गतवेळी खासदार संजय पाटील यांना वंचितमधून (Vanchit Bahujan Aghadi) गोपीचंद पडळकर यांनी तगडे आव्हान दिले होते.
आटपाडी : पाच वर्षांपूर्वी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) लोकसभेच्या आखाड्यात एकमेकांच्या विरोधात जिवाची बाजी लावून लढले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर भाजपच्या (BJP) मतदारसंघाच्या प्रमुखपदी असल्याने संजय पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी पडळकर यांच्यावर आहे. ती त्यांना पेलवून दाखवावी लागणार आहे.
त्यासाठी ते किती ताकद लावणार आणि त्यांचे कार्यकर्ते किती जोशात पळणार, यावर संजय पाटील यांच्या मतांची आकडेवारी ठरणार आहे. गतवेळी खासदार संजय पाटील यांना वंचितमधून (Vanchit Bahujan Aghadi) गोपीचंद पडळकर यांनी तगडे आव्हान दिले होते. त्याला त्या दोघांतील अंतर्गत वादाची झालर होती. लोकसभेच्या अगोदर दोन वर्षांपासून त्यांच्यात एका पक्षात असतानाही संघर्ष चालू होता. दोघांकडूनही एकमेकावर विखारी टीका केली.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली. पडळकरांना तासगावात येऊन दाखवण्याचे आव्हान दिले. ते पडळकर यांनी स्वीकारले होते. तो दोघांच्यातील कडवा संघर्ष मतदार आणि कार्यकर्त्यांनी बघितला आहे. आत्ता चित्र बदलले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे सूर जुळलेत. पडळकर यांच्याकडे भाजपने मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. तर पाटील यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे पडळकर यांच्यावर मतदारसंघातून संजय पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे ते पाटील यांच्यासोबत प्रचारात निश्चित असणार आहेत. गतवेळी पडळकर यांनी पहिल्या क्रमांकाची आणि पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची तालुक्यात मते घेतली होती. सध्या पडळकर पाटील यांच्यासोबत असल्याने तालुक्यातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे.
खासदार पाटील यांना मताधिक्य देण्याच्या दृष्टीने पडळकर यांना ताकद लावावी लागणार आहे. गतवेळचा टोकाचा संघर्ष विसरून कार्यकर्त्यांकडून जोमात काम करून घ्यावे लागणार आहे. यावर बरेच काही अवलंबून आहे. सध्या त्यांचे आघाडीचे मोजके कार्यकर्ते कमी अधिक सक्रिय आहेत. इतर मात्र लांब आहेत. मतदार वर्गातही वेगळाच सूर आहे. पडळकर यांचा हक्काचा एक मतदार वर्ग आहे. तो स्वतः पडळकर मैदानात नसताना त्यांच्या मागे किती येणार, यावर संजय पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.