'विधानसभा निवडणुकीत माझ्याशी गद्दारी करत विक्रम सावंतांशी ‘सेटलमेंट’ केली. त्यांना गत दहा वर्षांत एकही प्रभावी काम करता आले नाही.'
सांगली : ‘‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांची भाजप खासदार संजय पाटील यांच्यासमवेत ‘सेटलमेंट’ आहे. जिल्ह्यात तिसरे स्वतंत्र नेतृत्व उभारण्याची संजयकाकांची क्षमता नाही, याची खात्री असल्यानेच ते संजयकाकांना पूरक भूमिका घेतात. त्यामुळेच काँग्रेसला सांगलीची जागा मिळवण्याची त्यांची इच्छा नसावी,’’ असा आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
‘‘भाजपने (BJP) संजय पाटील (Sanjay Patil) यांची उमेदवारी लादली आहे. ती आम्हाला अजिबात मान्य नाही. ‘दुष्काळी फोरम’चे सगळे नेते त्याला विरोध करतील. आम्ही लवकरच बैठक घेऊ. संजयकाकांच्या विरोधातील समविचारी एकत्र येऊन पर्यायावर चर्चा करू,’’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
ते म्हणाले, ‘‘जयंत पाटील हे राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी ‘सांगली’, ‘हातकणंगले’चा सर्व्हे केला; अन्य कुणासाठी का नाही? आपलं जमलं तर जमलं, नाही तर विस्कटून टाकलं, अशी त्यांची भूमिका आहे. तीच अवस्था विश्वजित कदम यांची. ते परराज्यात काँग्रेसचे (Congress) निरीक्षक असतात, पण त्यांना आपल्या मतदार संघात उमेदवारी आणता येत नाही, हे दुर्दैवी आहे.’’
‘‘जतमध्ये आमदार विक्रम सावंत यांचे संजयकाकांशी तडजोडीचे राजकारण चालते. या लोकांच्या पक्षाशी आमचं देणं-घेणं नाही, मात्र त्यांची खासदार संजय पाटील यांच्याशी ‘सेटलमेंट’ आहे आणि त्यातून राजकारणात विचित्र पॅटर्न जन्माला घातला जातोय,’’ असे ते म्हणाले.
जगताप म्हणाले, ‘‘खासदार संजय पाटील २०१४ ला भाजपमध्ये आले, तेव्हा त्यांना साथ दिली. दिल्लीत गोपीनाथ मुंडेंना भेटायला त्यांच्यासमवेत गेलो, नागपूरला गडकरींची भेट घेतली. २०१९ ला भाजपचे अनेक नेते विरोधात होते, तडजोडी घडवून आणल्या. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत माझ्याशी गद्दारी करत विक्रम सावंतांशी ‘सेटलमेंट’ केली. त्यांना गत दहा वर्षांत एकही प्रभावी काम करता आले नाही. ड्रायपोर्ट, विमानतळ सगळ्या पातळीवर ते फेल आहेत. त्यांच्या उमेदवारी विरोधात जनमत होते. निरीक्षकांचा रिपोर्ट तसा होता. इतका असंतोष असताना उमेदवारी दिली हा धक्काच आहे.’’
जगताप यांनी खासदार संजय पाटील यांच्यावरील नाराजीचा पाढा वाचला. ते म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद सभापती निवडीत संजयकाकांचा भाजपविरोधात सवतासुभा राहिला. अपक्ष प्रमोद शेंडगे यांना सभापती करत मूळ भाजप सदस्यांवर अन्याय केला. जिल्हा नियोजन समितीवरदेखील अपक्ष शेंडगेंना पाठवले. बाजार समितीत मी पुढाकार घेत बांधणी केली होती, ती विस्कटून टाकली.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.