Sangli Lok Sabha : सांगलीत काँग्रेस नेत्यांसमोर धर्मसंकट; विशाल पाटलांच्या बंडाबाबत धोरण ठरवताना नेत्यांची होतेय कसरत

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभेत विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विश्‍वजित कदम यांचे नेतृत्व मान्य केले.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Updated on
Summary

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ठाकरेंना दुखावण्याची मानसिकता नाही. त्यातूनच ‘सांगली’बाबत काँग्रेसने शरणागती पत्करली, हेही उघड सत्य आहे.

सांगली : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसला सांगली लोकसभा मतदार संघ सोडवून घेण्यात सपशेल अपयश आल्यानंतर आता जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. विशाल पाटील यांनी बंडाच्या दिशेने पावले उचलली आहेत. या बंडाला उघड साथ द्यायची, गुप्त साथ द्यायची की महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा, अशी कोंडी झाली आहे. आमदार विश्‍वजित कदम यांच्या निर्णयावर त्याची दिशा ठरणार आहे. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभेत विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विश्‍वजित कदम यांचे नेतृत्व मान्य केले. त्यानंतर सर्व राजकीय निर्णय विश्‍वजित यांना विश्‍वासात घेऊन, त्यांच्या सल्ल्याने घेतले. लोकसभेच्या उमेदवारी मागणीपासून ते महाविकास आघाडीत लढा देण्यापर्यंतच्या हालचाली विश्‍वजित यांच्या पुढाकाराने झाल्या. त्यातून जिल्ह्यात ‘कदम-पाटील एक झाले आहेत,’ असा संदेश मिळाला.

Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabha : 'सांगली लोकसभेचा विषय निकाली, आता पुन्हा चर्चा करायला नको'; जयंत पाटलांचं स्पष्ट मत

त्यातूनच, काँग्रेसवर अन्याय झालाय, वसंतदादा घराण्याची कोंडी केली जातेय, विशाल यांचा गेम होतोय, काँग्रेसला संधी होती, असे वातावरण सध्या तयार झाले आहे. त्या लाटेवर स्वार होण्याचा विशाल पाटील यांचा प्रयत्न आहे. ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आमदार विश्‍वजित कदम, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांची उघड साथ हवी, अशी त्यांची अपेक्षा आहे. तसे झाले तर पलूस-कडेगाव, जत विधानसभा मतदार संघातून ताकदीने मतदान मिळेल, हे गणित आहे. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्तिगत पातळीवर मजबूत मोट बांधली आहे.

मिरजेत विशाल यांचा स्वतःचा गट आहे. ती बेरीज महत्त्वाची आहे. जयश्री पाटील या कुटुंबातील घटक असल्याने त्या उघडपणे साथ देतील, अशी अपेक्षा आहे. हे गणित जमले तर मतदारांना एकजुटीचा प्रभावी संदेश देता येईल, असे विशाल यांचे गणित आहे. दुसरीकडे, विश्‍वजित यांची कोंडी झाली आहे. ते जिल्ह्याचे नेते आहेतच, मात्र राज्याच्या काँग्रेसमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसमवेत त्यांचे सख्य आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातील काँग्रेसच्या युवा नेत्यांना ‘पलूस-कडेगाव’मध्ये आणून त्यांनी काँग्रेसमधील प्रभावाची चुणूक दाखवली.

Sangli Lok Sabha
Hatkanangale Lok Sabha : आमदार आवाडेंची उमेदवारी अन् मानेंची झाली मोठी गोची; मत विभागणीचा धोका, सरुडकर 'सेफझोन'मध्ये

त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा वाढलेला आहे. राष्ट्रीय काँग्रेसमध्येही ते प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला उघडपणे विरोध करणे त्यांना कठीण आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ठाकरेंना दुखावण्याची मानसिकता नाही. त्यातूनच ‘सांगली’बाबत काँग्रेसने शरणागती पत्करली, हेही उघड सत्य आहे. आता एकीकडे विशाल पाटील यांच्यासाठी उभे राहायचे की राज्यातील महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुरस्कार करायचा, अशा धर्मसंकटात विश्‍वजित कदम आहेत.

विश्‍वजित यांनी जिल्ह्यात बेरजेची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्याला अपयश आले, मात्र विशाल यांना लढायचे आणि जिंकायचे असेल तर विश्‍वजित यांचा आधार त्यांना महत्त्वाचा आहे. तो उघडपणे दिला किंवा ‘आमचं ठरलंय’सारखा प्रयोग केला तरी विश्‍वजित जिल्ह्यात हिरो होतील. या बंडाची वरिष्ठ काँग्रेसदेखील चांगल्या अर्थाने दखल घेईल, मात्र बंड फसले तर काय, हा प्रश्‍न विश्‍वजित यांच्यासमोरील प्रश्‍न गहन करणारा आहे.

Sangli Lok Sabha
'छत्रपती शिवरायांनंतर दुसरे कोणी छत्रपती होऊ शकत नाहीत'; कोणाला उद्देशून म्हणाले आमदार गोगावले?

आबा गटाकडे लक्ष

तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात आर. आर. पाटील यांचा गट काय करणार, हे विशाल यांच्या बंडासाठी महत्त्वाचे आहे. तो गट काँग्रेस नेत्यांच्या धोरणानंतर भूमिका घेईल. काँग्रेस नेतेच उघडपणे बंडाला साथ देणार नसतील तर आमदार सुमन पाटील साथ कशा देतील, हा प्रश्‍न आहे. अशावेळी ‘आमचं ठरलंय’सारखा प्रयोग विशाल यांच्यासाठी मधला मार्ग ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.