उदयनराजे म्हणाले, ‘‘जो ताण घेतो त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याला रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.’’
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून दिले जाईल. त्यासाठी जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड, वाई येथे घटक पक्षांचे कार्यकर्ते मेळावे घेतले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. दरम्यान, महायुतीच्या कालच्या पहिल्या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरविली. यावर पालकमंत्र्यांनी सारवासारव करत महत्त्वाच्या बैठका असल्याचे कारण सांगितले.
महायुतीतील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भेासले (Shivendraraje Bhosale), महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, अमित कदम, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत पाटील, सुरभी भोसले, शारदा जाधव, अशोक गायकवाड, सुनील काटकर, पंकज चव्हाण, काका धुमाळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या नियोजनासाठी आज महायुतीची बैठक झाली. राज्यातील नेत्यांकडून येणाऱ्या आदेशाचे तंतोतंत पालन सर्व पक्षांनी करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठ एप्रिलपासून विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ता मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात आज (बुधवार) ठाण्यातून होत आहे. कऱ्हाड येथून मेळाव्यास सुरुवात होईल. प्रत्येक विभागाचा एक मेळावा होणार आहे.’’
महायुतीच्या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याबद्दल विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे भोसले तसेच आमदार मकरंद पाटील यांना महत्त्वाच्या बैठका होत्या. उदयनराजे हे याठिकाणी येऊन गेले आहेत, तसेच त्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सत्तेचा वाटा मिळत नाही. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले हे बैठकीच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वेशात आले होते; पण बैठकीस येण्यास पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्याने खासदार थोडावेळ थांबून बाहेर पडले. उदयनराजेंचा पेहराव हटके होता. त्यावरून त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘माझा लुक चांगला असल्याने निदान डोळा तरी मारा; पण मी डोळा मारला तर त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल,’’ अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य व ग्लो बरेच काही सांगून जातोय, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘‘जो ताण घेतो त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याला रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.’’
भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असून, त्यात कितपत सत्य आहे? असा प्रश्न अतुल भोसले यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘‘महायुतीतून उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपचा कार्यकर्ता म्हणून करत आहे. भाजपच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव विचाराधीन आहे. त्यांनाच निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील. लवकरच त्याबाबत स्पष्टता येईल. सुरेशबाबा आणि मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही. पक्षपातळीवर माझ्या नावाची चर्चा झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.