरण सामंत हे ऐन निवडणुकीच्या दिवशी नॉट रिचेबल झाल्याने रत्नागिरीत पुन्हा एकदा राजकीय गदारोळ झाला. लांजा-राजापूर मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात ते महायुतीचे काम करत असल्याने त्यांचा फोन लागत नाही, असा खुलासा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला, तर आपल्या फोनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नॉट रिचेबल लागत असल्याचे स्पष्टीकरण सायंकाळी किरण सामंत यांनी दिल्याने या विषयावर पडदा पडला.
आज मतदानाच्या दिवशी किरण सामंत (Kiran Samant) यांचा फोन नॉट रिचेबल (Phone Not Reachable) आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. अनेक तर्कवितर्क बांधले गेले. वाऱ्यासारखी ही बातमी पसरल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. उबाठाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की, नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे कुटुंबीय असतात ती निवडणूक दहशत, दादागिरी आणि धाकदपटशा करणारी असते. किरण सामंत दादागिरीला भिक घालणारा माणूस नाही, ते लढवय्ये आहेत.
परंतु, ते गप्प आहेत याचा अर्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी समजून जावा. या सूचक विधानामुळे या विषयाला अधिकच हवा मिळाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक झाल्यानंतर तत्काळ किरण सामंत यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, असे निवेदन पोलिसांना दिले आहे. या सर्व घडामोडीनंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास किरण सामंत पाली येथे मतदान करण्यासाठी दाखल झाले.
यावेळी किरण सामंत म्हणाले, माझ्या मोबाईलला अचानक प्रॉब्लेम झाला. सीमकार्ड खराब झाल्यामुळे मोबाईल बंद होता. परंतु माझा बॉडीगार्ड, कार्यकर्ते माझ्या संपर्कात होते. मी पत्नीलाही सांगितले होते की दुपारी साडेचार वाजता आपण मतदान करायचे आहे. परंतु हा विरोधकांनी केलेला बाऊ आहे.
किरण सामंत हे महायुतीचे काम करत आहेत. पाचलकडच्या भागात ते काम करत आहेत. सकाळी ११ वाजता आपले बोलणे झाले आहे. किरण सामंत नॉट रिचेबल याला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. गेल्या १० वर्षांत टॉवर उभारण्याचे काम केले नाही, त्यामुळे मोबाईलला रेंज नाही. वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष घालावे. आम्ही समर्थ आहोत, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.